ऐ रंगरेज़ मेरे...

Submitted by स्वाती_आंबोळे on 30 October, 2023 - 09:42

खरंतर रंगवायला दिली होती ती फक्त ओढणी. बाकी माझा पहनावा माझ्या आवडीचा, माझी ओळख सांगणाराच असायला हवा, नाही का? अगदी मोठ्या हट्टाने प्रियतमाच्या रंगात रंगवायला सांगितली होती. तेवढंच त्याला मोठेपणा दिल्यासारखंही होईल, चारचौघांत त्याची लाडकी म्हणून मिरवताही येईल, आणि माझी मी असताना वाटलं तर काढून बाजूला ठेवेन - अशी आपली माझी कल्पना!

पण जळलं मेलं लक्षण त्या रंगार्‍याचं आणि या कापडाचं! ओढणीवरचा त्याचा रंग नुसता कपड्यांवरच लागला नाही, तर
बघता बघता मी अंतर्बाह्य त्यात रंगून गेले! हा बसंती रंग असा पक्का बसला तनामनावर, की दुसरं काही दिसेसुचेनासं झालं!

तश्शी तरातरा गेले जाब मागायला रंगार्‍याकडे - तर तो उलट मलाच विचारायला लागला, 'कुठल्या रंगाबद्दल म्हणताहात?'!

म्हटलं, 'काय गांजाबिंजा चढवलास की काय! रंगांबद्दल मी तुला सांगायचं की तू मला?!
वेगवेगळ्या मोसमांत वेगवेगळे रंग ल्यायला किती आवडायचं मला! आणि आता बघ हे काय करून ठेवलंस! दिवस, मास, ऋतू बदलले तरी जाता जात नाहीये हा रंग! वेड लागायची पाळी आली आहे नुसती!

पण खरं सांगू, आता हाच रंग हवाहवासाही वाटतो आहे मला!

आता असं कर ना, याचाच आणखी एखादा थेंब प्रेमाने घाल तुझ्या त्या मिश्रणात, आणि माझं म्हणून जे काही उरलंसुरलं असेल नसेल तेही रंगवून काढ त्याच्या छटेत! घरदारच का, सारं चराचर, सार्‍या दिशा, सार्‍या मर्यादा, सारे अडसर, सारे यमनियम आणि देवधर्म, इह आणि परलोक, आसक्ती आणि तृप्ती, स्वप्नं आणि जागृती, मीलन आणि वियोग, सारं सारं माझ्या प्रियसख्याच्या रंगात न्हाऊन जाऊ दे!

मी भांडायला म्हणून आले आणि आता हे असं बोलते आहे म्हणून हसतोस मला? पण थांब, आधी सांग, तू कोण आहेस रंगरेज़ा? तुझा खरा रंग कुठला आहे? मला हा रंग आणि तू निराळे कसे ते सांगताच येत नाहीये बघ!

की तू, मी, माझा प्रियतम, आपण निराळे नाहीच आहोत? कधीच निराळे नव्हतो? ज्याच्या प्रेमात मी अशी वेडी झाले आहे तो तूच होतास? तूच रंगवणारा आणि तूच रंगही? तू शय्या, तूच सखा आणि तूच त्याच्यासह केलेला संगही? तूच प्रवाह, तूच नावाडी आणि तूच नावही? बुडायचं ते तुझ्यात आणि तरलं तर गाठायचा तो तुझाच किनारा? तूच वाट, तूच वाटाड्या, अन् पोचायचं ते तुझ्याचपाशी? तारणारा तूच, मारणारा तूच, निवाडा करणाराही तूच? तूच स्वामी, तूच गुरू? तूच पूर्व आणि पश्चिमही? मग तू नाहीस असं आता उरलंच काय? तुझ्याशिवाय मी जाणार तरी कुठे? आणि कुठे जायला मी उरलेच आहे कोण!’

कबीर असंच म्हणाला होता ना,
'जब मोरी चादर बन घर आई, रंगरेज को दिनी
ऐसा रंग रंगा रंगरे ने, लालो लाल कर दिनी
चदरिया झीनी झीनी॥'

तीच तऱ्हा
अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग।
मी-तू-पण गेले वाया। पाहतां पंढरीच्या राया॥

म्हणणाऱ्या संत सोयराबाईंची!

देहभान हरपून केलेलं उत्कट प्रेम आणि भक्ती यांत फरक कुठे असतो नाहीतरी?

