दुष्काळ

Submitted by दत्तात्रय साळुंके on 6 August, 2023 - 01:40

दिवसभर कोंदटलेल आभाळ
बर्फासारखा थंडगार वारा
वाटतं कधीही बरसतील धारा
पण पोकळ पर्जन्यभास सारा

पाऊस काय, पुढारी काय
अगदी बांधापर्यत येतात
अन् फक्त वचनं बरसतात
माणसं कुठं बरं चुकतात ?

टीचभर ओलीवर पेरलेल्या
आशा आकांक्षा वटतात
स्वप्नांचे धुमारे फुटण्या आधी
कायम माना टाकतात

वावराच्या तडा गेलेल्या आरशात
दिसतात विवश चेहरे ठिकरलेले
सैरभैर, धरणाच्या कामावर
खडीच्या ढिगा-यावर विखुरलेले

आत्मसन्मान रोज ठेचताहेत
आपल्याच हातातल्या हातोडीनं
नियतीचा फेरा चुकत नाही
असं काहीसं पुटपुटत तोंडानं

पाण्याच्या टॅंकर भोवती
पडतात माणसांची कडी
अगदी गुळाला मुंगळा
चिपकावा तशी तगडी

दूर कुठेतरी चकचकीत शहरात
वातानुकूलित सभागारात
आम्ही एवढे दिले,तुम्ही एवढेच
दणदणीत भाषणं झोडताहेत
स्नेहभोजन पंगती उठतात
आणि अधिवेशनं सरतात

वर्षानुवर्षे हेच उदास चित्र
एकाचा दुष्काळ, दुस-याचा सुकाळ
असाच असतो का हो
लोकांचा, लोकांसाठी लोकशाही खेळ

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users