एक अनामिक दुपार

Submitted by रेव्यु on 27 January, 2024 - 06:30

एक अनामिक दुपार

असतात काही दुपारवेळा - निवांत, निष्क्रिय, आळसावलेल्या.

पानं पिवळी पडलेल्या एखाद्या अगदी जुन्या मासिकासारख्या..
जुन्या, तरीही ओळखीच्या.
आपुलकीचा गंध असणाऱ्या.

कधी कळत नकळत अगदी अस्पष्ट सुरावटीवर त्या रेंगाळतात -
अगदी अंधुकशी जाणीव होईल इतपतच असते ती सुरावट.

मन सुखावणारा सावल्या अन् कवडश्यांचा खेळ.
. एक अनामिक मंदसा सुगंध येतो,
मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत घेतो,
अन् अलगद लुप्त होतो...

आळसटलेल्या या दुपारवेळा ...
त्यांना नको असतं काहीच माझ्याकडून
त्या फक्त कुरवाळत राहतात मला आपल्या गंधस्पर्शाने.

रेंगाळत राहतात...
माझा भवताल एका अनामिक निष्क्रियतेने,
भारून टाकतात आसमंत.. अन् माझ्याही नकळत विरून जातात.

आणि मी मात्र शोधत राहतो त्या हव्याहव्याश्या निष्क्रियतेला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भर उन्हातली निष्क्रिय दुपार प्रचंड सुंदर असते.

नानबाने ही कविता एका धाग्यावर दिलेली होती. या कवितेमुळे मी 'समग्र इंदिरा संत' किंडलवरती घेतला.

ही निळीपांढरी शरदातील दुपार
तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी
या दुपारीतले ‘गोड जाड्य’ पाहून,
दिस भरलेली ही काय तरी गर्भार
टाकीत पावले चाले रम्य दुपार
(निळीपांढरी-शेला)

मला दुपारचे फार आकर्षण आहे. पुण्यातील, अनेक दुपारी स्मरणंआत आहेत. मग ती रंगपंचमीतली भिजणारी गारेगार दुपार असो, की आंब्याच्या सीझनमधली घमघमती दुपार. कॅरम, पत्ते,व्यवहार खेळत मजेत घालवलेल्या दुपारी असोत की उशीरा ऑफिसला जातानाची मुंबईतली रेल्वेतली/बसमधली दुपार असो. अशा दुपारच माझा साथी पळस. हा एक जुना लेख -
_________
अविस्मरणिय पळस
________________
लहानपणी मे च्या सुट्टीत, पेटलेल्या दुपारी
लाल ज्वाळांनी वेढलेला पळस
गॅलरीच्या कठड्यावर रेलून,
अंगावर थंड वार्‍याची झुळुक घेत,अनुभवलेला पळस
आईची मेमधील सुट्टी ,नाचर्‍या आनंदी घरदारात
अनुभवलेली निव्वळ शून्यातीत दुपार
मूड त्या दुपारसारखाच,निरभ्र, निवांत
माठातील वाळ्याचा उन्हाळी सुगंध
माझ्या बालपणाचा साथीदार- भारदस्त पळस
काळाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणणारी दुपार
"तुझा जुलमी अंमल माझ्यावर चालणार नाही
मी अक्षय आहे,
गॅलरीत ऊभ्या असलेल्या त्या लहान मुलीच्या
मनात माझे स्थान चिरंतन,
अविनाशी, अढळ आहे,
मरतेवेळीही जे काही अमृतक्षण तिला आठवतील
त्यामध्ये माझा नंबर अव्वल असेल."

--------------------------------------------------------------

लग गयी आग; बन में पलाश, नभ में पलाश, भू पर पलाश।
लो, चली फाग; हो गयी हवा भी रंगभरी छू कर पलाश॥
.
आते यों, आएँगे फिर भी वन में मधुऋतु-पतझड़ कई।
मरकत-प्रवाल की छाया में होगी सब दिन गुंजार नयी॥
- नरेन्द्र शर्मा