कविता - माणूस नावाच एक झाड असत !
झाड
माणूस नावाचं एक झाड असतं !
रंग, रूप, आकार विविध तरी
सर्वांचं मूळ - मन एकच असतं
त्या मनाच्या गाभ्यातून बीज अंकुरतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !
प्रत्येक दिवसाचं पान उगवतं
नवं खुलतं, जुनं गळतं !
कधी आठवणींच्या फांदीवरती
हिरवा फुलोरा बनून टिकून राहतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !
प्रत्येक ऋतूचा अनोखा रंग, गंध
पिवळा रुक्ष, ओला हिरवा वृक्ष
लाल गुलाबी शेंदरी, पानांत खुलतं
जुनी कात टाकून ऋतुरंगात न्हातं,
माणूस नावाचं एक झाड असतं !
बोलाविले म्हणून....!!
----------------
बोलाविले ओठांनी तुझ्या आसवे ही प्यायला
आतुरलेल्या नयनांनी हि अमृत मिठी ल्यायला
**
बघ गंध ही गंधाळला तुझ्या बहरल्या प्रीतिने
काय मोग-याने फुलावे धुंद गंध व्हायला
**
मी चांदणे पिऊन आलो तु चंद्रिका होशिल का?
पाखरांचे पंख लेउनी प्रीतित गाणे गायला
**
धाडीले शब्द माझे की तुला शोधावया
येशील का तु गंधुनी फेर धरूनी नाचायला !
**
हे गीत माझे गाऊ लागले ती प्रीत ग
अन अंतरिचे बोल माझे लागले डोलायला
**
प्रकाश साळवी
०८/०४/२०१७
फत्थरांच्या इमल्यांचे जंगल सभोवती वाढते आहे
या भकास वातावरणात मला तुझ्या झाडांचे स्मरण होते आहे
तुझे झाडांवरील प्रेम, त्यांच्या वाढीसाठीचा कळवळा
आता मात्र नुसती झाडेतोड , ही धरा सहते आहे
हिरव्यागार त्या पाचूवनात पाऊस येई मृदगंध दरवळे
उजाड या शहरात पाऊस पूर बनून कोसळतो आहे
उकाडा वाढतोय , पूर्वीची ती मंद हवा आता उदास भासते आहे
विकासाच्या या हव्यासात मला तरी तुझ्या झाडांचे स्मरण होते आहे
(प्रेरणा: http://www.maayboli.com/node/62719 )
आंच वाढते सृष्टीची
उकळते माझे मन |
त्याला आवरण्यासाठी
वर ठेवतो झाकण |
माझ्या हिरवेपणाचा
रंग देऊन टाकला |
देऊनिया साही रस
झालो सर्वस्वी मोकळा |
उतरती रंग-रस
सारे मनाच्या पक्वान्नी |
आंच वाढता पुनश्च
झाले कोरडे बाजूंनी |
डोळे सृष्टीचे पाहती
वाहतीही धारा काही |
मना मिळे हाबकारा
ओलावते पुन्हा तेही |
झाली पाकसिद्धी अशी
येई दरवळ पक्वान्नी |
माझा नैवेद्य भोगिला
मीच सहस्रमुखांनी |
केवढा हा भव्य
अनुपम्य सारा
विश्वाचा पसारा
मांडे कोण ?
सृष्टीचे नवल
घालोनिया जन्मा
स्वतः तो अजन्मा
आहे कोठे ?
नजरे पल्याड
किती तरी गोष्टी
क्षीण वाटे दृष्टी
विज्ञानाची
शोध चालू आहे
ज्ञानियांचा नित्य
आदीमाचे सत्य
गूढ तरी ..
ज्ञानाने विस्तारे
पैस अज्ञाताचा
थांग अनंताचा
लागेच ना
कविता क्षीरसागर
मराठी कवितांचं फक्त मराठी साहित्यातच नाही पण मराठी संस्कृतीमधे एक वेगळं स्थान आहे. मायबोलीवर मराठी कविता, काव्यसंग्रह याबद्दलचे अनेक विभाग आहे. या पानावर त्या सगळ्या विभागांची एकत्र माहिती देण्याचा प्रयत्न आहे.
जरि जन्मांतरिचे नाते ।
आपुली चुकामुक होते ।
तुज कळते अन् मज कळते ।
अंतर अपुले हळहळते ।।
जरि वसती देही एका ।
मारतोच नेमे हाका ।
ऐकू दोघां नच येते ।
प्रतिसाद कुणी नच देते ।।
जरि भेट-बोलणे नाही ।
तरि चिरपरिचितसे काही ।
अंतरात ग्वाही देते ।
आशेला अन् पालवते ।।
जरि ऐल पैल वा तीर ।
मधुनी वाहे मन-नीर ।
क्षणि ते दर्पणसे होते ।
मज माझे दर्शन होते...क्षणभर !
-चैतन्य
हे दार,
त्याच्या मागचं दार,
आणि त्या दाराच्याही मागचं दार...
अशी आत आत असलेली सगळी दारं
एक एक करत बंद करून
मी कालची एक पायरी चढून
'आत्ता'त आलेय!
हुश्श!
"आता ना, मला फक्त पुढचं पहायचंय"
असं म्हणून मागं वळते, तोच...
तिथे तुम्ही हजर,
तुमच्याही 'आत्ता'च्या दारात.
पण तुमचं दार,
त्याच्या मागचं दार,
आणि त्या दाराच्याही मागचं दार मात्र
पारदर्शक काचेचं...!
~ चैतन्य