एक चिंतन

Submitted by मी प्राजक्ता on 16 July, 2017 - 05:01

मी पुस्तक उघडलं आणि पानं फडफडवली. बघत होते मी काही पैसे ठेवलेले सापडत असतील तर. मी एक विशाल भिंत पार करून गेले आणि अंधारात चंद्रकोर उगवली होती. शंकरानेच धारण केली होती. एक सर्पही होता तिथे. पण शंकराच्या गळ्यात नव्हता. अथांग आणि शांत समुद्राच्या शेजारच्या खडकांवरून चालला होता तो. एका सर्पांनी भरलेल्या गुहेकडे चालला होता तो. तिथेच एक मध्यमवयीन सर्प सांगणार होता कहाणी क्लिओपात्रेला त्याने केलेल्या दंशांची आणि तिच्या गौर कायेवर त्याच्या दंशांमुळे उगवलेल्या विषाच्या निळ्या वर्तुळांची.... आणि मग तो मध्यमवयीन सर्प निघून जाणार होता अनंताच्या प्रवासाला.
त्या भिंतीजवळच भेट होणार होती, अश्वत्थाम्याची गौतमाशी... डोक्यातून भळाभळा वहाणारं रक्त थांबवून बोलणारा अश्वत्थामा आणि राजपुत्राची भेट होणार... जो उद्याचा बुद्ध आहे.
एक जीव आश्लेषा नक्षत्रासारखा फिरत राहिलाय अव्याहत चक्रात... स्वतःच पुन्हापुन्हा मुक्त होतो... स्वतःलाच बंदिस्त करतो. अंधाराचे प्रकाशवस्त्र किंवा प्रकाशाचे अंधारवस्त्र लेऊन.. कि तोच स्वतःला पुन्हा दीपस्तंभात जाळून घ्यायला निघाला आहे, उत्सुकतेच्या सुंदरीला मागे ठेवून कि त्याने पाहिलीच नव्हती ती मुकी आशा, जी त्याला जगात रहाण्यासाठी जागा देत होती. घाईघाईने लोटून दिले त्याने कड्यावरून मागेच कधीतरी स्वतःला आणि आशेच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या...
मला न सापडलेले जी. ए.
©kshamayermalkar

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults