प्रतिबिंब कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 19 July, 2024 - 03:38

प्रतिबिंब

हातातलं वर्तमान पत्र डॉक्टरनी बाजूला भिरकावलं आणि त्यांनी जांभई दिली. आज सकाळीच ते आपल्या घरी पोचले होते. अमेरिका ते मुंबई, मुंबई ते पुणे आणि पुण्याहून आपल्या गावी हा इतका दूरचा प्रवास झाल्याने त्यांना खरं तर सारखी झोप येत होती. पण वर्षासव्वा वर्षानं घरी आल्यामुळे आपल्या बायकोशी, सियाशी गप्पा सुद्धा त्यांना माराव्याशा वाटत होत्या. आपण गावात नसताना काय काय विशेष घडलं हे त्यांना जाणून घ्यायची उत्सुकता होती.
“ सिया, जरा चहा टाक बघू”
“ अरे, किती पितोयसं चहा ? सकाळपासून तिसरा कप आहे हा”
“ झोप येते आहे गं . प्रवासाची दगदग काय कमी झाली का सांग.
“ झोप येते तर झोप ना. तुला कुणी नको म्हटलयं. आज रविवारच आहे
“ पण तुझ्याशी गप्प्पा पण माराव्याशा वाटतात. बायको एवढी वर्षाने भेटली आहे. किती बोलू आणि किती नको असं झालयं”
“ उजेड ! उद्यापासून पेशंटसना कवटाळून बसशील तेव्हा बायकोची आठवण सुद्धा येणार नाही तुला”
“ असं काही नाही हं. वर्षभर काय तुझी कमी आठवण येत नव्हती. आपले हे गाव डोळ्यापुढे यायचे आणि होम सिक व्हायचो. पण कस काय होतं गावात ऑल ओके ना ? मी नसल्यामुळे जोशी डॉक्टर फॉर्मात असेल ना ?
“ मग? वर्षभरात त्याने अजुनी एक गाडी घेतली.”
“ आणि रावसाहेब ? रावसाहेब कसे आहेत ? जोशी त्यांना तपासायला घरी जात होता का ?” डॉक्टरनि पुन्हा एक जांभई दिली.
“ तू झोप पहिल्यांदा. आपण नंतर बोलू. जेवणाची वेळ झाली कि मी उठवते तुला”
“ काही नाही गं. साधी जांभई तर आहे. सांग ना रावसाहेब कसे आहेत ?”
सिया क्षणभर थांबली. एक दीर्घ निश्वास टाकला. आणि नंतर म्हणाली
“ रावसाहेब गेले. तू अमेरिकेला गेल्यावर अवघ्या तीन महिन्यात त्यांना attack आला आणि ते गेले”
“ काय सांगतेस ? तरीच मी फोन करत होतो पण त्यांचा फोन स्वीच ऑफ लागत होता. त्यांच्या सुनेला पण फोन केला होता एकदा दोनदा. पण तिचाही लागत नव्हता. घरी सगळ ठीक आहे न त्यांच्या ?” सिया त्यावर काहीच बोलली नाही. पण डॉक्टरनि फारच आग्रह केल्यावर तिने सांगायला सुरवात केली. “तू नसताना गावात इतकं काही झालंय. काय सांगू तुला ?”….. डॉक्टर दिग्मूढ होऊन ऐकत होते. आणि वर्षापूर्वीचे सगळे प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात होते

डॉक्टर प्रशांत ! दिसायला देखणा. उंची सहाफूट. गोरा रंग कुरळे केस. घारे डोळे. आणि एकूणच हुशार व्यक्तिमत्व. मूळ गाव पुणे. तिथेच एम, बी, बी एस केलं. एम एस पूर्ण केलं आणि नंतर स्वत:च्या मनाशी निश्चय केला, कोणत्याही परिस्थितीत पुण्यात प्रक्टीस करायची नाही. कोणतेतरी गाव जे लहान नाही, खूप मोठे नाही अशा गावात जायचे आणि तिथे आपला व्यवसाय सुरु करायचा. त्यांना सामाजिक कामाची आवड होती असं नाही, पण पुण्यात राहून अनेक लोकांच्यातील एक असे राहण्यापेक्षा त्यांना वाटायचे गावात राहून एकमेव राहावे आणि नाव कमवावे. आणि डॉक्टर या गावात आले. गेली पाच वर्षे या गावात प्रक्टिस करून त्यांनी नाव कमावलं. आणि गावात मानही मिळू लागला. गावात तसे अजीबात डॉक्टर नव्हते असे नाही, पण प्रशांत हा एकमेव डॉक्टर असा होता जो गावात लोकप्रिय होता. वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी त्यांनी हवे ते कमावले. टोलेजंग बंगला, सुंदर बायको. काय जर नसेल तर त्यांना मुल बाळ होऊ शकले नाही. पण व्यवहारिक डॉक्टरनि त्याचा हसतमुखाने स्वीकार केला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत ऑपरेशन, ओपीडी या चक्रात डॉक्टर गुंतले असायचे. आठ नंतर कधी कुणी बोलवले तर ते व्हीझीटला सुद्धा जायचे. लोकांचे त्यांच्यावर प्रेम होते आणि त्यांनी ते जपले होते.

बुधवारचा दिवस. रात्रीचे आठ वाजले होते. डॉक्टरनि शेवटचा पेशंट तपासला, आणि अपेक्षेप्रमाणे त्यांच्या फोनची रिंग वाजली. त्यांनी थोडे अधिरतेने फोन घेतला, ओठावर आपोआपच स्मित आले. आणि तिकडून अपेक्षित आवाज आला,
“ डॉक्टर येताय ना ? रावसाहेब वाट बघतायत”
“ हो. निघालोच” डॉक्टर हॉस्पिटलच्या बाहेर घाईने बाहेर पडले.

