तोकड्या शब्दांनी माझ्या कशी वर्णु मी ती रात्र ।
दोन तनुंच्या अंगारात धगधगती ती मखमली रात्र ।।१।।
गात्रांतून ओथंबून वाहते एक बेभान रणरणती ओढ ।
विसरु म्हणता विसरत नाही ती स्फुलिंगणारी रात्र ।।२।।
चमचमणाऱ्या ताऱ्यां खाली तळमळणारी आस ।
तिमीरी पांघरुणाखाली लखलखती शृंगारिक रात्र ।।३।।
दोन जीवांच्या मिलनाचा उफान भोगविलास ।
प्रेमपुर्तीच्या तृप्त गात्रांनी थकुन झोपली रात्र ।।४।।
आस
अशाच या कातरवेळी
निशब्द असावा
आसमंत सारा
त्यासमयी रवि तु
क्षितिजाच्या कुशीत निजावा
रवि तुज निजवताना
वारा ही गाई झुळझुळ गाणे
ती लुकलुकणारी कोर ही
बघ तुज कथा सांगे
अशाच एका कातरवेळी
बघ. कोण पणती
त्या तुळशीसमोर लावे
मंद अश्या त्या प्रकाशात
माझा ऊर भरुन वाहे
तेव्हा दुरवर कोठेतरी
मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा
'आस' लागे मनास कान्हा
तसाच ऐकु येईल का रे मज
एक दिन तुझा मधुर पावा..
-दिप्ती भगत
(९मे, २०२०)
सहज समाधी
आकाशींचे अभ्र । जातसे विरुनी । सहजे गगनी । आपेआप ।।
तैसेचि मानस । व्हावे की विलिन । तुजठायी पूर्ण । परमेशा ।।
वेगळेपणाने । भोगी जीवदशा । नको जगदीशा । संकोच हा ।।
तुजसवे होता । तत्वता तद्रूप । सहजे चिद्रूप । होईन की ।।
ऐसा एकपणे । भोगिता स्वानंद । निमेल ते द्वंद्व । मी तूं ऐसे ।।
सहज समाधी । लाभता निश्चळ । आनंद कल्लोळ । अंतर्बाह्य ।।
हीच एक आस । जागवी सतत । अन्य ते चित्तात । नको देवा ।।
साहवेना दुरी
लपवावे तुज । ह्रदयामाझारी । साहवेना दुरी । काही केल्या ।।
एकांतीचे सुख । भोगावे केवळ । एकचि गोपाळ । दुजे नको ।।
सुखदुःख वार्ता । सर्व तुजपाशी । येर सारे नाशी । लौकिक हे ।।
नयनी ह्रदयी । वसता मुरारे । खंती चि ना उरे । कोणतीच ।।
भरूनी वाहेल । आनंदी आनंद । स्वये ब्रह्मानंद । प्रगटेल ।।
हीच एक आस । जागवी सतत । तेणे माझे चित्त । सुखावेल ।।
येर नको काही । मोक्ष सुख थोर । जरी तू उदार । व्यापी चित्ता ।।
दुरी = दुरावा, द्वैत
आस = इच्छा
आस
चित्ती असो द्यावा येक
बरवा वैकुंठनायक ।।
नाम मुखी वसो सदा
लोपो ऐहिक सर्वदा ।
संतसंगती लाभावी
बुद्धी गोविंदी वसावी ।
हरीरूप व्हावे सारे
नयो मागुते अंधारे ।।
अास हीच जागो चित्ती
दान द्यावे रखुमापती ।।
........................................
आस = इच्छा
कुणीतरी म्हणालं,
सांभाळ आता तुझ्या बाबाना
बाई गेल्यावर खचतो माणूस
माझं उदास हसु,
मनातला डोंब फूटून
तांडव घालायला लागलेले आसू
दडवले शब्दांच्या मखरात,
म्हटलं,
असं कसं होईल
त्याच्या मायेची पाखर
आणखी काही वर्ष तरी राहिल
ती गेली तेव्हाच मी का नाही गेलो
दचकून पाहिलं बाबाकडे
वाटलं,
घट्ट मारावी मिठी
आई गेली आत्ताच, तू नको जाऊ
शब्दाच्या आजूबाजूला
घुमायला लागलं पारव्यासारखं,
कुणाचंतरी म्हणणं
बाई गेल्यावर खचतो माणूस....
खरचं का रे तसं झालं...
खचलास का रे बाबा तू?
केलास ना पुरा तुझाच ध्यास
ती गेली त्याच वाटेवर टाकलंस पाऊल
लेकींसाठी नाहीच ना अडला पाय
कधीतरी का होईना,
मन आलेलं भरुन
अन रितेची हात
जसं उभं एक रोप
जणू उन्हा-पावसात
किती गेले दिस वर्ष
पाय उगाच चालत
नाही दिशा नाही वाट
काही आस नाही आत
आता अडखळे श्वास
आणी गिळवेना घास
सावळसंध्या डोळ्यामधी
दिसे अथांग ती रात
काय केले कुणासाठी
काय गेले की राहुन
सारं आयुष्य जगलो
पाणी जावं जणू वाहून
कधी वाटलं थांबावं
फुला-मुलांत रमावं
सख्या-सोयर्यांच्या संग
आपणही हसावं
पण संसाराचा भार
सदा उद्याचा विचार
सय पायांना चालीची
पुढे जाण्याचा आधार