मोठमोठे योगी, पंडित, तत्त्वज्ञानी अद्वैताविषयी बोलतात, ‘ध्याता-ध्येय-ध्यान’ या त्रिपुटीच्या पल्याड पोचण्यासाठी धडपडतात. आणि कबीर म्हणतो तशी 'ढाई आखर प्रेम का' - ‘प्रेम’ ही अडीच अक्षरं ज्याला कळली त्याला क्षणार्धात ही ‘मी-तू-पणाची बोळवण’ साधते!
क्षणार्धात आणि विनासायास! ‘तादात्म्य’ असा एक फार सुंदर शब्द आहे त्याला!

ज्याप्रमाणे आपल्या दृष्टीला जगाचा अनुभव प्रकाशामुळे होतो, अगदी अंधाराचं वर्णनदेखील ‘प्रकाशाचा अभाव’ असंच - प्रकाशाच्या संदर्भानेच करावं लागतं, तसं प्रेमात/भक्तीत प्रिय व्यक्तीच्याच अनुषंगाने सगळ्या जगण्याचा अर्थ लागतो!

म्हणूनच आमचा ग़ालिब नवल करतो,
जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद
फ़िर ये हंगामा ऐ ख़ुदा क्या है?!

क़ैसची गोष्ट ऐकली असेल तुम्ही. वाळवंटात सोडून आले होते बादशहाचे शिपाई त्याला! अन्नपाण्यावाचून फिरत होता रखरखाटात, पण त्याला ना तहानभुकेची तमा होती, ना उन्हाचे चटके जाणवत होते! एकच वेड होतं त्याला - लैलाचं. असा 'जुनून' डोक्यावर सवार झालेला म्हणून त्याला मजनू म्हणायला लागले लोक. लैला भेटायला आल्याचं कुणीसं सांगायला गेलं तर म्हणे हा म्हणाला, 'लैला? ती कशी येईल? ती तर माझ्यातच आहे! लैला तर मी आहे!'

असं वेड ज्यांना लागतं ते भाग्यवान, नाही का?!

**************************

तळटिपा:
'तनु वेड्स मनु' चित्रपटातल्या 'ऐ रंगरेज़ मेरे' गाण्याबद्दल लिहिण्याची मागणी अस्मिताने केली होती. मला कळला, जमला तसा भावानुवाद लिहिला आहे.

राजशेखर यांनी लिहिलेल्या, आणि कृष्णा सोलो यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचे शब्द आणि कठीण शब्दांचे अर्थ खाली देते आहे.
सादरीकरण मात्र वडाली बंधूंनी गायलेलंच ऐका अशी आवर्जून शिफारस करेन.

ऐ रंगरेज़ मेरे ऐ रंगरेज़ मेरे, ये बात बता रंगरेज़ मेरे
ये कौन से पानी में तूने कौन सा रंग घोला है
कि दिल बन गया सौदाई, मेरा बसंती चोला है

अब तुमसे क्या मैं शिकवा करूँ, मैनें ही कहा था ज़िद कर के
रंग दे चुनरी पी के रंग में, पर मुए कपास पे रंग न रुके
रंग इतना गहरा तेरा कि जान-ओ-जिगर तक भी रंग दे

रंगरेज़ तूने अफ़ीम क्या है खा ली, जो मुझसे तू ये पूछे कि कौन सा रंग
रंगों का कारोबार है तेरा! ये तू ही तो जाने कौन सा रंग!
मेरा बालम रंग, मेरा साजन रंग,
मेरा कातिक रंग, मेरा अगहन रंग
मेरा फ़ागुन रंग, मेरा सावन रंग
पल पल रंग दे रंग दे मेरे आठों पहर मन भावन रंग

एक बूँद इश्किया डाल कोई तू मेरे सातों समन्दर जाएँ रंग
मेरी हद भी रंग, सरहद भी रंग, बेहद रंग दे, अनहद भी रंग दे
मंदिर मस्जिद मैकद रंग दे!
रंगरेज़ मेरे दो घर क्यूँ रहें? एक ही रंग में दोनों घर रंग दे
पल-पल रंग दे रंग दे रंग दे रंग दे, नैहर-पीहर का आँगन रंग
पल-पल रंग दे रंग दे रंग दे मेरे आठों पहर मन भावन रंग
नींदें रंग दे, करवट भी रंग, ख़्वाबों पे पड़े सलवट भी रंग
ये तू ही है, हैरत रंग दे, आ दिल में समा, हसरत रंग दे
अब आजा और वसलत रंग दे, जो आ ना सके तो फ़ुरक़त रंग दे
दर्द-ए-हिज्रा लिए दिल में मैं ज़िंदा रहूँ, ज़रूरत रंग दे