रावसाहेब गावातील एकेकाळचं बड प्रस्थ. गावात त्यांना मान होता. केवळ घरची श्रीमंती होती म्हणून नव्हे, तर सामाजिक कार्यात सुद्धा ते सक्रीय सहभाग घ्यायचे. कुणाच्याही नडीअडीला धावून जायचे. पण गेल्या चार पाच वर्षात मात्र ते पूर्ण थकून गेले होते. रावसाहेबांच घर वडिलार्जित होते. पण त्यांच्या मुलाने त्यात सुधारणा करून घेतल्या होत्या. वरती दोन खोल्या वाढवल्या होत्या. त्या खोल्याकडे जायला वेगळा जिना त्यांनी बांधला होता. रावसाहेबांना सोबत म्हणून कुणी भाडेकरू ठेवला होता. त्यांना पैशाची गरज नव्हती. पण सोबतीला कुणीतरी असणे गरजेच होते, आणि रावसाहेबांची काळजी कुणीतरी घेते आहे म्हणून मुलगा सून पुण्यात रमले होते. अधून मधून यायचे, चार दिवस राहयचे, कधी रावसाहेबांना पुण्याला घेऊन जायचे असे त्यांचे सगळे दिवस आनंदात चालले होते. पण एक दिवस मुलगा, सून आणि सूनेचे आईवडील रावसाहेबाना गावाकडे भेटायला येताना तो अपघात झाला. गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी सामोरून येणाऱ्या टेम्पोवर आदळली. मुलगा जय, सुनेचे हेमांगीचे आईवडील जागीच ठार झाले. हेमांगीला मुका मार बसला, पण त्या अपघातातून ती मात्र वाचली. आता रावसाहेबांना हेमांगीशिवाय आणि हेमांगीला रावसाहेबांच्या शिवाय कुणी नव्हते. सुनेची त्यांना दया यायची. हेमांगी तरुण आहे, तिचे लग्न करून दिले पाहिजे या विचाराने रावसाहेब अस्वस्थ असायचे. या सततच्या काळजीने त्यांना एकदा heart attack आला होता. डॉक्टरनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले, अन्जुओप्लास्टरी केली. आणि रावसाहेब त्यातून निभावले. पण त्यांनतर सत्तरी ओलांडलेले रावसाहेब मनातून मात्र घाबरले होते. त्याचमुळे त्यांना धीर देण्यासाठी, तपासण्यासाठी डॉक्टर त्यांच्याकडे आपलेपणाने दर बुधवारी जायचे. डॉक्टर आले कि रावसाहेबांना बरे वाटायचे. दोघांचे एकमेकाशी घट्ट नाते जमले होते. हेमांगी सुद्धा रावसाहेबांची मुलीप्रमाणे काळजी घ्यायची.
“बाबा, डॉक्टर येतील एवढ्यात”
“ आज कसे येतील डॉक्टर ? आज मंगळवार ना ?”
“ असं काय करता बाबा ? आज बुधवार नाही का ? विसरलात ?”
“ आज बुधवार आहे ? लक्षात येत नाही ग. दिवस कुठला काय काही कळत नाही. तब्बेत साथ देत नाही, विसरायला होतं मला आताशा”
“ असे काही नाही बाबा. आमचेही असे होतेच ना ? आणि आज डॉक्टर आले कि तुम्ही आणखी फ्रेश व्हाल. काळजी करू नका”

डॉक्टरांची गाडी दारात थांबली आणि रावसाहेब त्यांना भेटायला उतावळे झाले. हसतमुख डॉक्टरनि घरात प्रवेश केला, आणि हेमांगी आत निघून गेली. डॉक्टरना कॉफी आवडते हे तिला आता सवयीने माहिती झाले होते.
“ काय रावसाहेब बरं आहे का ?” डॉक्टरनि त्यांचा हात हातात घेऊन नाडी तपासायला सुरवात केली.
“ बरे आहे. पण छातीत डाव्या बाजूला थोडं दुखत हो” रावसाहेबांनी सांगितले. डॉक्टर मोठ्याने हसले.
“ रावसाहेब, तुम्हाला काहीही झाले नाही. हे तुम्ही जे सांगताय ना ते सगळ मानसिक आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही घराच्या बाहेर पडा. तुमची दारात बाग आहे, त्या बागेत फेरफटका मारा, झाडांना पाणी घाला. आजार तुमच्या मनात आहे. शरीरात नाही. शरीर ठणठणीत आहे.”
“ मी पण बाबाना खुपदा सांगते. मी तुमच्याबरोबर येते म्हणून सांगते. पण ऐकतच नाहीत” हेमांगीने कॉफीचा कप डॉक्टरांच्या हातात दिला. डॉक्टनि एक कटाक्ष हेमंगीकडे टाकला आणि पुन्हा ते रावसाहेबांच्या कडे बघू लागले. पण मनात हेमांगीचा विचार होता. हिचा नवरा जेव्हा गावात यायचा, त्यावेळी त्याच्याशी भेट व्हायची. त्याच वेळी हिच्याशी सुद्धा बोलायचो. मोकळेपणी बोलायची. पण जय गेला आणि सगळी गणित बदलली. आता रावसाहेबाना भेटायला येतो त्यावेळी त्याच्यादेखत काहीच बोलू शकत नाही.
“ ते नाही म्हणाले तरी त्यांना घेऊन जात जावा. काही गोष्टी न घाबरता कराव्या लागातात.” डॉक्टर म्हणाले, हेमांगी हसली आणि कप घेऊन आत गेली.
“ रावसाहेब, कसे आहात?” रावसाहेबांनी आणि डॉक्टरनि दरवाजाच्या दिशेन बघितले. दारात सुदीप होता.
“ ये रे बाळा. हा एक पोरगा येत जात राहतो म्हणून घरात चैतन्य आहे बघा”
“ नमस्ते डॉक्टर.
“ सुदीप ना हा ? सदानंदकाकांचा मुलगा ?” डॉक्टरनि रावसाहेबांना विचारले
“ होय. चांगला मुलगा आहे
“ डॉक्टर, पेशंट काय म्हणतोय ?”
“ पेशंट ? इथे कुणीच पेशंट नाही “
“ अहो तो माझ्याबाबतीत विचारतोय “
“ पण सुदीप, रावसाहेब पेशंट नाहीतच. त्यांचा आजार मानसिक आहे. जरा बाहेर फिरले कि सगळ ठीक होईल”
“ रावसाहेब, मी घेऊन जाऊ का फिरायला तुम्हाला ? का तुमची करमणूक करण्यसाठी एखांद गाणं म्हणून दाखवू आत्ता ?”
“ भाउजी नको ह, आमच्या शेजारी लवकर झोपतात” हेमांगी म्हणाली. सगळेजण हसले. हेमांगीने भाउजी म्हटल्यावर सुदीपचा चेहरा पडला. थोड्यावेळात डॉक्टरनि सुद्धा रावसाहेबांचा निरोप घेतला. त्यांनी रावसाहेबांच्या घराकडे वळून बघितलं. खिडकीचा पडदा दूर करीत कुणीतरी बघते आहे असा त्यांना उगीचच भास झाला.

