गाव बोलावते
वर्षे कित्येक लोटली
या शहरात येऊन
गत काळाचे धागे
गेले गावात राहून
बंध रेशमी भक्कम
परी हळवे मुलायम
दिवसातून कितीदा
नेती गावात खेचून
शिळ घालीतं उनाड
पाखरू आज रानाला
वेडं बेभान झेपावं
नाही वेसन मनाला
गुरांसंगे झालो गुराखी
दरी डोंगरी भटकंती
निर्झरात न्हाता न्हाता
मोती सर्वांग सजवती
पिलो रानवारा रानचा
धुंदावत नाचलो मी
सळसळत्या पीकाचे
बोल हिरवे झालो मी
कुठे जमवली पोरं
खेळलो खेळ लगोर
भांडण केले घणघोर
परी वाटली चिंचा बोरं