समाजात राहून समाजापेक्षा वेगळंही दिसायचं, श्रेष्ठही दिसायचं आणि त्यांच्यातलंच एक आहोत हे ही दाखवायला धडपडायचं. सर्वच कर्मकांडांमागे हीच अगम्य भावना असते माणसाची. त्यातूनच वेगवेगळे पूजाविधी, देव जन्म घेतात. 'मी इतरांपेक्षा जास्त श्रद्धावान आणि परमभक्त आहे' ही भावना ही एकाच देवाच्या देवळात जमलेल्या भक्तांच्या वेगवेगळ्या आविर्भाव, हालचाली, घोषणा यांतून जाणवते. सृष्टीवर आपले नियंत्रण चालत नाही म्हणजे नियंत्रण ठेवणारा कुणीतरी असलाच पाहिजे, त्याला आपण खुश ठेवलं पाहिजे ह्या विचित्र अहंकारातून 'देव' संकल्पनेचा जन्म झाला.
अरे निष्ठुर!
मुक्तीच्या मार्गावर
मायेचे काटे पेरलेस काय?
तुझ्या स्वार्थीपणाचा तिटकारा करू,
की तुलाच झिडकारून लावू?
पण पुन्हा तुझ्याचसमोर झुकावं लागतंय ...
हे मायावी,
तोडूनी सगळी बंधनं
जेव्हा मिळवेन चैतन्य
अनाहताचे ऐकता गुंजन
तुला जाब विचारेन,
झालास समाधानी?
माझी पिळवणूक करून...
―र।हुल/८.११.१७
नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे
सकल ते समजून घेणे कधिच का सोपे नसे?
या क्षणी ते स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी
पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी
कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम
कोणी त्या म्हणती अविद्या; सर्जनोद्भव संभ्रम
वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा?
ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता
.
.
जैसे व्यष्टि तैसेचि समष्टि
कशास जोजावणे संजय दृष्टी
किमर्थ होईतसे जीव कष्टी
अदृश्यास जाणावया ...?
जीव आला , तरुनी गेला
कर्मफलातुनि प्रारब्ध जाहला
जीव घाबरला , वाहुनी गेला
वृथा भविष्याच्या नादी लागला
उद्धरेत आत्मानं स्मृति वचने
स्व-सामर्थ्यासी जो जागृत असे
सद्गुरु परमात्मा काया वाचा मने
एक पाऊल पुढे तत्पर असे
.
.
कासव बघितला. बघताना बोरकरांची 'जेथे जातो तेथे' आठवत राहिली.
जेथे जातो तेथे मी माझा सांगाती
पुढे आणि पाठी मीच माझ्या
मीच माझी वाट मीच माझा दिवा
हि-याचा ताजवा मीच माझ्या
मीच माझी रुपे पाहतो पाण्यात
आणितो गाण्यात मीच त्यांना
मीच मला कधी हासडितो शिव्या
कधी गातो ओव्या मीच मला
अशी माजी चाले नित्य मम पूजा
लोकी माझ्या ध्वजा मिरवितो
नाही कधी केली तुझी आठवण
म्हणालास पण मीच तू रे
एकदा एका मैफलीत कुमार गंधर्वांनी गात असलेल्या रागात अचानक वर्ज्य सूर लावला. मात्र मैफल नेहमीप्रमाणे जिंकली. मैफलीनंतर कुणीतरी एका रसिकाने याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की तो सूर केव्हापासून दरवाजातून येऊ का ? असं खुणवत होता, मग मला नाही म्हणवेना .
कदाचित कुमारांची मनस्थिती तेव्हा अशी झाली असावी:
त्या एक स्वराची बिजली
स्पर्शून निसटती गेली.....
ती मैफल मग जमलेली
ती बंदिश मज सुचलेली
....मग माझी उरली नाही
उघडता दार अज्ञात
होऊन अनावर आत
कोसळतो कुठुन प्रपात
हे काय भिने रक्तात
...त्या वेळी कळले नाही
आस
चित्ती असो द्यावा येक
बरवा वैकुंठनायक ।।
नाम मुखी वसो सदा
लोपो ऐहिक सर्वदा ।
संतसंगती लाभावी
बुद्धी गोविंदी वसावी ।
हरीरूप व्हावे सारे
नयो मागुते अंधारे ।।
अास हीच जागो चित्ती
दान द्यावे रखुमापती ।।
........................................
आस = इच्छा
गुढप्रवासी
सुक्ष्म पातळीवर मला
तू उलगडत जात आहे
आभास सगळे मनांचे
आता गळून पडत आहे ॥१॥
गत जाणिवांना आता
मी विसरून जात आहे
नविन प्रवास नव्यानं
एक सुरू करतो आहे ॥२॥
तू दाखविल्या रस्त्याला
फक्त चालणे हातांत आहे
अवघड वळणावरी तुझा
मला एकची आधार आहे ॥३॥
अस्तित्व समजून घेण्या
आता उद्युक्त झालो आहे
तुझ्या गाभार्यात प्रवेश
हात धरूनी करतो आहे ॥४॥
―र।हुल/ २५.९.१७
[जाणिवा-दु:ख, वेदना]