वाटते मना एकदा तरी स्वच्छंद मी जगावे ।
वाहणाऱ्या वाऱ्या समे सर्व दिशांना फिरावे ।।
कवी झालोच कधी तर वाटते बाकीबाब व्हावे ।
विश्वमनाच्या गुढ गर्भातून काव्य मोती मी वेचावे ।।
मृदु कुसुम कळी सम त्या जिवन माझे ही फुलावे ।
जैसे सुरवंटाचे फुलपाखरु होऊन रानी वनी उडावे।।
सळसळत्या नदी किनारी थरथरती पर्णपाती।
हा देखवा पाहुनी डोळा वाटे पुन्हा प्रेम करावे ।।
आकाश पटलावर चित्रकार कोण विविध रंग भरतो।
मी ही आयुष्यात कुणाच्या ऐसे सुंदर रंग भरावे ।।
फुलपाखरु..
एक होते रंगेबेरंगी
फुलपाखरु..
त्याचे 'मन'
ऐसे नाव..
ईवलेसे नाजुक
पंख तयाचे
त्यावर सुंदर नक्षी
संस्कारांची.
फुलपाखराच्या
पंखावरचे काही रंग
लाल-गुलाबी
स्वप्नांचे
बालपणीच्या आठवणींचे
उमलणार्या फुलांचे
चांदण्या रातींचे
तर
काही रंग आहेत.,मात्र
निळे-काळे
नको त्या
कटु आठवणींचे
भळभळत्या जखमांचे
चुलीतल्या विस्तवाचे..
कस्ली भारी नक्षी दिस्ते याच्या पंखावर
कस्ले मस्त उडत अस्ते न्हेमी फुलांवर
पकडावेसे वाटते पण हळुच बोटाने
भिती पण वाटते थोडी लागेल नखाने ??
कोण याला रुप देतो इतके मजेदार
काय खाते तरी दिस्ते इतके रंगीत्दार
फुलातला मध पितं म्हणून कलरफुलं ?
तरीच दिस्तं फुलासारखं अग्दी ब्युटीफुल
फुलपाखरु व्हावे असे वाटते मला आई
उडता उडता फुलांवर मी गोड गाणे गाई
........................मी गोड गाणे गाई....
रोज एकेक स्वप्न
विसावतय मनाच्या कोपर्यात
म्हटलं, सवडीनं हाताळेन एकेक
पण तसं कधी घडलंच नाही
वाटतं, देवून टाकावीत सारी स्वप्न
जश्शीच्या तश्शी दुसर्याला
पण नकोच, मी हल्ली
एकेक स्वप्न निळ्याशार आभाळात सोडते
जसं,
खूप आवडीने धरलेल्या फुलपाखराला
मुक्त श्वास घेण्यासाठी सोडतो
तसं!
मन पाखरु झाले..
फुलपाखरु झाले...
प्रकाशचित्र १.
स्वच्छंदी जगणारी फुलपाखर पाहुन असच वाटत ....नाही का ?. आपल आयुष्य पण असच असाव...
वेगवेगळ्या रंगाची ,सळसळत्या चैतन्याची ,हसतखेळत बागडणारी ,फुलांचा खरा आस्वाद घेणारी ही पाखर नेहमीच आपल्याला आनंद देतात.
बालपणी तुम्हीही धावला असाल ह्यांच्या पाठी. त्यांच सौंदर्य न्याहाळायला कधी गंमत म्हणून कधी हातात धरलेही असाल.