सुदीप रावसाहेबांजवळ थोडा वेळ बसला. थोडी विचारपूस केली. पण आज नेहमीप्रमाणे त्याचं गप्पात लक्ष नव्हतं. थोड्यावेळाने तो उठला, आणि वरच्या खोलीत गेला. अनेक वर्षे तो घरी येत असल्याने रावसाहेबांचे घर त्याला आपले वाटत होते. हेमांगी वरच्या खोलीत बसली होती.
“ सुदीप भाउजी, या ना. मला वाटलं तुम्ही गेला असाल. तुम्ही कॉफी घेणार का ? मघाशी डॉक्टरना केली होती”
“ नको. मला थोडे बोलायचं होत वहिनी. पण मला एक प्रोमीस करा. माझ्या बोलण्याचा तुम्ही गैरसमज करून घेणार नाही”
“ भाउजी, इतकी प्रस्तावना नको. बोलायचं ते बोला”
“ वहिनी, मला तुमचा स्वभाव आवडतो. जयची आणि माझी चांगली मैत्री होती. अनेक बाबतीत त्याने मला मदत केली आहे. माझे शिक्षण पूर्ण करण्यात, अभ्यासात मदत करण्यात, अनेक घरगुती बाबतीत त्याने मला सल्ला दिला आहे. मला तीच मैत्री तुमच्याशी करायची आहे.”
“ आपली मैत्री आहेच भाउजी”
“ मला हेच भाउजी आणि वहिनी नातं आवडत नाही” हेमांगी खळखळून हसली. कॉलेज मध्ये असताना तिचे अनेक मित्र होते. स्वत: जय पहिल्यांदा तिचा चांगला मित्र होता आणि नंतर दोघेजण प्रेमात पडले आणि लग्न झाले. त्यामुळे सुदीपने असे बोलल्यावर तिला काहीच आश्चर्य वाटले नाही.
“ मी काय म्हणू तुम्हाला ? सुदीप म्हणू ? अरे तुरे बोलवू. चल बोलावते तुला सुदीप” हेमांगी चिडेल, काहीतरी लागट बोलेले असे त्याला वाटले. पण ती लगेच हो म्हणाली त्यामुळे सुदीप खुश झाला.
“ थंक्स वहिनी” त्याने हसत आपला हात पुढे केला.
“ वहिनी? नाही चालणार. हेमांगी म्हण.”
सुदीप “थंक्स हेमांगी” म्हणाला. आणि हेमांगीने आपला हात त्याच्या हातात दिला. दोघेही खळखळून हसले. त्यांचा जोराने हसण्याचा आवाज खाली ऐकू आला रावसाहेबांनी त्यांच्या बोटांची अस्वस्थ हालचाल केली.

डॉक्टरनि स्कॉचचा अजुनी एक पेग भरला. स्वत:च्या केसावरून त्यांनी अस्वस्थ होऊन हात फिरवला. ते सहज उठले आणि समोरच्या आरशात त्यांनी स्वत:च प्रतिबिंब बघितलं. आपल्या देखण्या रूपावर ते खुश झाले. कोणतातरी विचार त्यांच्या मनाला चाटून गेला आणि ते गालातल्या गालात हसले. समोर असलेला फोन त्यांनी सहज हातात घेतला आणि एक नंबर फिरवला

सुदीप गेला आणि हेमांगी उगीचच विचार करीत बसली. सुदीप जय कडे यायचा, दोघांचे छान सुत जमले असायचे. आपण पुण्यात असताना जयशी तो फोनवर सुद्धा बोलायचा. आपणही बोलायचो त्याच्याशी. पण हे आज मैत्रीच काय म्हणत होता.? जय असताना सुद्धा जर त्याने मैत्रीचा हात पुढे केला असता तर आपण हो म्हणालो असतोच. मग हे जय नसताना त्याला काय सुचले कुणास ठाऊक ? पण खरचं त्याला मैत्री करायची आहे का ? तसा चांगला आहे मुलगा. शिक्षण नुकतेच पूर्ण झालं. नोकरी शोधतोय. स्मार्ट आणि बोलका आहे. आपल्यालाही त्याच्याशी बोलताना चांगलं वाटतं. इतक्यात फोन वाजला. हेमांगीने स्मित करीत फोन घेतला. फोन बराच वेळ सुरु होता.

