She walks in Beauty - Byron

Submitted by सामो on 9 January, 2024 - 10:03

-------------- अन्यत्र पूर्वप्रकाशित-------------
खालील समीक्षा पुढील लेखात वाचनास आली
.
बायरन या महान कवीची "She walks in Beauty" ही कविता जेव्हा मी कॉलेजमध्ये वाचली तेव्हाच प्रेमात पडले होते. मला त्या वेळेस नक्की कळलं नव्हतं की मी इतकी मंत्रमुग्ध का झाले होते पण तेव्हा सर्वोत्तम कवितांपैकी एक वाटली होती, अजूनही वाटते. विचार करता पहिल्यांदा वाटलं की एका स्त्रीच्या पदन्यासाचं, सौंदर्याचं अप्रतिम वर्णन आहे, लक्षवेधी उपमा आहेत म्हणून असेल कदाचित. पण मग लक्षात येऊ लागलं की कारण वाटतं तितकं उथळ नाही आहे. "द्वैत आणि संतुलन यांच्या आकर्षणामध्ये कुठेतरी या कवितेची गोडी दडलेली आहे. ही कविताच मुळी द्वैत या एका कन्सेप्टभोवती घट्ट विणली आहे. कवितेची सुरुवातच द्वैताने होते. कवितेतील रूपगर्विता पदन्यास करीत अवकाशाच्या तृतीय मितीमध्ये पुढे पुढे सरकत आहे जशी जणू काही चांदण्यांनी नटलेली रजनी ही पदन्यास करीत काळाच्या चतुर्थ मितीमध्ये पुढे पुढे सरकत आहे. हे कडवं भौतिक जगातील द्वैत दाखविते. अंधारी रात्र आणि दीप्तीमान दिवस. रात्र कशी आहे तर आकाशात ढग नसलेली व चांदण्यांची परात उपडी झालेली. म्हणजे काळोखाबरोबरच, प्रकाशही आहे. एक संतुलन आहे. कोणत्याही विशिष्ठ तत्वाचे असंतुलन नाही. या मोहक स्त्रीस पाहून कविला दोहोंचा अनुभव प्राप्त होतो - रात्रीची शीतलता आणि दिवसाची तेजोमयता. पण दिवसाचे तेजही gaudy नाही म्हणजे प्रखरतेने डोळ्यांना असह्य होणारे नाही.
.
She walks in beauty, like the night
Of cloudless climes and starry skies;
And all that's best of dark and bright
Meet in her aspect and her eyes:
Thus mellowed to that tender light
Which heaven to gaudy day denies.
.
दुसऱ्या कडव्यातही परत संतुलनावर, समतोलावर बायरनने भर दिला आहे. कविताविषयाच्या लावण्याचे वर्णन करताना बायरन म्हणतो - तमाचा कृष्ण वर्ण आणि उजळपणा यांचा अलौकिक मेळ तिच्या लावण्यात साधला गेला आहे. या गौरवर्णिय लावण्यवतीचे कुंतल काळे आहेत. तिच्या कुंतलातील एखादी तमाची छटा अधिक अंधारली असती अथवा मुखावरची उजाळ्याची छटा अधिक उजळली असती तर तिचे सौंदर्य कुठेतरी उणावले असते. या काळ्या-गौर छटांचा जो अलौकिक मिलाप आहे, खेळ चाललेला आहे तो केवळ अद्भुत तर आहेच पण समतोल आहे. एक मर्यादा त्यात आहे. कशाचेही रसभंग करणारे आधिक्य (अतिरेक) त्यात नाही.
.
One shade the more, one ray the less,
Had half impaired the nameless grace
Which waves in every raven tress,
Or softly lightens o'er her face;
Where thoughts serenely sweet express,
How pure, how dear their dwelling place.
.
