'इर्शाद'च्या निमित्ताने...
मला आठवतं त्यानुसार शाळकरी वयात कधीतरी विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट या तिघांचा एकत्र काव्यवाचनाचा कार्यक्रम पाहिला होता. कवितेकडे, शब्दांकडे माझा ओढा होताच, पण कविता आपण वाचणं / गुणगुणणं आणि ती खुद्द कवीने त्याचं हृद्गत उलगडल्यासारखी समोर मांडणं यात किती जमीनअस्मानाचा फरक पडतो हे त्या दिवशी जाणवलं. त्या वयात खूप काही कळलं असेल असं नाही, पण हा अनुभव लक्षात राहिला.
त्यानंतर जवळपास पंधरावीस वर्षं कविताच केंद्रबिंदू असलेला असा इतर कुठला प्रयोग झालेला निदान माझ्या माहितीत नाही. संदीप खरेंचा 'आयुष्यावर बोलू काही' क्षितिजावर उगवला आणि पुन्हा एकदा मराठी कवितेला लोकाश्रय मिळाला म्हणण्यापेक्षा पुन्हा मराठी लोकांना संदीपने कवितेच्या आश्रयाला खेचून आणलं. सहजसोपी भाषा, खेळकर शैली, आणि त्यामागे लपलेली मानवी भावभावनांबद्दलची एक सखोल, समंजस, क्षमाशील जाण हे संदीपच्या कवितांचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य. त्यामुळे वयाने तरूण आणि मनाने तरूण अशा सगळ्याच पिढ्यांना त्याच्या कविता आपल्याश्या वाटल्या यात नवल नाही.
कविता आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं.
कवी William Carlos Williams म्हणतो त्याप्रमाणे 'It is difficult to get news from poems, yet men die miserably everyday for the lack of what is found there.'
म्हणूनच एक काव्यप्रेमी म्हणून संदीप खरे यांचे आभार मानावेत तेवढे कमी वाटतात मला.
कविता आयुष्यात असणं महत्त्वाचं, कवी आयुष्यात असणं तर भाग्याचंच! वैभवशी असलेल्या, नव्हे कवितेमुळेच जुळलेल्या मैत्रीमुळे हाही एक राजस अनुभव दैवाने गाठीशी जमा केला. वैभवने आंतरजालावर लिखाणाला सुरुवात केली तेव्हापासून गेलं एक तप त्याचा प्रवास मी बर्यापैकी जवळून पाहिलेला आहे. तो जितक्या सातत्याने लिहितो, जितकं वैविध्यपूर्ण लिहितो, आणि ज्या सातत्याने दर्जेदार लिहितो त्याची मला कायमच कमाल वाटत आलेली आहे.
'बरं आहे बुवा तुम्हाला सुचतं!' असं म्हणणं हे काहीसं क्रूर अतिसुलभीकरण ठरेल. त्यामागे साधना असतेच. वैभवच्या बाबतीत बोलायचं तर कवितांमध्ये इतका आकंठ बुडालेला माणूस माझ्या पाहण्यात दुसरा नाही. त्याच्या डोक्यात कविता दैनंदिन धबडग्याच्या बॅकग्राउंडला सुरू नसते, कविताच सुरू असते आणि बाकी गोष्टी नुसत्याच काही फुटांवरून वाहून जात असतात.
एखादा सुचलेला खयाल नेमका आणि सर्वात परिणामकारक पद्धतीने कसा मांडता येईल इथपासून ते मुळात कविता म्हणजे काय? काव्यात्मक गद्य कुठे संपतं आणि कविता कुठे सुरू होते? मुक्तछंदालाही आपली एक लय असते का? असावी का? कविता आयुष्याचा आटीव अर्क म्हणावा तशी संक्षिप्त चांगली की लाटालाटांनी येऊन भिडण्याचा खेळ मांडण्याइतक्या अवकाशावर तिने हक्क सांगावा? चांगल्या कवितेने तत्काळ काळजाला भिडून टाळी घ्यावी की ती अनुभवांती उलगडून दीर्घकाल स्मृतीत रेंगाळावी? कलेच्या संदर्भात चांगलंवाईट असं काही असतं का? असावं का? - हे आणि असे अनेक प्रश्न त्याला सतत पडत असतात, नव्हे तो ते सतत स्वत:ला पाडून घेत असतो. कालची उत्तरं उलटसुलट करून पुन्हा आज पडताळून पाहत असतो. हा एका अर्थी 'स्व'चा शोध आहे. कवितेच्या संदर्भात आपली विद्यार्थीदशा त्याने हट्टाने संपू दिलेली नाही, आणि त्यामुळेच त्याचा कविता लिहिण्यातला रोमान्स टिकून राहिला आहे असं मला वाटतं.