“ हेलो, डॉक्टर ! मी रावसाहेब” आज कोणता वार मंगळवार ना ? उद्या रावसाहेबांच्या कडे जायचं आहेच की. मग तरी आज त्यांचा फोन ? आणि नेहमी त्यांची सून फोन करते. आज स्वत: रावसाहेब. आणि आवाज असा का येतोय ?
“ बोला रावसाहेब ? बराय ना तुम्हाला ? आणि आवाज असा का येतोय ?”
“ मला थोड घाबरल्यासारखे होतंय. तुम्ही लगेच याल का ?” इमर्जनसी आहे म्हणून डॉक्टर हॉस्पिटल मधून बाहेर पडले.

“ काय होतंय रावसाहेब ? सगळ ओके तर वाटतय मला” रावसाहेबांच्या छातीवर स्टेथोस्कोप ठेवत ते बोलू लागले. पण आज रावसाहेब घरी एकटे कसे याच त्यांना आश्चर्य वाटत होत.
“ रावसाहेब, तुम्ही घरी एकटे कसे ? सून बाई कुठे आहे ?” रावसाहेब पुन्हा घाबरले.
“ ती आणि सुदीप दोघेही बाहेर गेलेत कुठतरी.” डॉक्टरांच्या कपाळावर सूक्ष्म आठी पडली.
“ पण कुठ ते सांगून गेले नाहीत” ?
“ नाही. काहीतरी बोलली. पण माझं लक्ष नव्हत”
इतक्यात बाहेर सुदीपच्या गाडीचा आवाज आला. हेमांगी आणि सुदीप दोघेही हसत आत आले. हेमांगी आज सुंदर दिसत होती. त्यांनी सुदीप कडे रागाने बघितले आणि एक कटाक्ष त्यांनी हेमांगीकडे टाकून म्हणाले
“ रावसाहेबांना असं एकटं टाकून चालणार नाही. त्यांच्या सोबतीला कुणीतरी असायला पाहिजे नेहमी “ स्वत:च्या नाराजीवर नियंत्रण ठेवत ते म्हणाले.
“ आम्ही तुम्हालाच भेटायला गेलो होतो. बाबा दुपारपासून उगीचच घाबरत होते. सुदीप सारखा त्यांना समजावत होता. तुम्ही उद्या घरी येणार हे माहिती होतं, मग आज पुन्हा डिस्टर्ब करण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन एखादी गोळी लिहून घ्यावी म्हणून तुमच्या कडे गेलो होतो” डॉक्टरांनी एक नजर सुदीपकडे टाकली.
“ सुदीप तुमच्याकडे जातो म्हणाला. येताना औषध घेऊन येतो म्हणाला. पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता. काहीतरी उगीच औषधात गोंधळ घालेले म्हणून मी म्हणाले चल आपण दोघेही जाऊ. पण शेवटी तुम्ही इथेच भेटलात” ती सुदीप कडे हसत म्हणाली. हेमांगीने सुदीपचा एकेरी उल्लेख केला आणि डॉक्टर अस्वस्थ झाले. रावसाहेब बोटांची अस्वस्थ हालचाल करू लागले.
“ मी औषध लिहून देतो. सुदीप, तू लगेच घेऊन ये” डॉक्टर म्हणाले आणि सुदीप गाडीवरून निघून गेला.
हेमांगी कॉफी करण्यासाठी आत गेली. डॉक्टर तिच्या मागे गेले. आणि हलक्या आवाजात म्हणाले.
“ सुदीप, मुलगा बरा आहे ना ?
“ का ? चांगला आहे कि”
“ तुम्ही बाहेर गेल्याने रावसाहेब अस्वस्थ झालेत असे माझ्या मनात आले. सांभाळा थोडे प्रकृतीला .. रावसाहेबांच्या. आणि सुदीप आणेल ती औषध चेक करून मगच रावसाहेबांना द्या. काळजी घ्या.” डॉक्टर निघून गेले. डॉक्टरांच्या साठी gas वर ठेवलेली कॉफी उतू गेली. हेमंगीचे तिकडे लक्षच नव्हते. ती खिडकीतून बाहेर सुदीपची वाट पाहत होती.

“ प्रशांत, कुठे हरवला आहेस तू ? कसला विचार करतोयस?”
“ तू जे सांगतेस ते कल्पनेच्या बाहेर आहे. आणि या वर्षभरात तू मला बोलली सुद्धा नाहीस.”
“ तू अमेरिकेत एकटा असताना हे सगळ सांगायचं ? तुझे आणि रावसाहेबांचे संबध मला माहित का नाहीत?” डॉक्टर काहीच बोलले नाहीत. इतक्यात फोन वाजला. डॉक्टरनी जुजबी बोलून फोन ठेवला.
“ कुणाचा होता ?”
“ सदानंद भाऊ ? बरं वाटतं नाही म्हणाले? त्यांच्याकडे जाऊन आलं पाहिजे”

सदानंद भाऊ आज खूपच अस्वस्थ होते. अंगणातून घरात, घरातून अंगणात सारख्या येरझार्या घालत होते. बीपी चेक करण्यासाठी दवाखान्यात जायची सुद्धा त्यांना इच्छा नव्हती. आज सकाळीचं डॉक्टरना आलेलं त्यांनी बघितलं होतं म्हणून डॉक्टरना त्यांनी फोन केला होता. डॉक्टर येईल, नक्की येईल. बोलेल आपल्याशी प्रेमानं. तो भला माणूस आहे. सदानंद काका पुन्हा अधिकच अस्वस्थ होऊ लागले. आज अकाली गेलेल्या बायकोची त्यांना सारखी आठवण येत होती. सुदीपशी आपण चांगले वागलो नाही हा विचार त्यांच्या मनात यायचा आणि अजुनीच अपराधी वाटायचे. त्या दिवशी सुदीपचा आणि त्यांचा झालेला वाद, साठेचे बोलणे सगळे त्यांना पुन्हा पुन्हा आठवतं होतं