पुढेहेच द्वैत मनःपातळीवर घेऊन जात बायरन मन आणि हृदय (Mind & Heart) कसे भिन्न आहेत हे सूचित करतो. या दोहोंच्या निर्मळतेमधून, विशुद्धतेमधून जे प्रतीत होते ते सौंदर्य येथे अपेक्षीत आहे. तिचे मन शांतीमध्ये वास करते तर हृदय आकंठ प्रेमात बुडून गेले आहे. ज्या व्यक्तीने केवळ चांगुलपणामध्ये दिवस कंठले आहेत केवळ अशा व्यक्तीस साध्य असे निर्मळ स्मितहास्य तिला वर म्हणून लाभले आहे.
.
And on that cheek, and o'er that brow,
So soft, so calm, yet eloquent,
The smiles that win, the tints that glow,
But tell of days in goodness spent,
A mind at peace with all below,
A heart whose love is innocent!
.
अशा तीनही पातळ्यांच्या कसोट्यांवर सुंदर ठरलेली स्त्री कवीला सुंदर वाटते. या कवितेचा विशेष हा की कोठेही हा उल्लेख नाही की ही स्त्री बायरनची प्रेयसी आहे अथवा नाही. ते शेवटपर्यंत गूढच ठेवले आहे.
.
काही समीक्षक याच कवितेचे किंचित भिन्न पातळीवर समीक्षण करतात - त्यांच्या मते ही कविता बायरन ला एका स्त्रीला शोकाकुल अवस्थेत पाहील्यानंतर सुचली. या स्त्रीने काळे कपडे घातलेले आहेत. हा जो अंधाराचा, रात्रीचा उल्लेख आहे हा प्रतिकात्मक आहे. तिच्या प्रियकराचा मृत्यु व विरह हे "आत्मिक अंधाराचे, रात्रीच", शोकाकुलतेचे प्रतिक आहे. आणि या शोकाकुल अवस्थेतही तिच्या सौंदर्यामध्ये कुठे कमतरता आलेली नाहीच उलट ते अधिकच धारदार झाले आहे.
.
बायरनने या कवितेमध्ये कुठेही उत्तनपणा, शृंगार आणलेला नाही. वर्णन देखील जे केले आहे ते तिच्या कुंतलांचे, चेहर्‍याच्या निर्मळ सौंदर्याचे, डोळ्यांचे ज्यांना "Window of soul" म्हणतात, त्याचे केलेल आहे. या स्त्रीने तिचे आयुष्य खरच सद्गुणांमध्ये व्यतित केलेले आहे अथवा कविच्या कल्पनाराज्यात तिने ते तसे व्यतित केलेले आहे, काहीही असो,पण तिची मोहकता ही निरागस, कलंकरहीत आहे. काळोख्या रात्रीमध्ये चमकणार्‍या तार्‍यांचे तेज तिच्या मुखावरती आहे. ती साधी आहे. पण गुणांच्या तेजाने तेजस्वी भासते आहे. तिच्या सद्वृत्ती मुळे हे सौंदर्य (जे की जवळ जवळे आत्मिक सौंदर्याजवळ जाते) प्राप्त झाले आहे.
आणि एवढ्या समीक्षकांच्या काथ्याकूटानंतर शेवटी कवितेतून मात्र हेच प्रतित होते की कदाचित बायरनने या स्त्रीला क्षणभरच पाहीले.
___
काही का असेना बायरन यांचा elevated मूड या कवितेने अप्रतिम रीत्या, पकडला आहे. शेवटी Beauty lies in beholder's eyes. कदाचित सामान्य माणसाला या स्त्रीमध्ये हे सौंदर्य दिसणारदेखील नाही. कदाचित ती स्त्री तितकी सुंदर नसेलही. पण बायरनला ती तशी भासली आणि त्यातून इतकी उच्च कविता जन्मास आली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद किल्ली. सध्या जॉब शोधत असल्याने हातशी बराच वेळ आहे. त्यातून शिळ्या (पूर्वप्रकाशित) कढीला उत आणते आहे.

अनन्त यात्री आभार. आपल्यासारख्या उत्तम कविकडुन पावती मिळणं म्हणजे पाठीवरची शाबासकीची थाप आहे.
अर्थात या धाग्याच्या मूळ स्रोताची लिंक दिलेली आहे व अन्यत्र वाचनही कारणीभूत आहे. अन्यथा कळणे मला कठीण होते.