हा रोमान्स असाच आजन्म सुरू राहो!
काल संदीप खरे आणि वैभवचा मराठी विश्वने आयोजित केलेला 'इर्शाद' कार्यक्रम 'घडला' आणि त्यानिमित्ताने हे मनोगत मांडावंसं वाटलं.
सुरांची वा इतर कसलीही साथसंगत, काही ठराविक आकृतीबंध, काही काही नसताना हे दोन कवी केवळ शब्दसामर्थ्य आणि अप्रतिम सादरीकरण यांतून जी जादू घडवतात त्याला तोड नाही.
शास्त्रीय संगीतासारखाच कवितेच्या कार्यक्रमाला येणारा प्रेक्षकही काहीसा uptight असतो सुरुवातीला. प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारत, कोपरखळ्या देत हे दोघे वातावरणातला ताण पाहता पाहता घालवून टाकतात आणि मग पोतडीतून एकेक मौजेच्या आणि मौल्यवान चिजा बाहेर काढतात. आपण दिपून गेलो हेही प्रेक्षकाला कळत नाही कारण तो त्या उजेडाचा भाग झालेला असतो.
कवितांचं सादरीकरण हा सहसा दुर्लक्षित / अन्डरएस्टिमेटेड विषय आहे. त्याचंही तंत्र असतं, त्यालाही रियाज लागतो, व्हॉइस मॉड्युलेशन लागतं, त्यातही प्रेक्षकाची नस आणि त्यावेळचा मूड पाहून आयत्यावेळी बदल करण्याइतकी लवचिकता लागते. संदीप आणि वैभव यांनी त्यांच्या कार्यक्रमांतून काव्यसादरीकरणाचा एक वस्तुपाठच घालून दिलेला आहे.
कलेचं अॅनालिसिस करता येत नाही. या विषयावर कितीही बोललं तरी शब्दांत न पकडता येणारी चार अंगुळं उरतातच. तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी हा कार्यक्रम चुकवू नका अशी आग्रहाची विनंती करून इथेच थांबते.
वा! छान लिहीलं आहे. आमच्याकडे
वा! छान लिहीलं आहे. आमच्याकडे हा कार्यक्रम होता तेव्हा काही कारणाने बघता आला नाही.
)
कार्यक्रमाची ओळखही अतिशय काव्यात्मक झाली आहे
(पण इतक्या काव्यात्मकतेची मला तर भितीच वाटते!
वाह! सुंदर ओळख करुन दिलीत.
वाह! सुंदर ओळख करुन दिलीत. आता कार्यक्रम बघायची इच्छा निर्माण झालीये.
छान ओळख.
छान ओळख.
जायला हवं होतं. बघू परत कधी येतोय...
मस्त. इतर कोणी त्यांच्या
मस्त. इतर कोणी त्यांच्या कविता वाचल्या का?
कालच्या कार्यक्रमात नाही
कालच्या कार्यक्रमात नाही वाचल्या. सहसा नावांच्या चिठ्ठ्या टाकून एक-दोन जण निवडतात म्हणे, पण काल तसं म्हणताच प्रेक्षकांनी 'इतर कोणी नको, आम्ही तुम्हालाच ऐकायला आलो आहोत' असा आग्रह धरला.
साडेतीन ते सहा वेळ होती, कार्यक्रम वेळेत सुरू होऊन आठ, हो आठ वाजेपर्यंत रंगला. नंतरही अनिच्छेनेच लोक उठले.
त्याचंही तंत्र असतं, त्यालाही
त्याचंही तंत्र असतं, त्यालाही रियाज लागतो, व्हॉइस मॉड्युलेशन लागतं, त्यातही प्रेक्षकाची नस आणि त्यावेळचा मूड पाहून आयत्यावेळी बदल करण्याइतकी लवचिकता लागते. <<< अगदी बरोबर, स्वाती. चांगलं लिहिलं आहेस. पूर्वी दूरदर्शनवर 'क कवितेचा' या कार्यक्रमात विंदांनी केलेल्या त्यांच्या कवितांचं वाचन मी जेंव्हा पहिल्यांदा आणि चुकून ऐकलं तेंव्हा मी चकीत झालो होतो अक्षरश:. तेंव्हाच्या कृष्णधवल पडद्याच्या टीव्हीवर ऐकलेलं ते कवितावाचन कितीतरी वेळ मनावर गारूड करत राहिलं होतं. एरवी आपण वाचतानाची कविता आणि कवीने स्वतः सादर केलेली कविता यात प्रचंड फरक असतो, हे तेंव्हा अगदी भिडलं. ("अरे! हे याच्याशी खातात, बरे का! " सांगितल्यागत.)
मस्त! कार्यक्रम सुंदर झालेला
मस्त! कार्यक्रम सुंदर झालेला दिसतोय! आवडला असता बघायला, मिस केला.
सुरेख लिहिलंय! इथेही पुण्यात
सुरेख लिहिलंय! इथेही पुण्यात जेव्हा जमेल तेव्हा जायला हवं कार्यक्रमाला.
मस्त लिहिलं आहेत इबा.
मस्त लिहिलं आहेत इबा.
छान लिहिले आहे, अगदी भरभरून..
छान लिहिले आहे, अगदी भरभरून..
पण कवितेला आपला दुरूनच बाय बाय असतो..
मायबोलीवर देखील एक बी सोडले तर कधी कोणाच्या गझल कवितांच्या वाट्याला गेलो नाही..
पण असं काही कानावर आले वा वाचले तर वाटते, श्या आपल्याला का नाही कवितांची आवड
कार्यक्रम खरच फार छान झाला!!
कार्यक्रम खरच फार छान झाला!! ४ तास कसे निघून गेले कळलेच नाही. यानिमित्ताने वैभवची आणि स्वाती तुझीही प्रत्यक्ष भेट झाली.
कार्यक्रमाची लिंक पाठवल्याबद्दल आणि विपुतून रिमायंडर पाठवल्याबद्द तुझे मनापासून आभार!!
वाह! सुंदर ओळख करुन दिलीत.
वाह! सुंदर ओळख करुन दिलीत. आता कार्यक्रम बघायची इच्छा निर्माण झालीये >> बुवांना अनुमोदन. इथे आला तर नक्की जमवेन.
मी सहसा कविता वाचत/ ऐकत नाही!
मी सहसा कविता वाचत/ ऐकत नाही! पण स्वाती, तू एव्हढं भरभरून लिहीलं आहेस की इथे कधी संदीप वैभवाचा कार्यक्रम असला तर चुकवणार नाही.
कविता आवडणं, त्यांचं सादरीकरण
कविता आवडणं, त्यांचं सादरीकरण अनुभवणं आणि ते समूहात बसून भोगणं या तिन्ही एकमेकांशी संबंधित आणि तरीही भिन्न गोष्टी आहेत. तिसरीचा अनुभव क्वचित घेतलाय आणि त्यामुळे ती आवडेल की नाही याबद्दल शंकाच अधिक आहे.
त्यामुळे तुम्ही हे इतकं सुरेल लिहिलंय ते प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असंच वाटतंय;
आयुष्यावर बोलू काही टीव्हीवर पाहिल्यावर - "हेच का ते ज्याबद्दल लोक इतकं बोलताहेत?" असं झालेलं.
अर्थात यात आपणच रेखून घेतलेल्या सीमारेषांत अडकून पडणार्या माझाच दोष अधिक आहे.
बोलगाणीतली पहिली कविता याबद्दलच आहे.
सादरीकरणातल्या मेहनतीचं, विचाराचं आणि कौशल्याचं कौतुक आहे, पण त्याला मर्यादाही असतील किंवा तिथे विशिष्ट प्रकारच्या कविताच अधिक असतील असं वाटत राहतं.
कवीच्या आवाजात कविता ऐकलेली असण्याचा एक फायदा म्हणजे पुढे जेव्हा कधी तो कवी वाचायला घेतो, तेव्हा प्रत्येक कविता त्याच्या आवाजात ऐकू येते.