“ मी फिरून येतो “ सदानंद भाऊनि अर्धवट झोपेत असलेल्या सुदीपला सांगितले. या मुलाचं होणारं कसं ? नोकरी केव्हा लागणारं ? लग्न केव्हा होणारं ? तो लहान असतानाच त्याची आई गेली, त्याला मोठा करत असताना किती खस्ता खाल्ल्या आपण. आता याची शिस्त लागली कि आपण आपल्या जबाबदारीतून सुटलो. सदानंद भाऊ विचार करत आपल्या मित्राच्या साठेच्या घराजवळ आले. आणि नेहमीप्रमाणे साठे सुद्धा त्यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडला. दोघेही नदीच्या दिशेनं जाऊ लागले.
“ सदानंद, सुदीप काय म्हणतोय ? नोकरीचे प्रयत्न चालू असतील ना ?”
“ हो, चालू आहेत. सगळे होईतोपर्यंत काळजी आहे मला”
“ होय.” थोडावेळ साठे काहीच बोलला नाही.
“ सदानंद, एक सांगू का ? राग मानु नको आणि गैरसमज करून घेऊ नको”
“ अरे इतका फॉर्मल होऊ नको. काय बोलायचं ते बोल. गैरसमज का होईल ?
“ फॉर्मल नाही. पण विषय थोडा नाजूक आहे म्हणून थोडे बिचकत बोलतोय”
“ बोल बिनधास्त”
“ सुदीप अलीकडे रावसाहेबांच्या घरी फार वेळा असतो.” साठेच्या बोलण्यावर सदानंद हसले. पण त्या हसण्यात काळजी होती
“ साठे, रावसाहेबांचा जय आणि सुदीप दोघे मित्र होते. जय गेल्यावर तो रावसाहेबांच्या कडे आपलेपणाने जातो. हवं नको ते बघतो. इतकचं”
“ सदानंद, हा विषय इतपत मर्यादित नाही मित्रा. गावात लोक वाट्टेल ते बोलतायत तुझ्या मुलाबद्ल. रावसाहेबांची सून विधवा आहे हे विसरू नको. सुदीपची आणि तिची मैत्री आता लोकांच्या चर्चेचा विषय झाली आहे” सदानंद काहीच बोलले नाही. थोड्या वेळाने त्याने आगतिक होऊन विचारले
“पण मी काय करु ?
“ त्याला समजून सांग. वेळ पडली तर दरडावून सांग. पण त्याच रावसाहेबांच्या कडे जाण बंद कर”

“ सुदीप” पायातलं चप्पल काढत सदानंद भाऊ सुदीपला हाक मारली. दिवसभर ते सुदीपशी बोलायची संधी त्यांना मिळत नव्हती. म्हणूनच संध्याकाळी बाहेरून आल्यावर त्यांनी घरी आल्याआल्या सुदीपशी बोलायचे ठरवले होते. आपल्या आवाजातला राग ते लपवू शकले नाहीत.
“ आलो बाबा”
“ मी काय सांगतो ते आता लक्ष देऊन ऐक. या क्षणापासून तुझ रावसाहेबांच्या कडे जाण येण बंद. त्यांचा विचार सुद्धा करायचा नाही. तू फक्त नोकरी कशी लागेल याचाच विचार करायचास” बाबांचा मूड वेगळा होता हे सुदीपने ओळखले. पण रावसाहेबांच्याकडे जाणे येणे बंद हा विनाकारण त्यांनी सोडलेला हुकुम मात्र त्याला आवडला नाही.
“ का बाबा ?”
“ मला उलट प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. हा प्रश्न विचारताना तुला लाज वाटायला पाहिजे. गावात माझी अब्रू जायला लागली आहे. लोक वाट्टेल ते बोलत आहेत आणि तू “का बाबा” म्हणून मलाच विचारतो आहेस”
“ पण तुमची किंवा माझी अब्रू जाईल असे मी काहीच केले नाही”
“ त्या रावसाहेबांच्या सुनेशी तुझं काय चालू आहे ? शोभत तुला ? जय तुझा मित्र होता ना ? मग त्याच्या विधवा बायकोशी .. “
“ बाबा , काहीही बोलू नका. हेमांगी माझी मैत्रीण आहे”
“ एका विधवेशी मैत्री”
“ मैत्री विधवा किंवा सधवा बघत नाही बाबा. मैत्री मैत्री असते”
“ मूर्ख ! स्त्री पुरुष मैत्री असू शकत नाही. आणि भले तू चांगला वागत असशील सुद्धा पण दारूच्या गुत्तावर जाऊन तू दुध पिऊन आलास तरी लोक तुला दारू पिऊन आला असच म्हणतात”
“ बाबा, तुम्ही आमच्या मैत्रीचा अपमान करता आहात. रावसाहेबांच घर हे दारूचा गुत्ता नाही. आणि आमची मैत्री शुद्ध आहे”
“ मी तुझी बकवास ऐकून घेणार नाही. जे सांगतो ते ऐकायचं” एरवी कधीही वडिलांच्या पुढे ब्र सुद्धा काढू न शकणारा सुदीप आज वडिलांना उलट बोलत होता. हा वाद वाढवण्यात अर्थ नाही हे त्यालाही वाटत होते. पण वडिलांचे शब्द अब्रू, दारूचा गुत्ता हे मात्र त्याच्या मनात भिरभिरीत होते. तो रागानेच घराबाहेर पडला. कुठे जायचे हे त्याच्या डोक्यात पक्के होते.