रंगरेज़ मेरे, रंगरेज़ मेरे, तेरा क्या है असल रंग?
अब तो ये दिखला दे!
मेरा पिया भी तू, मेरी सेज भी तू, मेरा रंग भी तू, रंगरेज़ भी तू
मेरी नैया भी तू, मझधार भी, तुझमें उभरूँ, तुझमें डूबूँ
तेरी हर इक बात सर आँखों पे, मेरा मालिक तू मेरा साहिब तू
मेरी जाँ मेरी जाँ तेरे हाथों में! मेरा कातिल तू मेरा मुंसिब तू
तेरे बिना कुछ सूझे ना! तेरे बिना कुछ सूझे ना!
मेरी राह भी तू, मेरा रहबर तू, मेरा अकबर तू, सर्वर भी तू
मेरा मग़रिब तू, मेरा मशरिक़ तू, जाहिद भी मेरा, मुर्शिद भी तू
अब तेरे बिना मैं जाऊँ कहाँ? तेरे बिना मैं जाऊँ कहाँ??

रंगरेज : कापड रंगवणारा (dye करून देणारा) रंगारी
सौदाई : वेडा (आणखी एक अर्थ व्यापारी असाही आहे, पण इथे contextनुसार हा अर्थ लागू होतो)
बसंती : साधारणपणे पिवळ्या झेंडूच्या फुलाचा असतो तसा रंग. अगदी केशरी-भगवा नाही, आणि पार पिवळाही नाही. दोन्हीच्या मधली छटा.
भगवं वस्त्र जसं आपण वैराग्याचं प्रतीक समजतो तसाच एखादा ध्यास लागून त्यापायी बाकी सगळं जग विसरणार्‍यांनी 'बसंती चोला' परिधान केला आहे असं म्हणतात. शहीद भगतसिंगांची 'मेरा रंग दे बसंती चोला, माये' ही रचना आठवते ना?
शिकवा : तक्रार
मुए : कलमुहा - ‘काळतोंड्या’सारखी शिवी
कपास : कापूस / सूत
कातिक : कार्तिक, अगहन : अग्रहायण (मार्गशीर्ष), फागुन : फाल्गुन, सावन : श्रावण हे महिने
इश्किया : प्रेमाखातर (in the name of / for the sake of love)
हद : मर्यादा, सरहद : सीमारेषा, बेहद : अमर्याद, अनहद : अपार
मयक़द/मयक़दा : मद्यशाला
नैहर-पीहर : माहेर-सासर
करवट : कूस बदलणे, स(सि)लवट : चुणी
हैरत : नवल (sense of wonder), हसरत : इच्छा
वसलत : भेट / मीलन, फ़ुरक़त : ताटातूट, फारकत
हिज्र : विरह
मझधार : नदीच्या पात्राच्या मध्यातला वेगवान प्रवाह (काठापाशी प्रवाहाचा वेग कमी असतो)
क़ातिल : मारेकरी, मुन्सिफ़ : न्यायाधीश
रहबर : वाटाड्या, अकबर : थोर नेता, सर्वर : तत्त्वज्ञ
मग़रिब : पश्चिम, मशरिक़ : पूर्व
जा़हिद : धर्मगुरू, मुर्शिद : गुरू

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहेस...
मला टायटल बघून आधी वाटलं की भाग मिल्खा मधल्या ओ रंगरेज बद्दल लिहिलं आहेस... पण वाचायला लागल्यावर लिंक लागली...

मस्त!
तूच रंगवणारा आणि तूच रंगही? तू शय्या, तूच सखा आणि तूच त्याच्यासह केलेला संगही? तूच प्रवाह, तूच नावाडी आणि तूच नावही? बुडायचं ते तुझ्यात आणि तरलं तर गाठायचा तो तुझाच किनारा? >>> इतक्यातच झालेल्या "आता आमोद सुनांसि आले " संदर्भातल्या चर्चेची आठवण झाली!! नेमकी तीच भावना आहे इथे!

मस्त लिहिलं आहेस.
वडाली बंधूंचं गाणं ऐकून अंगावर काटा आलाय. काय चाल, काय आवाज... मधले पेटीवरचे पीसेस तर धबधब्याच्या टोकावर नेऊन धाडकन खाली ढकलून देऊन परत समेवर अलगत झेलून परत दुसर्‍या क्षणाला नजाकतीने वर चढवत त्या उंच टोकावर परत नेणारे. कुठे जादू नाही, फक्त स्वच्छ सूर! गाणारे सुरांवरुन उड्या मारत आहेत, तर पेटीवाला/ली मधल्या पोकळ्या दाखवत दाखवत टेकू देतोय.
माझ्या डोळ्यासमोर अम्युझमेंट पार्क मधली राईड आली. त्या उंचच उंच ट्रसेसचय स्टक्चरवर वर चढणारी सुरांची गाडी आणि त्या सुरांनी उडी मारली की मधली पोकळी भरुन काढत अँकर करणारी पेटी. वरवर चढू लागलं की आकाश आणखी उंच उंच दिसू लागतं, त्याला हात पोहोचला वाटताना, अजुन वर काही तरी सुंदर दिसतं. आणि मग ते सर करायला आणखी टेकू दिसत रहातात असं झालंय!
म.हा.न!
मेड माय डे! आज फक्त हेच ऐकेन बहुतेक Happy

खूप सुरेख झाले आहे हे. अगदी मला अपेक्षा होती तसेच, कदाचित त्याहीपेक्षा सरस. Happy अगहन-कातिक सगळेच शब्द किती सुंदर आहेत. तुझा अनुवाद कलाकृतीच्या प्रवाहाप्रमाणे वाहतो, फार नैसर्गिक आणि लयबद्ध वाटतं.

वडाली बंधूंनी गायलेलं फार आवडलं, सूफी नसूनही सूफी भासलं.
>>>>>
प्रवाह, तूच नावाडी आणि तूच नावही? बुडायचं ते तुझ्यात आणि तरलं तर गाठायचा तो तुझाच किनारा? तूच वाट, तूच वाटाड्या, अन् पोचायचं ते तुझ्याचपाशी? तारणारा तूच, मारणारा तूच, निवाडा करणाराही तूच? तूच स्वामी, तूच गुरू? तूच पूर्व आणि पश्चिमही? मग तू नाहीस असं आता उरलंच काय? तुझ्याशिवाय मी जाणार तरी कुठे? आणि कुठे जायला मी उरलेच आहे कोण!’

>>>>> हे तादात्म्य मला 'रांझना' मधल्या 'तुम तक' गाण्यातही जाणवते. एका लेखात तसं लिहिलं होतं.
नैनो के घाट ले जा नैनो की नैय्या
पतवार तू है मेरी, तू खेवैया
जाना है पार तेरे, तू ही भंवर है
पहुँचेगी पार कैसे नाज़ुक सी नैय्या

फार सुंदर रसग्रहण!
मला टायटल बघून आधी वाटलं की भाग मिल्खा मधल्या ओ रंगरेज बद्दल लिहिलं आहेस >> +१

सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.

अवल आणि अस्मिता, तुमचे लेख वाचले - अगदी तोच प्रत्यय!

>>> तक्यातच झालेल्या "आता आमोद सुनांसि आले " संदर्भातल्या चर्चेची आठवण झाली!! नेमकी तीच भावना आहे इथे!
अगदी!

सुरेख ! सुरेख ! पहिल्या पॅरामधे एकदम किशोरी बाईंच्या आवाजतले रंगी रंगला आठवले नि पुढे त्याचा उल्लेख आलाच. इतकी वर्षे ऐकतोय नि दर वेळी पहिल्या दोन मिनिटांमधे तीच तंद्री लागते.

मला तर मूळ गाण्यापेक्षा स्वातीचा रसास्वाद अधिक आवडला..कारण तो जास्ती छान समजला, भावला!
मूळ गाणं..तुम्हा सर्वांना आवडलं असेलही कदाचित.. पण मला कल्लोळच अधिक वाटला.... Happy

सुंदर लेख
मूळ गाणं..तुम्हा सर्वांना आवडलं असेलही कदाचित.. पण मला कल्लोळच अधिक वाटला>> सिनेमातल ऐका. मला दोन्ही आवडतात

कशावर ऐकताय ते ही महत्त्वाचं आहे. मी आज काम करत असताना हेडफोन्सवर ऐकलं आणि मग कार मध्ये परत लावलेलं.
हेडफोन्सवर ऐकताना येणार अनुभव आणि कारच्या स्पिकरवर येणारा अनुभव पार भिन्न होता. मला माझ्या कारचे स्पिकर चांगले वाटायचे. म्हणजे अजुनही असतील पण हेडफोन्सवर नॉईस कॅन्सलेशन + फोकस इ. होत असल्याने तो कल्लोळ ऐकून अंगावर काटा आला. तेच कार मध्ये बारक्या (आणि मोठ्याही) गोष्टी टोटली मिस होत होत्या.

मस्त लिहीले आहे! अशी गाणी त्यातले अर्थ पोहोचले की जास्त भावतात. काही आपल्याला ऐकता ऐकता क्लिक होतात, तर काही कोणीतरी अशी उलगडून सांगावी लागतात. हे दुसर्‍या प्रकारातले. खालच्या मिनि-डिक्शनरीबद्दलही धन्यवाद. काही शब्द माहीत होते पण सगळे नाही.

