संसाराची सप्तपदी मी
धरून हाता तुझ्या चालले ;
वाट बिकट - ना मजला कळले
मुक्कामी मी कशी पोचले !
भाजलेल्या मी पोळीचा
नकाशा कधी गोल नसे,
कौतुकाची छान कशी रे
त्याला दाद तुझीच असे !
उत्साहाने केलेली मी
भाजी शिजलेलीच नसे-
चेहऱ्यावरी भाव तरी तव
आनंदी का खास दिसे !
अर्धाकच्चा पाणीदार तो
खडेयुक्त जरि भात असे -
मुखातुनी पण तुझ्या कशी
ती ' वा वा ' ची तान वसे !
तुझ्या पावलावरी ठेवुनी
पाऊल मी चालत आहे -
अर्धांगी मी पूर्ण तरी
गमक साथ रे तुझीच आहे !
माझ्या तळहातावरून रेषा वेड्यावाकड्या धावी
कुठल्याश्या झाडाची मुळे जणू जमिनीत खोल रुतावी.
यांच आयुष्य जगते मी की या माझ्यामुळे जगतात?
माझ्या गतजीवनातून प्राण शोषतात की या माझ्या भविष्यावर तगतात?
गहिऱ्या या लकिरीन्शी नात आहे माझं गहिरं.
मला त्यांची सोबत असते, त्यांना तरी कोण आहे दुसरं!
http://shabdaspandan.blogspot.com/
रवीशुक्राच्या राज्यी सान्ग मजला सान्ग रमणी
काय लिहीले मम भाळी सान्ग रमणी सान्ग ग...
गोष्टी मान्डल्या घरातील
बारा दालने बार राशि
मन्गळ शनी रवी शशी
सान्गती कहाणी हर जन्माची
नशीब बनवीती नशीब ठरवीती
कोणाने ती प्रसन्न होती....?
सान्ग मजला सान्ग रमणी........
नाद हा बरा नव्हे
ठावे मजला बरे
तरी वेडे मन माझे
या १२ दालनात जडे
वेड ह्याचे तुला ठावे
सान्ग रमणी सान्ग मजला
रहस्य बारा घरान्चे.......!!!!
"प्रेम"
मी डाफरता तू शांत रहावे
तू ओरडता मी गप्प बसावे-
मौनातच नजरांनी हसावे
बहुधा हेच ते 'प्रेम' असावे !
"बदला"
काल कावळा दारी 'काव'ला
तरी पाहुणा नाही टपकला !
ध्यास मनी घेता दिसली पंढरीची वाट
विठ्ठलाचे नाम घेता सरला पहा घाट |
तुळशीमाळ हाती घेऊ मुखी ठेऊ नाम
जीवनात राहू देऊ सदोदित राम |
संसारात नित्य कष्ट आपुल्या जिवाला
नाम घेणे ठरते इष्ट घोर ना जिवाला |
करू यातना अर्पण चंद्रभागेपोटी
नाम नेईल तारून सुखाच्याच भेटी |
दु:ख हानी दूर पळते येऊनिया वीट
शांती समाधान मिळते मंदिरी अवीट |
डोळ्यामध्ये घेऊ आता रूप साठवून
विठ्ठलाला शरण माथा चरणी टेकवून |
जीवनाला अर्थ गाता ग्यानबाची ओवी
राम राम घेऊ जाता तुकोबाच्या गावी |
(चाल : गंगा जमुना डोळयात उभ्या का -)
होंडा इंडिका थाटात उभ्या का
जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा... |धृ |
कडकडुनी तू मिठी मारता, डोळे
माझेपण झाले ओले, चुकवित तोंड बळे
आठवले सारे सारे गहाण ते गाळे
तुज कर्जाचे भय न संगती, जा |१| जा मुला जा....
श्रीमंत उभी सासरा नि सासू जोडी
बघ धूड सासुचे हसले तोंड ती वेंगाडी
पूस रे डोळे या सदऱ्याने - आवर ती जाडी
रूप दर्पणी नसे देखणे, जा |२| जा मुला जा....
आय.टी.ची ती सून वाढत्या पगाराची
जमले तिचे रे कैसे तुजवर लव्ह - लफडे
हटू नकोस मागे मागे काम कितीही पडे
चिता आणि कविता...
दोघीत तसा फार फरक नाहीच...
चिता रचतात आणि कविताही....
दोघीही माणसाला दुसर्याच दुनियेत घेऊन जातात.
एक सूक्ष्म फारक मात्र नक्कीच आहे दोघींमध्ये...
चिता रचणार्याला जाळत नाही.... कधीच!
आकाशी पक्षी
उडतात मजेत
शिकारी खिन्न
हाती लपली
चार फुले चाफ्याची
शीळ वाऱ्याची
निजरूपाचे
कुतूहल बाळाचे
आरसा खूष
पुढे दगड
पडलेले रग्गड
मी का शहाणा
उत्सुक डोळे
पिंडापाशी कावळे
मोकळा आत्मा
पुन्हा पाऊस पुन्हा एक कविता.. तशी जुनीच आहे.
आत्ताच पाऊस पडून गेला
त्याचा हवेतील ओलावा अजून जाणवतोय
सर्वस्व देऊन रीता झालेला तो
पांढर्या पुंजक्यांतून खुणावतोय
अंग चोरुन बसलेलं रोप
थंडीने शहारलंय
त्याच्या पानात लपवून पाणी
मोत्यांनी बहरलंय
एका ओल्या तारेवर
एकटाच ओला पक्षी
त्याची समाधी न्याहाळतेय
पाण्याची ओघळ नक्षी
पारव्यांच्या जोड्या गेल्या
ओसरीत ओसरीला
माझा राजस गं भला
एक सांगे दुसरीला
एक छोटंसं पिल्लु
रुसून गूपचूप बसलेलं
आता आईला शोधताना
चिंब चिंब भिजलेलं
त्याच्या डोळ्यातील पाऊस
त्याच्या आईला शोधतोय
पाऊस थांबला तरी तो
त्याच्या आसवांत भिजतोय
तुझे नक्षत्रांचे देणे..
माझ्या मनात दाटलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!!!
एकांती आर्त स्वरांनी..
विरहात रंग भरले,
स्मरणात तुझ्या गुंतुनी..
माझे 'मी' पण विरले,
मुग्ध ह्या भासांनी..
माझे जीवन भारलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!!
तुझे नक्षत्रांचे देणे..
माझ्या मनात दाटलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!