आस

Submitted by मोहना on 29 January, 2012 - 18:48

कुणीतरी म्हणालं,
सांभाळ आता तुझ्या बाबाना
बाई गेल्यावर खचतो माणूस
माझं उदास हसु,
मनातला डोंब फूटून
तांडव घालायला लागलेले आसू
दडवले शब्दांच्या मखरात,
म्हटलं,
असं कसं होईल
त्याच्या मायेची पाखर
आणखी काही वर्ष तरी राहिल

ती गेली तेव्हाच मी का नाही गेलो
दचकून पाहिलं बाबाकडे
वाटलं,
घट्ट मारावी मिठी
आई गेली आत्ताच, तू नको जाऊ
शब्दाच्या आजूबाजूला
घुमायला लागलं पारव्यासारखं,
कुणाचंतरी म्हणणं
बाई गेल्यावर खचतो माणूस....

खरचं का रे तसं झालं...
खचलास का रे बाबा तू?
केलास ना पुरा तुझाच ध्यास
ती गेली त्याच वाटेवर टाकलंस पाऊल
लेकींसाठी नाहीच ना अडला पाय

कधीतरी का होईना,
कुणाचंतरी म्हणणं खोटं का नाही ठरलं
आई गेल्यावर, बाबा तुला आमच्यासाठी रहायला
का नाही जमलं?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आपल्या जीवनसाथीबरोबर पूर्ण समर्पित होऊन अनेक वर्षांचं सहजीवन काटल्यावरच या प्रश्नाचे उत्तर देता येईल. अर्थात बाबांचे प्रेम अपत्यांवर कमी आहे असे मुळीच नाही. तो बॅलन्स त्याना जमला नाही हे महत्वाचे कारण आहे.
उत्कृष्ट कविता.

विभाग्रज- धन्यवाद, प्रद्युम्न - अगदी खरं आहे तुमचं म्हणणं, मुंकुद - थोड्याफार प्रमाणात व्यक्त करता आलेली मनोभावना तुम्हाला आवडली. धन्यवाद

धन्यवाद sherioc, योगुली
उमेश - नक्कीच, कुणावरही अशी वेळ येऊ नये.
सेनापती- अगदी खरं, आणि प्रत्येकाची दु:ख व्यक्त करण्याची तर्‍हाही वेगवेगळी. दुर्देवाने शब्दात न मावणारी वेदना व्यक्त होताना शेवटी शब्दांचाच आधार घेते. लिहणार्‍याच्या मनातलं वादळ कधीकधी असं बाहेर पडतं त्याला वाचणार्‍यांनी समजून घेतलं आहे हे देखील शब्दांनी/प्रतिक्रियानीच कळतं Sad

मोहना, आपले दु:ख तर अकल्पित वाटण्यासारखेच. त्याबाबत बोलायला शब्दच नाहीत.

कविता प्रामाणिक आहेच.

(कदाचित कमी लांबीचीसुद्धा अधिक परिणामकारक ठरली असती की काय असेही वाटले)

आपल्या दु:खात सहभागी

-'बेफिकीर'!

काय बोलणार. काव्य भावना शब्द सगळे ह्रदयातून ऊमटले आहेत.खरे तर ही वेदना नसती मांडलीत जगा पूढे तर अधीक योग्य.

टोकूरिका, विजय धन्यवाद,
बेफिकीर - हो कविता कदाचित कमी लांबीचीही चालली असती, पण लिहताना आई, बाबाच मनात होते बाकी काहीच नाही.
संजयb- <<<वेदना जगापुढे...>>>सहानुभूतीसाठी नक्कीच जगापुढे मांडलेली नाही कविता. अशा वेदनेला शब्दच नसतात असं आपण म्हणतो, पण तरीही तेही शब्दातूनच व्यक्त होतं. भारताबाहेर राहीलं की होत असावं असं म्हणजे अचानक मनातली जखम भळभळ वहायला लागते. नेमकं अशावेळेस भारतात बहिणी/नातेवाईकांशी (वेळेच्या फरकामुळे) बोलता आलं नाही की लिहून होतं, ते सर्वापुढे ठेवावसं वाटतं. बस इतकंच.