"त्यानंतर जवळपास पंधरावीस वर्षं कविताच केंद्रबिंदू असलेला असा इतर कुठला प्रयोग झालेला निदान माझ्या माहितीत नाही."
पुल आणि सुनीताबाई काव्यवाचनाचा कार्यक्रम करायचे.
आणखी एक प्रा विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलंय काव्यात नावाचा एक कार्यक्रमही खूप गाजला होता. अर्थात या दोहोंत कविता असला तरी स्वतः कवी नाही.
सध्या इथे उर्दू शायरी आणि हिंदुस्तानी मौसिकीवर 'सुखन' नावाचा कार्यक्रम चर्चेत आहे.
बाकी मागेच लिहिलेलं एक वाक्य थोडं वाढवून पुन्हा लिहितोय - तुम्हाला लेखनाला निमित्त लागतच असेल, तर ते वरचेवर मिळो.
स्वातीजी , छान लिहिले आहे
स्वातीजी , छान लिहिले आहे तुम्ही.
तुमच्या माहितीसाठी : मधल्या काळात श्री सुधीर मोघेजींनी कवीतांच्या संदर्भातले खूप सुन्दर कार्यक्रम केले होते . ते तुमच्याकडून कसे "मिसले" ....
"उत्तररात्र" हा रॉय किणीकरान्च्या कवितेच्या वाचनाचा / गायनाचा उत्तम प्रयोग होता. मोघे बंधू ; सातभाई पती-पत्नी , वीणा - विजय देव पती पत्नी यात सहभागी होते. सुधीर्जींनी काही कविता अप्रतीम्पणे स्वरबद्ध केल्या होत्या आणि तितक्याच सुन्दर गायकीत ते सादर करायचे. हा कार्यक्रम youtube वर उपलब्ध आहे.('Uttararaatra' by Roy Kinikar - Part 1 of 5 - YouTube https://www.youtube.com/watch?v=-ni-ltPX5pU)
तसेच "कविता पानोपानी " हा स्वतःच्या कवितांचा स्वैर सादरीकरणाचा प्रयोगही दर्जेदार होता.
मोजक्याच शब्दात सुंदर लिहिले
मोजक्याच शब्दात सुंदर लिहिले आहेस स्वाती!!
भरत यांचा प्रतिसाद पण आवडला.
मला वैभवाचा पहिलावहिला "सोबतीचा करार" कार्यक्रम आठवला. आम्ही पुण्यातील मायबोलीकर मंत्रमुग्ध झालो होतो.
जियो वैभव!!
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे. आमच्यासारख्यांना हे कार्यक्रम बघण्यात इण्टरेस्ट निर्माण करणारे लेखन!
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
>>> कार्यक्रम बघण्यात इण्टरेस्ट निर्माण करणारे लेखन
लिहिल्याचं सार्थक झालं मग.
>>> "अरे! हे याच्याशी खातात, बरे का! " सांगितल्यागत.
गजाभाऊ
पुलस्ति, प्लेझर इज ऑल माइन.
भरत, बरोबर आहे - विसुभाऊ बापटांचं तुम्ही लिहिल्यावर आठवलं. खूप तळमळीने कवितेबद्दल बोलायचे, 'कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय' अशी व्याख्या सांगायचे हे आठतंय.
पुल आणि सुनीताबाईंच्या काव्यवाचनाच्या कॅसेट्सही होत्या माझ्याकडे. कार्यक्रम नेमाने करायचे की नैमित्तिक याबद्दल कल्पना नाही.
>>> अर्थात या दोहोंत कविता असला तरी स्वतः कवी नाही
हो.
>>> त्याला मर्यादाही असतील किंवा तिथे विशिष्ट प्रकारच्या कविताच अधिक असतील असं वाटत राहतं
मग तर तुम्ही हा कार्यक्रम बघाच - आणि प्रेक्षागारात बसूनच बघा, टीव्हीवर नको. कारण त्याच्या इन्टरॅक्टिव्ह फॉर्मॅटमध्येच त्याची मजा आहे. - आणि कदाचित तीच मर्यादाही - एखाद्या कार्यक्रमाची 'भट्टी' जमली नाही असं होऊच शकतं.
तरीही या मुद्द्यावर विचार करते आहे.