त्या दिवशी सुदीप खूप उशिरा आला होता. डोळे तारवटले होते. पण सदानंद भाऊ काहीच बोललो नाही. मुकाट्याने दार उघडलं आणि दोघेही न बोलता झोपायला गेले. त्या दिवशी रात्री सुदीप गेला कुठे होता ? तोंडाला उग्र दर्प येत होता. मनातली शंका सदानंद भाऊनि झटकून टाकली.
दुसर्या दिवशी साठे घरी आला होता. तो काल अवंती बार मध्ये मित्रांच्या बरोबर गेला होता. साठे ड्रिंक्स घेतो. त्याचा मित्र परिवार बराच आहे हे सदानंद भाऊना माहिती होतं. एरवी बर्याच गोष्टी तो रसभरीत वर्णन करून तो सांगत असतो आणि सदानंद भाऊ सुद्धा मजा घेत ते ऐकत असतात. पण साठेने जे सांगितले त्यांनतर मात्र त्यांची झोप पूर्णपणे उडाली.

अवंती बार. रात्री नऊ वाजले होते. बार नेहमीप्रमाणे ठासून भरला होता. लोकांचा गोंगाटात कोण काय बोलते ते कळत नव्हत. हिंदी गाणी मोठ्या आवाजात लागली होती. आणि एका कोपर्यात चार तरुण बसले होते.
“ आयला, सुदीप मात्र लकी आहे. साल्याने चांगल गाठलं”
“ पण वाटत नव्हत रे तो असा आहे. आयुष्यात याने बिअर च्या वर मजल नाही मारली.”
“ बिअर सुद्धा कधीतरी. किंगफिशर माईल्ड” सगळेजण हसले.
“ आणि आता होट बाई” पुन्हा हास्याचे फवारे,सळ्यांनी एकमेकाचे ग्लास भरले.
“ अरे ते बघ. ते बघ कोण आलंय ? सगळ्यांच्या माना एकावेळी तिकडे वळल्या.
“ आयला सुद्या तू. इथं ? “
“ याला एक किंग फिशर सांगा रे माईल्ड” इतक्यात वेटर जवळ आला.
“ एक व्हिस्की सांग. ब्लेड्स प्राईड”
“ आयला, सुद्या तुला काय झालंय ? व्हिस्की. पोरगा फॉर्मात आहे ” समोर आलेल्या पेगमध्ये कसेबसे सुदीपने पाणी ओतले. आणि ओठाला ग्लास लावला. एक घोट पोटात गेला आणि त्याला ती कडवट चव हवीशी वाटू लागली. त्याने दुसरा पेग मागवला.
“ सुद्या, मानला तुला ? आता इथून डायरेक्ट तू रावसाहेबांच्याकड जाणार का ? आयटेमला भेटायला”
“ फालतू बकवास करू नको. मैत्रीण आहे माझी ती. बापाने डोक फिरवल म्हणून इथे आलो आणि आता तू “ मद्याची नशा हळू हळू चढत होती.
“ मैत्रीण. अशी मैत्रीण सगळ्यांना मिळो” पुन्हा हास्याचे फवारे.
“ पण यार, आपला पण नंबर लाव की. मग मैत्री काय कामाची”
“ थोबाड फोडीन मी” सुदीपचा आवाज चढला. ग्लासातील उरलेली दारू त्याने मित्राच्या तोंडावर फेकली आणि तो बार मधून निघून गेला. डोक अजुनीच फिरलं होत. डोक्यातील आग त्याला शांत करायची होती. त्याची गाडी रावसाहेबांच्या घराकडे वळली.

