बोलावते गाव फिरुनी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 21 January, 2025 - 00:06

पैसे चार कमवाया, या शहरात आलो मी
सांडले गाव मागे अन, गर्दीत विरलो मी
सरले निवांत जगणे , इथे कसा रमलो मी ?
घेऊनी नवा चेहरा हा,माझ्यातला हरवलो मी

गर्दीत कुणा माणसाला, पुसले कुशल कधी मी
तुसडा कटाक्ष बोलला, अनोळखी गावंढळ मी
साहून हेटाळणी अशी, नकळत बदललो मी
गंधहीन कागदी फुलात रानफुल हरवलो मी

या वाकड्या नळाच्या, पाण्याची रितच न्यारी
सारीच माणसे वाकडी, समीकरण मांडतो मी
अन् देवासही चारित्र्य दाखला मागतो मी
विक्षिप्त वागणे माझे, त्याचा गर्व करितो मी

रोज चोरी मारामारी, नजरेसमोर माझ्या
तरीही असा साळसूद, आंधळा होतो मी
एकाच मजल्यावर जरी राहतो आम्ही
तरी शेजारी ही ओळखत नसतो मी

नको सहानुभूती कुणाची दिखाऊ
आपुल्याच विश्वात बंदिवान होतो मी
अन् शेवटी कुशल माझे, मलाच पुसतो मी
सय गावाची येताच, गहिवरतो मी

गजबजाट माणसे, घरे, गाड्यांचा सारीकडे
शांत निळ्या नदीकाठच्या वाटा शोधतो मी
स्वप्नात गावातले, दीप चांदण्याचे पाहतो मी

ममतेचे गाव माझे बोलावते मज फिरुनी,
पण अडखळती पावले, निघाया इथुनी
मन माझे ओढाळ, नशेखोर, न ये आवरोनी

जगणे तिथे ही होते, आहे तसेच अजुनी
चार दोन रुपयांसाठी, येथे गहाणात पडलो मी
बोचते शय्या फुलांची, झोप रात्री नसे येथं
तारकांच्या मंडपात तेथं, गोधडीत जोजवलो मी

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान
गंधहीन कागदी फुलात रानफुल हरवलो मी>>>> मस्त

ऋतुराज
कुमार सर
जिओ

अनेकानेक धन्यवाद...