अमेय - भाग २
नेहमीप्रमाणे आपल्याच तंद्रीत चालत अमेय शाळेतून घरी येतो, तर दाराला कुलूप! त्याला एकदम आठवतं, सकाळी आई म्हणाली होती 'आज दुपारी मेघाची डान्स प्रॅक्टिस आहे. मला बहुतेक उशीर होईल घरी यायला. तोपर्यंत वरती लेले मावशींकडे बस.'. त्याला खरं तर हे असलं दुसऱ्याकडे बसून रहायला अजिबात आवडत नाही, शेजारी असले म्हणून काय झालं! कुक्कुलं बाळ का आहे तो आता? लेले मावशी तस्सच वागवतात त्याला अजून. नाईलाज म्हणून तो जिना धाडधाड चढून वरती जातो. मावशींनी बहुतेक त्याला रस्त्यातून येतांनाच बघितलं असणार, ब्लॉकचा दरवाजा सुद्धा उघडाच आहे. तो आत जातो, नेहमीच्या सवयीनी बॅकपॅक दाराशीच टाकतो.