कासव - जेथे जातो तेथे मी माझा सांगाती

Submitted by सई. on 6 October, 2017 - 04:15

कासव बघितला. बघताना बोरकरांची 'जेथे जातो तेथे' आठवत राहिली.
जेथे जातो तेथे मी माझा सांगाती
पुढे आणि पाठी मीच माझ्या
मीच माझी वाट मीच माझा दिवा
हि-याचा ताजवा मीच माझ्या
मीच माझी रुपे पाहतो पाण्यात
आणितो गाण्यात मीच त्यांना
मीच मला कधी हासडितो शिव्या
कधी गातो ओव्या मीच मला
अशी माजी चाले नित्य मम पूजा
लोकी माझ्या ध्वजा मिरवितो
नाही कधी केली तुझी आठवण
म्हणालास पण मीच तू रे

कधीतरी मन आजारतं. कधी नुसत्या सर्दी-पडश्यावर भागतं, कधी दीर्घ मुदतीचा ताप येतो. फतकल मारून बसतो, हटत नाही. अश्यावेळी हायबरनेट व्हावंसं वाटतं. तेव्हा आपापली एखादी जानकी, अशी एखादी कविता, डॉक्टर, जरूर तेव्हा औषधं, आवडतं काम, घ्यावं मदतीला. हळूहळू ताप उतरत जातो. मनाचीही निगा राखावी. कशी, ते कासव बघून नीटसं लक्षात येईल. हेही दिवस जातील, मला वाटतंय ते खरं आहे का, तेवढंच खरं आहे का, हे स्वतःला विचारण्याचं भान कुणाकडून तरी घ्यायचं. ते आपलं आपल्याला नसतं. कान-डोळे असतात, बघायला ऐकायला शिकायचं. स्वतःसाठी. स्वतःसाठी जगायचं, स्वतःवर प्रेम करायचं.

कडकडीत उन्हाळ्यात आपल्याला जागोजाग फुललेले बहावे दिसतात. नुसतं बघूनही आपलं मन धमक होऊन जातं. किती पडझड होते, जीवनाचा एक अंशदेखिल शिल्लक उरत नाही. तरी निसर्ग फुलायचा थांबत नाही. पावसाची केवळ एक शिंपड जमिनीला हलकं फुलकं होऊन दरवळायला पुरेशी होते. भूकंप, वणवे, काहीही होवो, कोरडंठक्क पडलेलं झाड पालवणं थांबवत नाही की बी फळायचं विसरत नाही. निसर्ग मोठा अद्भूत समुपदेशक, डॉक्टर आहे. एरवी आपल्या हाताच्या स्पर्शाचा दाह सहन करू न शकणारी बहाव्याची झुंबरं रणरण उन्हाच्या धगीत दिवसेंदिवस मजेत तग धरून झुलत असतात. आधीच्या पडझडीची, सोसलेल्या तगमगीची कोळिष्टकं त्या रसरशीत पिवळेपणाला काळवंडायची हिंमत करू शकत नाहीत. त्या नाजूक जीवांना जे जमतं, ते आपल्याला का जमू नये? जमतं, जमवायला हवं.

कासवही हेच सांगतो, कासवांच्या गोष्टीतून. फार छानपैकी. शब्दांचं वायफळ पाल्हाळ न लावता. कासवं, मानव, जानकी, परशू, यदू, दत्ताभाऊ, समुद्र, अनेक वाटा असलेलं मोकळं ढाकळं घर, सुकथनकरांचे शब्द, कॅमेरा असे सगळे मिळून सांगतात. खरंतर आपलीच असलेली ती गोष्ट मग जास्त चांगल्या प्रकारे समजते. खूप उत्तरं मिळतात. न मिळालेल्यांची उत्तरं शोधण्याचा हुरूप मिळतो. यदू सांगतो तसं झडझडून कष्ट करावेत, भरभरून जगावं, जीवाला जीव लावावा हे पटतं. भजी खावी वाटली तर भजी खावी, चहा प्यावा वाटला तर हहा प्यावा, दोन्ही एकदम कोंबलं तर ठसका लागतो हे तत्वज्ञान परशूकडून ऐकल्यामुळे जास्त अपील होतं. मानवच्या हातात गाडीची किल्ली सोपवून जानकी त्याच्याबरोबर निघते तेव्हा गोल वळण घेणारा रस्ता दिसतो. मानवचा योग्य दिशेनं सुरू झालेला प्रवास दाखवणारा. असं खूप आहे. प्रत्येकानं बघायला हवा कासव, आपापल्या नजरेनं.

खुपसे लोकं मला शाळेत शिकवायला का नव्हते असं वाटतं. त्यात सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर पण आहेत. सतत सोडवावे लागणारे कठीण विषय सोपे करून समजावतात ते. कासवही तसाच आहे. मी त्या दोघांचे त्यासाठी मनापासून आभार मानले. असे चित्रपट वरचेवर येत रहाणं आणि ते आपण सगळ्यांनी आवर्जून पहाणं खूप आवश्यक आहे. तुम्हीसुद्धा सगळ्यांनी कासव नक्की पहा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लिहिलंय. कवितेने केलेली सुरुवात मनात खोलवर गेली.

