काव्यलेखन

अंधारल्या दिशा

Submitted by विश्राम कुलकर्णी on 17 September, 2023 - 05:51

अंधारल्या दिशा अन अंधार सावल्यांचा 
कल्लोळ अंतरीचा , कल्लोळ भावनांचा ..
 
वाटा किती तुडवल्या , आयुष्य शोधताना ,
संधी बऱ्याच हुकल्या , स्वप्नात राहताना ..
 
आले किती एक क्षण हे , दुःखास घेऊनिया ,
क्षणैक सुखांनी , गोंजारले मनाला ...
 
 
ग्रीष्मातल्या चटक्यांची , वाटे आता  न भीती ,
घनघोर जलधारांची  ,जडलीच  असे प्रीती 
 
स्वीकारले आता हे , या सर्वांसवेच जगणे ,
मौनामध्येच हासणे , मौनामध्येच जगणे ..

पडोनी शतदा पुन्हा उठावे ..!

Submitted by विश्राम कुलकर्णी on 17 September, 2023 - 05:48

मुक्या चांदण्यांचे मुक्यानेच गाणे ,
तमा दूर लोटून प्रकाशासी देणे ,
पुऱ्या अंबरात अणुमात्र असुनी ,
महाकाय अंधार टाके पिऊनी .. !

पहा मुंगळ्यांची कशी रांग चाले ,
कशा एकरेषेत लढाया निघाले ,
घडो धरणीकंप आघात कितीही ,
उठोनि पुन्हा कार्यात मग्न झाले ,

मोडून पडली घरटी जरीही ,
भंगून गेली स्वप्ने तरीही ,
असेच वरदान आम्हा मिळावे ,
पडोनी शतदा पुन्हा उठावे ..!

'जगणं ' आम्ही विसरलोय

Submitted by विश्राम कुलकर्णी on 17 September, 2023 - 05:46

रोजच्या जगण्यात 'जगणं ' आम्ही विसरलोय,

ठरलेल्याच धावपट्टीवरच 'पळणं ' आम्ही विसरलोय ,

सूर्य आपला उगवतोय , ठरल्यावेळी मावळतोय ,

आम्ही मात्र तसेच , रोज धडपडून सावरतोय ,

चंद्राचं आपलं बरं आहे ,

कलेकलेने वाढणं कितीकिती खरं आहे ,

पाखर आपली उठताहेत , वरवर भटकताहेत ,

रोजचा घास नव्यानंच शोधताहेत ,

आम्ही माणसं मात्र अडकलोय , घाण्याचा बैलासारखं ,

त्याच त्याच खांबाभोवती , "धावतोय" असं फक्त सांगण्यासारखं ..

सोडावं वाटतं हे चाकोरीतलं जगणं ,

सुरु करावं आता मुक्त भटकणं ,

प्रतिबिंब पाण्यातले

Submitted by विश्राम कुलकर्णी on 17 September, 2023 - 05:44

पाण्यात पाहतो मी प्रतिबिंब आज माझे ,
लाटेत हेलकावे मन चिंब आज माझे ,
कोण्या दिनी सुखाची हि वाट पाहिली मी ,
किती यातना कटुता , सांभाळली मनी मी ,
वाटेत माझिया होते काटेच ते अनेक ,
रक्ताळल्या खुणांच्या जखमाच त्या अधिक ,
त्या ऊन पावसाचे सरलेच ऋतू आज ,
त्या तीव्र वेदनेचे शमलेच भान आज ,
समजावुनी मनाला मी रिक्त आज आहे ,
साऱ्याच शृंखलातून मी मुक्त आज आहे ..!!

