टाळला सत्कार माझा
जीवघेणी भूक होती , मांडला बाजार माझा
श्वापदांच्या रंजनाला जाहला व्यवहार माझा
चांदणेही पाहिले अन् चंद्रही तो पाहिला मी
पण जवळचा वाटला मज शेवटी अंधार माझा
एकदा तो भेटल्यावर तृप्त झाले एवढी की
टाळला आयुष्यभर मी भाबडा शृंगार माझा
ऐनवेळी पाडले का भाव हे त्यांनी पिकाचे ?
सांग सांभाळून घेऊ मी कसा संसार माझा ?
सूर वेड्या मैफिलीचे कोंडले त्यांनी कितीही
मज पुरे हा धुंद होण्या जन्मभर गंधार माझा
अंतरीचे युद्ध आहे आणि शत्रू ओळखीचे
सोबतीला या शराच्या गर्जतो अंगार माझा