आणि शाळा अजून संपली कुठाय >>> अगदी अगदी हर्पेन. आपण आहोत तोपर्यंत शाळा असणारच.

छान लिहीलं आहेस सई! समर्पक अर्थाच्या कवितेनी केलेली सुरवात अगदी अर्थपूर्ण आहे.

निसर्ग मोठा अद्भूत समुपदेशक, डॉक्टर आहे. एरवी आपल्या हाताच्या स्पर्शाचा दाह सहन करू न शकणारी बहाव्याची झुंबरं रणरण उन्हाच्या धगीत दिवसेंदिवस मजेत तग धरून झुलत असतात. आधीच्या पडझडीची, सोसलेल्या तगमगीची कोळिष्टकं त्या रसरशीत पिवळेपणाला काळवंडायची हिंमत करू शकत नाहीत. त्या नाजूक जीवांना जे जमतं, ते आपल्याला का जमू नये? जमतं, जमवायला हवं. >>>>
काय सुरेख, तरल तरीही प्रॅक्टिकल लिहिलंय.....

सर्व लेखच जियो, जियो..... Happy

________/\______

नितांत सुंदर लिहीलं आहेस.

कासव आणि बोरकरांची कविता दोन्ही वगळले की जे निव्वळ तुझे असे दोन पॅरेग्राफ उरतात ते इतके सुंदर आहेत की त्या करता तरी कासव बघावाच लागणार आता.

एक छोटंसच पण खूप आवडलेलं रसग्रहण!

सर्वांचे मनापासून आभार Happy
हे स्फुट त्रोटक आहे खरं. कारण नैराश्य हा विषय आणि कासवमधली त्याची हाताळणी ह्यावर लिहावं तितकं कमीच होईल. थेट चित्रपट पहाणं सोयिस्कर आहे असं सुचवीन Happy

हर्षद, खरंच, शाळा कधीच संपणार नाही Happy
तुम्हा सगळ्यांचे लेख नुसतेच चाळलेत, अजून वाचायचे आहेत. प्रत्येकाचे अन्वयार्थ वाचणं मजेचं असणार आहे.
माधव Happy बघून आलास की तुझीही नोट वाचायला आवडेल.

सई खुप छान लिहील आहेस. मनापासून आवडल. नक्की बघणार आता हा कासव चित्रपट.

इंटरेस्टिंग !
औरंगाबादला पोहोचलंय 'कासव.' एक शो जमेल अश्या वेळेचा आहे. प्रयत्न करणार आहे जायचा.

थँक्स !

काय फर्मास जमलय हे लिखाण. सगळ्यांनाच इतकं भरभरून लिहावस वाटायला लावणारा हा सिनेमा कधी बघतेय असं झालय.

मनाच्या आजारासाठी सायकियाट्रिस्ट कडे जाणे किती लोकांना परवडत? त्यांच्या फिया किती लोक गरजू रुग्ण देउ शकतात? अशावेळी देव धर्म बाबा बुवा ही त्यांच्यासाठी स्वस्तातले सायकियाट्रिस्ट बनतात. एकतर अगोदरच या विषयावर जागृती नाही त्यातून हे खर्चिक त्यामुळे ज्यांना खरोखरीच सायकियाट्रिस्ट ची गरज आहे तेच यापासून लांब रहातात.

रणजित, तंबी लक्षात आहे ना? Wink Lol
नवीन Submitted by सई. on 13 October, 2017 - 11:53

>>
तंबी होती का ती ? मी कॉम्प्लिमेन्ट समजलो होतो !
Lol
Lol

>>>> निसर्ग मोठा अद्भूत समुपदेशक, डॉक्टर आहे. एरवी आपल्या हाताच्या स्पर्शाचा दाह सहन करू न शकणारी बहाव्याची झुंबरं रणरण उन्हाच्या धगीत दिवसेंदिवस मजेत तग धरून झुलत असतात. आधीच्या पडझडीची, सोसलेल्या तगमगीची कोळिष्टकं त्या रसरशीत पिवळेपणाला काळवंडायची हिंमत करू शकत नाहीत. त्या नाजूक जीवांना जे जमतं, ते आपल्याला का जमू नये? जमतं, जमवायला हवं.

काय सुंदर विचार!! केवळ आणि केवळ ह्याचे कौतुक करण्यासाठी फार फार दिवसांनी लॉग इन केले!!

vt220, विशेष आभार Happy खूप छान वाटलं.

बादवे, कासवचं AACTA (Australian Academy of Cinema, Television, Arts) च्या बेस्ट एशिअन फिल्म कॅटेगरीत नामांकन झाल्याची ताजी चांगली बातमी आली आहे.

भारी लिहलय
चित्रपटात संवाद कमी आहेत पण प्रसंग बोलके आहेत. पूर्ण चित्रपटात बॅकग्राऊंड ला असलेला समुद्राचा आवाज भारी वाटतो. एकदातरी बघावा असा चित्रपट आहे. सायली खरे यांनी गाण्याला पुरेपूर न्याय दिलाय. कथा आवडली दिग्दर्शन बेस्ट होतं. फक्त खंत एवढीच की थेटर खाली होतं. पुन्हा मनात आलं की चहाच्या टपरीवर चहा पिणारे भरपूर असतात पण गवती चहा मागणारा एखादाच तो मी होतो.