"आतातरी काढून घे शाप... मुक्ती दे..."
तेवढ्यात एक धिप्पाड माणूस त्याच्यासमोर आलं.
"काय रे, मारुतीची चोरी करतोय व्हय, आरं तुला काही लाज?"
"मारू नका...एक थेंब तेल पाहिजे होतं फक्त, म्हणून देवळात आलो"
त्या माणसाला त्याची दया आली.
"आरं चांगला देव हाय तो, मागितलं तर सगळं देतो."
'देव?' तो मनाशीच हसला. 'त्या एका देवानेच तर हा शाप दिलाय...'
"घे, थेंबभर तेलाने काय हुतय, कपाळ?"
त्या धिप्पाड माणसाने त्याला वाटीभर तेल दिलं, आणि तो निघून गेला.
त्याने घाईघाईने आपल्या कपाळाच्या जखमेवर तेल लावलं...
दाह शांत झाला...
थांब, आलोच
आतले कढ आवरून सावरून
ठसठसणारं मेमरी कार्ड फॉरमॅट करून
शहाणा मुखवटा चपखल बसवून
आलोच.
येतो- झाकून, तू दिलेल्या भळभळत्या जखमा
येतो- क्षणभर विसरून, की मी चिरंजीव अश्वत्थामा
मी पुस्तक उघडलं आणि पानं फडफडवली. बघत होते मी काही पैसे ठेवलेले सापडत असतील तर. मी एक विशाल भिंत पार करून गेले आणि अंधारात चंद्रकोर उगवली होती. शंकरानेच धारण केली होती. एक सर्पही होता तिथे. पण शंकराच्या गळ्यात नव्हता. अथांग आणि शांत समुद्राच्या शेजारच्या खडकांवरून चालला होता तो. एका सर्पांनी भरलेल्या गुहेकडे चालला होता तो. तिथेच एक मध्यमवयीन सर्प सांगणार होता कहाणी क्लिओपात्रेला त्याने केलेल्या दंशांची आणि तिच्या गौर कायेवर त्याच्या दंशांमुळे उगवलेल्या विषाच्या निळ्या वर्तुळांची.... आणि मग तो मध्यमवयीन सर्प निघून जाणार होता अनंताच्या प्रवासाला.
श्री. अतुल ठाकूर यांच्या आजच प्रकाशित केलेल्या याच विषयावरील लेखावरून मला माझ्या काही दिवसांपुर्वीच्या ओळी आठवल्या -
*********************************
तसा आपल्या प्रत्येकातच एक अश्वत्थामा असतो
भळभळती जख़म घेऊन भणंग भटकताना कधीमधी दिसतो
अंधारामध्ये निरपराधांवर वार काय त्याने एकट्यानेच केलेत
अज्ञानाच्या अंधारातले असे कित्येक निरपराध आपणही चिरडलेत
तरीही प्रत्येक नव्या जख़मेनंतर
छातीवर हात ठेऊन दु:खाचं दळण आपण किती वेळा दळलं
मन जे म्हणतात ते छातीत नाही, डोक्यात असतं
हे फक्त कृष्णाला कळलं
- शैलेंद्र साठे
*********************************
एका फसव्या क्षणी
क्रोधाचे गुलाम झालेल्या
माझ्या संमोहित शब्दांनी
तुझ्या नाजुक भावनांचा
वेध घेतला
अन्...
माझं निष्पाप प्रेम,
ते जादुई क्षण,
वचनं....शपथा,
हे सारं विसरून
तू लक्षात ठेवलेस
फक्त माझे अर्थहीन शब्द
अन् झिडकारून निघून गेलीस
तेव्हा पासून
अहिल्येसारखं
शिळेचं आयुष्य जगत
नसांनसांत भिनलेल्या
तुला जगवतोय
अहिल्येसारखा मलाही उ:शाप आहे
...की माझ्याही भाळी लिहीलंय
अश्वत्थाम्यासारखं वणवण भटकणं ?
मी एक अश्वत्थामा
मी एक अश्वत्थामा
वाहतं मन घेऊन फिरणारा
जगाच्या कुठल्याश्या कोपरयात
समदु:खी शोधणारा
मनाच्या भळाळत्या जखमेवर
दवापाणी शोधणारा
आणि सतत गर्दीत असूनही
सलग एकाकी असणा्रा
नाही मी चिरंजीव
पण वाहतं मन आहेच
म्हणूनच ठरलो कदाचित
मी एक अश्वत्थामा