बाय द वे, मुन्सिब म्हणजे वकील का?

ही "रंग दे" स्टाइल प्रसून जोशीने रंग दे बसंती मधे वापरलेली दिसते. नस्ले रंग दे, फसले रंग दे वगैरे.

यातले काही शब्द गेल्या काही वर्षांत इतर गाण्यांत भेटले आहेत. देस मेरा रंगरेज ये बाबू या पीपली लाइव्हच्या सुरूवातीच्या गाण्यात रंगरेज भेटला. रणबीरच्या "बुलेया" मधे मुर्शिद. हिज्रा चाचांच्या "गुलामी" मधल्या गाण्यात - बहाल-ए-हिज्रा.

ही "रंग दे" स्टाइल प्रसून जोशीने रंग दे बसंती मधे वापरलेली दिसते. नस्ले रंग दे, फसले रंग दे वगैरे.

यातले काही शब्द गेल्या काही वर्षांत इतर गाण्यांत भेटले आहेत. देस मेरा रंगरेज ये बाबू या पीपली लाइव्हच्या सुरूवातीच्या गाण्यात रंगरेज भेटला
>>
रंग दे बसंती च्या तू वर लिहिलेल्या गाण्यातही रंगरेज आहे

रंगरेज मेरे सबकुछ रंग दे,
मोहे मोहे तू रंग दे बसन्ती यारा
मोहे तू रंग दे बसन्ती ...

यातले काही शब्द गेल्या काही वर्षांत इतर गाण्यांत भेटले आहेत. +१००
भाग मिल्खा भाग सिनेमातले 'ओ रंगरेज' हे देखील एक अतिशय सुंदर गाणं आहे

रंग दे बसंती च्या तू वर लिहिलेल्या गाण्यातही रंगरेज आहे >>> ओह. थॅन्क्स अँकी. हे लक्षात आले नव्हते.

सर्व नवीन अभिप्रायदात्यांचे आभार. Happy
खरंतर आभार अस्मिताचे मानायला हवेत, तिने सूचना केल्यामुळे लिहिलं हे. Happy

तिला परवा म्हटलं तसं काही कलाकृतींबद्दल किती बोलू आणि किती नको असं होतं एकेकदा (आठवा : पीएस Proud ), तर या गाण्यासारख्या कलाकृती नि:शब्द, अंतर्मुख करतात. मग काहीही लिहावं तर उगाच पांढर्‍यावर काळं करतो आहोत असं वाटतं.
सगळ्या प्रशंसेच्या प्रतिक्रियांचा आदर राखूनही खरं सांगायचं तर यात अनुवादापलीकडे माझं काही श्रेय नाही. Happy

'रंगरेज़'वरून अलीकडच्या बर्‍याच गाण्यांची आठवण निघाली आहे वरती. त्यांचा आद्य प्रणेता कबीराचा लेखात उल्लेख केलेला (चदरिया झीनी झीनी) अभंग आहे - तो आयुष्य रंगवून टाकण्याचा 'मोटिफ' त्याचा.

फा, मुन्सिब (मुन्सिफ़) म्हणजे निवाडा करणारा - न्यायाधीश/पंच.
बाय द वे, तुला 'हमरी ना मानो रंगरजवा से पूछो' कसं नाही आठवलं? Happy

मंदार, गाणं ऐकते, आणि नक्की प्रयत्न करते, धन्यवाद. Happy

तुम्ही लिहीलेलं इतकं तरल असं काही अद्याप वाचनात आलेलं नव्हतं.
खूपच सुंदर आहे हे. शब्द कमी पडतील.
दिन बन गया..
ऐकतोय आता. प्रतिसाद पण राहिलेत वाचायचे...

>>> 'क्षेम देऊ गेले तव मी ची मी एकटी' पण असाच भाव आहे ना.
हो, अगदी असाच.

त्या 'तू ही तू सतरंगी रे' गाण्यावरून प्रेमाच्या ७ पायर्‍यांबद्दल (दिलकशी, उन्स, इश्क़, अकी़दत, इबादत, जुनून आणि मौत) वाचलं होतं.
हिंदू तत्वज्ञानात सांगितलेल्या 'मुक्ती'च्या चार पायर्‍यांची ('तेणे मुक्ती चारी साधियेल्या') कल्पना साधारण तशीच आहे - सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या त्या चार मुक्ती.
आपल्या दैवताशी सान्निध्य साधत साधत शेवटी त्याच्यात विलीन होण्याचा प्रवास.

धन्यवाद, आचार्य Happy

Pages