मी

Submitted by श्रीराम_देशपांडे on 26 October, 2023 - 04:28

कुणालाही शोधत नाही कधी मी
कुणाला सापडत नाही कधी मी

मी नावडता जरी नसलो कुणाचा
कुणाला आवडत नाही कधी मी

अनादर भावनांचा का करावा?
मनाला गुंतवत नाही कधी मी

अशक्त, कमकुवत नात्यांचा गुंता
उगाचच सोडवत नाही कधी मी

उचलले गेलेले मुर्दाड मुद्दे
मुखाने टोलवत नाही कधी मी

हवे तेव्हा घरी येऊन जाते
सुखाला बोलवत नाही कधी मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users