घन तमी...
दुपारची उन्हं कलली, सूर्य अस्ताला जाऊ लागला की पश्चिमेच्या क्षितिजावर लालिमा चढते. हळूहळू सूर्य अस्ताला जातो आणि पश्चिमेचे रंग अधिकच गहिरे होत केशरी, गुलाबी, जांभळे, करडे होत होत हळू हळू अंधाराची धार गडद होत जाते आणि त्याच वेळी पश्चिमेला शुक्र चमकताना दिसू लागतो. ज्यावेळी आकाशातील गहिरे होत जाणारे रंग पश्चिम क्षितिजावर लोप पावत असतात, त्याचवेळी शुक्र मात्र एकटाच दिमाखात तेजस्वीपणे उठून दिसत असतो. तसे पाहिले तर शुक्र हा आकाशातील एक ग्रह, आपल्या सूर्य मालेतलाच. तरीही, तो ज्या वेळी आकाशात आपल्या असल्याने आपले लक्ष वेधून घेतो त्यासाठी त्याला शुक्र तारा हे पद मिळालेले आहे.