सुदीपने आपली टू व्हीलर रावसाहेबाच्या बंगल्याजवळ थांबवली. घरी सामसूम होती. हेमांगीला भेटावे असे त्याला वाटत होते. तो क्षणभर तिथे थांबला. जिन्याचा दरवाजा उघडाच होतो. त्याने काही विचार केला. जवळ असणाऱ्या पान पट्टीच्या दुकानात त्याने सिगरेट घेतली. आज सगळे निर्बंध तोडायचे हा जणू त्याने निश्चय केला होता. तो रावसाहेबांच्या बंगल्याच्या दिशेने जाऊ लागला.
“ सुदीप, आता यावेळी काय करतोयस इथे ?”
साठे काकांना बघून त्याने हातातली सिगरेट खाली टाकली.
“ काका तुम्ही ?”
“ मी मित्रांच्या बरोबर बाहेर जेवायला आलो होतो.” त्याला अवंती बार मध्ये बघितलं हे साठेनी मुद्दामच सांगितल नाही. ड्रिंक्स घेऊन सुदीप कुठे जातोय हे साठे ना बघायचं होतं. आणि नेमका तो रावसाहेबांच्या बंगल्याजवळ आला होता.
“पण तू काय करतोस इथं ?
“ मी चक्कर टाकायलाच आलोय” सुदीपने वेळ मारून नेली. साठेनी एक नजर सुदीप कडे आणि एक नजर रावसाहेबांच्या घराकडे टाकली आणि ते निघून गेले. घरी परत जाताना त्यांना सदानंद भाऊची त्यांना काळजी वाटू लागली.
डॉक्टर सदानंद भाऊंच्या कडे जाऊन येतो म्हणून बाहेर पडले. पण ते तिकडे गेलेच नाहीत. त्यांची गाडी आपोआप रावसाहेबांच्या बंगल्याकडे गेली. बंगल्याला कुलूप होते. एरवी नेहमी जाग असणारा बंगला आता शांत होता. सियाने एकेक गोष्टी सांगितल्या आणि ते बेचैन झाले होते. डॉक्टरना अमेरिकेला बोल्वाल्याचे पत्र आले आणि त्याच्याआधल्या दिवशी.....
रात्रीचे दहा वाजले होते. डॉक्टरनि तिसरा पेग भरला. आज सिया लवकर झोपी गेली होती. त्यामुळे त्यांना अडवायला कुणीच नव्हते. ड्रिंक्सचे घुटके घेत असतानाच त्यांची नजर तशीच समोरच्या आरशाकडे गेली. स्वत:च्या कुरळ्या केसावरून त्यांनी अलगद हात फिरवला. आणि पुढच्या क्षणी त्यांच्या मनात काहीसा विचार चमकून गेला. ते सैरभैर झाले. घड्याळाकडे त्यांची नजर गेली. काहीसा निश्चय करून ते उठले. सिया झोपली असल्याने तिला सांगायचा प्रश्नच आला नाही. त्यांनी बाहेरून flat ला कुलूप घातले. आज नेहमी प्रमाणे त्यांनी फोर व्हीलर बाहेर काढली नाही. टू व्हीलर वरून ते रावसाहेबांच्या घराच्या दिशेने गेले.
त्यांनी बाहेरूनच बघितल. रावसाहेब नेहमी खालच्या मजल्यावर असतात . तिथे अंधार होता. बहुतेक रावसाहेबांना झोप लागली असणार. त्यांची नजर वर गेली. तिथे डीम लाईट लागला होता. घराचा मुख्य दरवाजा बंद होता. शेजारी असणारा जिन्याचा दरवाजा त्यांनी हळूच ठोठावला. कुणालाही चाहूल न लागता दार उघडलं गेलं. आणि डॉक्टर हेमांगीच्या खोलीत आले.
“ डॉक्टर, तुम्ही ? यावेळी ? हेमांगीने दबक्या आवाजात विचारलं
“ होय मीच.” त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कुरळ्या केसावरून हात फिरवला.
“ पण ..”
“ काही बोलू नकोस हेमांगी. त्या म्हातार्या मुळे मला तुला भेटता येत नाही.” हेमांगी पुढे बोलू शकली नाही. डॉक्टरनि तिला मिठीत घेऊन तिचे तोंड बंद केले होते. अंधारात दोन आकृत्या – कपड्यांची होत असणारी सळसळ- अस्पष्ट आवाज – बांगड्यांची किणकिण – आणि श्वासांचे घुमारे ..
रावसाहेब अर्धवट झोपेतून जागे झाले. कुठूनतरी काहीतरी अस्पष्ट आवाज येत आहेत असे त्यांना जाणवत होते. ते बेचैन होऊन उठले. खिडकीजवळ गेले. दूरवर कुठेतरी काम चालू होते. लोखंडावर लोखंड आपटत होते. ठक.. ठक.. ठक.. ठकठक .. ठकठक.. ठकठकठक.. आवाजाचा वेग वाढत होता. आणि अचानक तो आवाज बंद झाला. रावसाहेबांना घाबरल्यासारखे झाले. त्यांच्या कपाळावर घर्म बिंदू जमा झाले. आणि ते जोराने ओरडले. “ हेमांगी” हेमांगी . जिन्यावर पावलांचा आवाज आला
“काय बाबा ?” म्हणून हेमांगी खालती आली. कुणीतरी आपल्या घरातून बाहेर जात आहे असे रावसाहेबांना वाटून गेले.
“ बाबा, काही होतंय का तुम्हाला ?
“ हेमांगी, कुणी आलं होतं का ? कुणीतरी आता जिन्याच्या दारातून बाहेर जात आहे असं मला वाटलं”
“ बाबा, तुम्हाला भास झाला असेल. आत्ता यावेळी कोण येणार ?”
“ कसला तरी आवाज येत होता?”
“ तो टीव्हीचा आवज असेल. मी वर बघत होते”
“ नाही ग. हेमांगी, मला भीती वाटते. तू इथेच बैस. जाऊ नको”
“ नाही जाणार. उद्या पुन्हा डॉक्टर ना बोलवू आपण. उगीच घाबरता तुम्ही. तुम्हाला भास होत असतात सारखे.

डॉक्टर बेडरूम मध्ये गेले. आणि सियाला त्यांनी जवळ ओढून घेतले. सिया झोपेतून जागी झाली.
“ तू आलास ? कुठे गेला होतासं ? मघाशी मला जाग आली तेव्हा बघितलं तेव्हा शेजारी तू दिसला नाहीस ?”
“इथच होतो. तुझ्याजवळ” डॉक्टरनी तिला अधिकच जवळ ओढून घेतलं.
“ आणि हे काय होतयं तुला अलीकडे?
“ तुला बघितले कि चैन पडत नाही बघ”
“ नाटकी पणा करू नको. “ ती पण त्याच्या जवळ गेली. आणि काही क्षणातच दोन आकृत्या अंधारात विरगळल्या.

डॉक्टर सकाळी उठले. आणि सिया ने त्यांना चहा दिला. चहा घेता घेताच दोघेही गप्पा मारू लागली.
“ काल दिवसभर तू ऑपरेशन मध्ये होतास, रात्री तुझा मूड वेगळा होता, म्हणून मी बोलले नाही. पण तू काय करतोस, तुझ्या डोक्यात काय चालले असते हे मला पूर्णपणे कळले आहे”
“ म्हणजे ? काय कळले आहे तुला ? डॉक्टरनि बिचकत विचारले.
“ गोष्टी चोरून करत असतोस म्हणजे इतरांना कळत नाहीत असे तुला वाटते ?
“ मी काय चोरून केले ? “ ते पुन्हा घाबरले.
“ काही केले नाहीस. ? काल तुला एक पत्र आले. कोण तुला पत्र पाठवत असते म्हणून मी मुद्दामच ते फोडले. आणि तुझ बिंग बाहेर पडले”
डॉक्टर काही बोलले नाहीत. सियाने हॉल मधील कपाट उघडले. आणि त्यातून पत्र बाहेर काढले. आणि डॉक्टरच्या हातात ठेवले.
“ हे बघ. काय आहे हे ?” डॉक्टर पत्र वाचत गेले आणि मघाशी घाबरलेला चेहरा एकदम आनंदी दिसू लागला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सिया पण आनंदली. हि बातमी चार दिवसापूर्वीच कळली असती , पण आपण मेल बॉक्स उघडला नाही. पण आज पोस्टाने हार्ड कॉपी आली आणि ते आनंदले.
“ सिया सिया. आय लव्ह यु. पण किती घाबरवलस मला”
“ पण तू जर मला सांगितल असतसं मी अमेरिकेला आधुनिक मेडिकल सायन्सच्या शिक्षणासाठी जाणार आहे. तर मी तुला काय आडवलं असतं ?”
“ नाही. पण मी वर्षभर तिकडे जाणार. तू इकडे एकटी राहणार. मला पटत नव्हत. त्यात सिलेक्शन होईल नाही होईल याची मला खात्री नव्हती. पण ऐक ना मी जाऊ ना अमेरिकेला?
“ जा नक्की. अरे पाच वर्षे गेली आपली, एका वर्ष असेच जाईल. “