जाणे कुठल्या दुःखाचा

Submitted by द्वैत on 13 September, 2023 - 13:57

जाणे कुठल्या दुःखाचा हा
असा लागतो नाद
देह स्वतःचा पोखरताना
ऐकू येई साद

जाणे कुठले गाणे मी
गुणगुणतो वाऱ्यावर
मेघ धुळीचा क्षितिजावरती
पांघरतो चादर

जाणे कुठले स्वप्न पाहतो
कुठल्याश्या प्रहरी
खिन्न मनाने परतून येती
काठावर लहरी

जाणे कुठल्या वाटेवर मी
शोधत फिरतो गाव
हिंदोळ्यांवर लाटांच्या या
डुलते माझी नाव

द्वैत

बोलायचे आहे मला

Submitted by JPrathamesh on 12 September, 2023 - 17:02

तुझ्या बटांच्या हिंदोळ्यावर
झुलायचे आहे मला
तुझ्या ओठीच्या हास्यासाठी
बोलायचे आहे मला
किती पावसाळे
किती चंद्र तारे
तरी पुन्हा खूपदा
बघायचे आहे तुला
विसरून जातो
मी सर्व काही
तुझ्याच साठी केवळ
जगायचे आहे मला
प्रेम कहाण्या अश्या खूप झाल्या
कहाणी नवी
बनवायची आहे मला
दिवस रात्र फक्त
स्वप्न एक आहे
तुला सुख देण्या
खपायचे आहे मला
तुझा हात येता हाती एकदाचा
इतिहास प्रेम लीला
रचायची आहे मला
-प्रथमेश जोशी

गाव बोलावते

Submitted by दत्तात्रय साळुंके on 12 September, 2023 - 11:55

वर्षे कित्येक लोटली
या शहरात येऊन
गत काळाचे धागे
गेले गावात राहून

बंध रेशमी भक्कम
परी हळवे मुलायम
दिवसातून कितीदा
नेती गावात खेचून

शिळ घालीतं उनाड
पाखरू आज रानाला
वेडं बेभान झेपावं
नाही वेसन मनाला

गुरांसंगे झालो गुराखी
दरी डोंगरी भटकंती
निर्झरात न्हाता न्हाता
मोती सर्वांग सजवती

पिलो रानवारा रानचा
धुंदावत नाचलो मी
सळसळत्या पीकाचे
बोल हिरवे झालो मी

कुठे जमवली पोरं
खेळलो खेळ लगोर
भांडण केले घणघोर
परी वाटली चिंचा बोरं

शब्दखुणा: 

हारणारा मीच!

Submitted by अभिषेक_ on 5 September, 2023 - 03:14

घातल्या शपथा किती मी या मनाला
सांज ढळता शुष्क डोळे राखण्याला

आठवांचा पूर येऊ दे तिथेही
पाहिले सांगून हळव्या पावसाला

भूक मिटते ना मनाची माणसांनी
का कळेना आतमधल्या श्वापदाला!

आज का ताऱ्यांत मजला तू दिसावी
भावनांशी चांदणे खेळी कशाला!

कोणते हे रंग आले आसमंती
चुंबले का तू नभाच्या कुंचल्याला?

भावनांचे खेळ खेळावे किती मी
हारणारा मीच रे हे उमगण्याला!

शब्दखुणा: 

कोण जाणे वेस ओलांडून गेले

Submitted by द्वैत on 4 September, 2023 - 14:14

कोण जाणे वेस ओलांडून गेले
शृंखला पायांतल्या तोडून गेले

पाखराला जाग आली मध्यरात्री
रान सारे पार थरकापून गेले

सावल्यांना फूस होती चांदण्याची
पायवाटेला दिवे सांगून गेले

पाहिले मागे वळोनी त्या क्षणाला
वाटले काहीतरी राहून गेले

ज्या फुलाला गंध होता आठवांचा
नेमके का तेच कोमेजून गेले??

द्वैत

चंद्र सूर्य आणले आरतीला

Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 September, 2023 - 02:41

हे मायभूमी मी जे
वचन तुज दीधले
तव आरतीला आज
मी चंद्र सूर्य आणले

उद्दाम रीत जगाची
विपरीतच ती कधीची
राबविली तंत्रे तयांनी
मंडूकांच्याच हिताची

जेव्हा तंत्रज्ञान त्यांस मी
मागितले मणुष्य हिता
हिणवून मज म्हणाले
होतसे भिकारी काय दाता?

कोणी न पुसतो कधी
दुबळ्यांस या जगात
जाणून हेच सत्य मी
आणले बळ मनगटात

उद्दाम जरी ते होते
घमंडी आपुल्याच तो-यात
संकट समयी मीच दिले
तयांना माणुसकीचे हात

वसुधैव कुटुम्बकम्
हा नारा सनातनाचा
हा बलशाली भारत देश
कृष्ण आणि रामाचा

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन