वरूणराजा
पावसानं घातलं थैमानं
नद्यांना आलंया उधाणं
काय करावं कळंना कुणाला
जनता झाली हैराणं
आत्ताच काही दिवसापूर्वी
व्हता ह्यो भलताच रूसला
किती वाट पाहिली सार्यांनी
तरी ह्यो बाबा नव्हता बरसला
हैराण होती जनता सारी
चिंतेत होता शेतकरी
मग एकेदिवशी आगमन झाले
ऐटीत याचे धरतीवरी
हा आला अन् सुखावले सारे
आनंदित झाले मनातूनी
बरसत गेला भरली धरणे
तरीही पेटला जिद्दीनी
आता मात्र नको नको
म्हणण्याची वेळ आली आहे
वरूणराजाने आता थोडे
थांबण्याची वेळ आली आहे