“ अहो एक वर्ष काय असेच जाईल” डॉक्टर कॉफी पिता पिता म्हणाले. पण हेमांगीच्या नजरेत काळजी दिसत होती.
“ बाबांना, तपासणार कोण ? औषध कोण देणार ? त्यांना सारखी तुमची आठवण येईल ?” दोघांची नजरानजर झाली.
“ मी जोशी डॉक्टर ना सांगून दिलंय. तो येत जाईल. काही लागले सावरले तर व्हिडीओ कोल करता येईल कि.”
“जाण गरजेच आहे ?
“ हि संधी लाखात एक आहे. वर्ष असेच जाईल निघून.

रावसाहेबांच्या बंगल्याजवळ डॉक्टर फार वेळ थांबू शकले नाहीत. ते सदानंद भाऊंच्या कडे गेले आणि त्यांना तपासून बाहेर पडले. घरी सिया वाट पाहतच होती.
कसं आहे सदानंद भाऊ ना ?
बर आहे. बिपी वाढलयं त्यांच. त्यांना झोपेची गोळी देऊन मी बाहेर पडलो”
“ बिपी वाढेल नाहीतर काय होईल ? असा मुलगा जन्माला आला म्हटल्यावर कोणत्या बापाला बरं वाटेल सांग.”
“ पण सुदीप असे करेल असे वाटले नाही. जयला केवढे मानायचा तो.”
“ सुदीपच जाऊ दे. पण हि बया घरात म्हातारा सासरा असताना असं करते. सुदीप पासून तिला दिवस जातात. हे शोभतं तिला ? रावसाहेबांनी तिला घरातून हाकलून काढले ते बरोबर वाटत नाही तुला ?”
“ हो हो. सगळचं दुर्देवी आहे गं. रावसाहेब बिचारे मात्र गेले. या प्रसंगाचा त्यांना धक्का बसला असणार. पण सुदीपला सुद्धा त्यांनी घरातून हाकलून काढल म्हणालीस तू. कुणी शोधलं नाही का त्याला ?
“ तो जीवंत आहे कि मेलाय हे सुद्धा माहित नाही. भाऊ आपल्या अब्रूला कसे जपायचे माहित आहे तुला”
“ आणि हेमांगी ?
“ सांगितलं न तुला. तू जातोस बघ मोफत तपासायला त्या एकटी आश्रमात तिथे बाळाचा जन्म होईतो पर्यंत राहिली. आणि नंतर काय झालं कुणास माहित?
म्हणजे ?
“ कोण म्हणतय ती आणि सुदीप कुठेतरी निघून गेली, कोण म्हणतंय तिला वेड लागले आणि पुण्याला येरवड्यात तिला ठेवलंय, तरी कुणी सांगितल तिने आत्महत्या केली”
“ अरेरे. राव्साहेबाच्या घराची खरंच शोकांतिका झाली”

संध्याकाळ झाली, आणि डॉक्टरांची गाडी त्यांच्या नकळत “एकटी” आश्रमाकडे गेली. तिथे ते नेहमी येत असल्याने त्यांना सर्वजण ओळखत होते. हेमांगीची त्यांना दया येत होती. रावसाहेबांच्या निधनाचे त्यांना वाईट वाटत होते. खरं म्हणजे ते “ एकटी” मध्ये येऊन काय करणार होते ? तिथे कोण असणार होते ? पण त्यांची पाउले आपोआप तिकडे वळली होती. स्वत:च्या नकळत कुठेतरी हेमांगी दिसेल कि काय ते शोधत होते. रावसाहेबांच्या घराशी त्यांचे नाते निर्माण झाले होते. आता रावसाहेब नाहीत तर निदान हेमांगी भेटावे असे त्यांना सारखे वाटत होते. सगळ्याचे नमस्कार स्वीकारत ते पुढे पुढे चालले होते. एका कोपऱ्यात दोन बायका एक छोट्या मुलाला खेळवत होत्या. डॉक्टर दिसल्यावर बायकांनी त्यांना नमस्कार केला. बाळाला खेळवत असताना त्यांची नजर पुन्हा पुन्हा डॉक्टर कडे जात होती. डॉक्टरांना हे नवीन नव्हते. आपण दिसायला देखणे आहोत याचा अभिमान त्यांना होता. पण कुणी बाई म्हणत होती “ हे बाळ किती सुंदर आहे ना ? त्याचा चेहरा बघ. आत्ता कुठे आठ महीन्याच होतयं. पण मोठं झालं कि डॉक्टर सारख दिसेल गोरापान रंग, घारे डोळे, आणि कुरळे केस. सेम त्याचच प्रतिबिंब” डॉक्टरांच्या कानावर त्यांचे बोलणे पडत होते, हसणे खिदळणे चालू होते, डॉक्टरनीdurlakshदुर्लक्ष केले आणि गाडी स्टार्ट केली

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults