प्रजासत्ताकाचा जोश

Submitted by दत्तात्रय साळुंके on 4 February, 2024 - 12:59

घरापासून दूर कुठेतरी कोकणातल्या उघड्या रानात
भात कापलेल्या कोरड्या खाचरात भाताच्या बुडख्यात
आजू बाजूला ठोकलेल्या चौरस वाघरात
कोंबड्यां, कुत्री, घोड्यांच्या गराड्यात
आयत आकाराच्या मांडणीवर लोकरी अंथरुणं, पांघरुणं
आडोश्याला तीन दगडांचं चूलाणं,
हंडा, कळशी,पितळ्या, तांब्या, ताटल्या चारदोन
चुलीभोवती भांड्यांचं मेंढरागत रिंगण
असंच मल्लू धनगराचं उघड्या छताखाली देखणं राहणं

त्या उघड्यावरच्या संसारात होतं
झ-याचं खळाळणणं
पाखरांचं गाणं
कोकरांचं बागडणं
कसं अलगद पिढी दर पिढी मुरणं
काट्याकुट्यातलं जिणं
नाही झालं गळ्यातलं लोढणं
न्याहरी, नाष्टा, चहापान
टळटळीत उन्हाच्या चांदण्याच्या साक्षीनं
परिस्थितीचा स्वीकार अन् मनात ‌आनंद बक्कळ
धनगर वाड्यावर सुखाचा वर्षाव तिन्ही त्रिकाळ
अशातच आली २६ जानेवारी
वलणीच्या मेढीवर झाली तिरंग्याची तयारी
बानाईनं काटक्यानी झाडलं पटांगण
फडकवला तिरंगा मेढीवर मल्लूनं
मल्लू म्हणाला ....
आज परजासत्ताक दिन
आज आपलं म्हंजी परजेचं राज्य चालू झालं
बाबासाहेबांनी घटना लिवली तिच्या परमान कारभार चालला
मेंढरांनी ब्याsss, ब्याssचा बिगूल फुंकला
बघा सत हाय मल्लू म्हणाला
आपूण फिरतो कुटबी रानोमाळ
खेळतो कुटबी गज्याचा खेळ
पण स्वराज्य मंजी नाही स्वैराचार
मिंढ्यांना नाही पीकात वावर
हा ते लबाड लांडगबी हुसकायचं
आन आपलं रयतेचं राज्य राखायचं
मिंढ्या म्हंजी आपली रयत
आपण नेतो तिकडं जातात
रयतेला योग्य दिशा दावणं
हेच असतयं नेत्याचं‌ गुण
जे बी मिळतं भाकर, ठेचा, कांदा, लोणचं
ते समद्यात वाटून खायचं
मिंढ्यांनीबी तसचं वागायचं
जय हिंद
सरलं भाषण मल्लूच
नागडं पोर, बिरु, बानाई, तात्या समद्यानी टाळ्या पिटल्या
राष्ट्रगीत कोणाला जरी पाठ नव्हतं
प्रजातंत्र भरभरून इथं तिथं रानात
सावधान होत मेढीवरच्या राष्ट्रध्वजाला
सा-यांनी कडकडीत सलाम ठोकला
तसा मल्लू म्हणाला
आश्रम शाळेत शिकणाऱ्या लेकीचा परजासत्ताक आठावला
मेंढ्यांच्या दुधाची गोड खीर पिताना
समद्यांनी एक आवंढा गिळला
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार सर,
SharmilaR

खूप धन्यवाद....