बहुधा संदीप आणि वैभवची काव्यशैलीच संवादात्मक असल्यामुळे हा प्रश्नच येत नसेल की काय असंही वाटलं.
मी कवितेबाबत बायस्ड आहे यातही काही गुपित नाही.
भोजनाच्या आस्वादात अन्नाच्या चवी/दर्जाइतकाच जेवणार्याच्या भुकेचाही भाग असतोच - मी त्या सांस्कृतिक वर्तुळापासून लांब राहात असल्यामुळे माझी भूक मोठी म्हणून समाधानही मोठं - असंही असेल.
याचंही विश्लेषण अशक्य आहे.
'सुखन'बद्दल बरंच ऐकलंय खरं इतक्यात - बघायची खूप इच्छा आहे.
पशुपत, तुम्ही उल्लेख केलेले कार्यक्रम मात्र मी खरंच 'मिसले'ले दिसतात. यूट्यूबच्या लिंकसाठी अनेक धन्यवाद. बघते आता.
भोजनाच्या आस्वादात अन्नाच्या
भोजनाच्या आस्वादात अन्नाच्या चवी/दर्जाइतकाच जेवणार्याच्या भुकेचाही भाग असतोच - मी त्या सांस्कृतिक वर्तुळापासून लांब राहात असल्यामुळे माझी भूक मोठी म्हणून समाधानही मोठं - असंही असेल. >> अॅनॅलिसिस आवडला.
आय एफ नंतर खाण्यातली मजा यावर आत्ताच सईचा प्रतिसाद वाचल्याने आणखी गम्मत वाटली.
सुरेख लिहिलंय.
सुरेख लिहिलंय.
अगदी सुंदर आणि खर्रीखुर्री
अगदी सुंदर आणि खर्रीखुर्री ओळख या कार्यक्रमाची !
इथे सादर झाला तेव्हा मी खूपच कमी अपेक्षा ठेवल्या होत्या. आणि वैभवाला भेटायचे एवढ्यासाठी गेलो होतो.
कार्यक्रम इतका रंगला , इंटरेक्टीव्ह असल्याने आणि सादरीकरणामुळे. त्यातही वैभवच्या काही ओळींनी जाम गारूड केले. ६:३० ला संपणारा कार्यक्रम, वेळेचे काटे किती भर्र्कन धावले आणि ८:३० पर्यंत चालला कळलेच नाही.
स्वाती, खूप सुंदर लिहिलयस.
स्वाती, खूप सुंदर लिहिलयस.
हे असं काही वाचलं ,ऐकलं की वाटतं... वी आर ब्लेस्ड...
हे असच राहू दे. ईर्शाद भारतात ऐकायला मिळाला नाहीये. इथे (सिडनीत) व्हावा(च)..
छान ओळख !
छान ओळख !
छान लिहिलंय! आवडलं!
छान लिहिलंय! आवडलं!
छान लिहिलंय! आवडलं!
छान लिहिलंय! आवडलं!
>>> वाटतं... वी आर ब्लेस्ड
>>> वाटतं... वी आर ब्लेस्ड
absolutely!
"आपण दिपून गेलो हेही
"आपण दिपून गेलो हेही प्रेक्षकाला कळत नाही कारण तो त्या उजेडाचा भाग झालेला असतो." >>> व्वा !
कार्यक्रमामुळे भारावून गेलेल्या असूनही किती संयत शब्दांत मांडलंत सारं.
सुंदर लेखन.
"तुम्हाला लेखनाला निमित्त लागतच असेल, तर ते वरचेवर मिळो." >>> भरत यांना अनुमोदन.
छान उत्कट लिहिलेय .अजूनपर्यंत
छान उत्कट लिहिलेय .अजूनपर्यंत हा कार्यक्रम पाहिलेला नाही . तुमच्या लिखाणामुळे आता एकदा बघावा लागेल असे दिसतेय . बघून इथेच अपडेट देईन
भिडेकाका!! किती दिवसांनी
भिडेकाका!! किती दिवसांनी दर्शन दिलेत... कसे आहात?
खूप छान लिहीलं आहेस स्वाती.
खूप छान लिहीलं आहेस स्वाती. अजूनही वाचायला आवडेल.
हा कार्यक्रम आमच्या गावात येणार नाहीये. तेव्हा भारतवारीच्या लिस्टीत टाकून ठेवते.
Pages