आज कामानिमित्त किती दिवसांनंतर या भागात आले. पुस्तकांचं जुनं दुकान दिसल्यावर आपोआप आत शिरले. तेही आता थोडं बदललं होतं. हवं ते पुस्तक स्वतः हात लावून घेता येणार होतं. मी "New Arrivals" च्या शेल्फसमोर जाऊन उभी राहिले. एक पुस्तक उघडलं. नकळत नाक पानांच्या अगदी जवळ नेऊन, त्याचा भरभरून वास घेतला, तू घ्यायचास तसाच. अचानक तूच जवळ आल्याचा भास झाला. मी इकडे तिकडे पाहिलं आणि पानं उलगडायला लागले.
ग्रीश्म जाळे जरी अन शिशिर गोठवीत आहे;
तुझी याद येता वसंत पालवीत आहे
तुझे स्वप्न उराशी मी कवटाळूनी बसतो;
तुला मिठीत घेण्या ते खुणवीत आहे
किती श्वास झाले मी न मोजदाद केली;
तुझा गंध हरेक श्वास फुलवीत आहे
न माळतो कुणीही रक्त-जास्वंद मोगऱ्याशी;
परि हात माझा तुझ्यात गुम्फवीत आहे
हाच खेळ चाले केवळ माझिया मनाचा;
तुझे अस्तित्व सदैव भासवीत आहे
तू नाहीस मृगजळ जरी जाणतो मी;
हीं तुझी ओढ़ अनंत चालवीत आहे
तुझी वाट बघता मी दररोज येथे;
काल्पनीक चातकाला जगवीत आहे
कॉफी मशीन जवळ उभी होते माझ्या कॉफीची वाट पाहत. अचानक सिन्नमनचा गंध कुठून तरी आला. अहाहा.... !! क्रिसमस जवळ आलाय जाणवलं. तसं तर डिसेंबर सुरु झाला की सुट्ट्यांचे वेध लागतात. हवेत गारवा असतो. कधीतरी हलका फुलका स्नो पडायला सुरुवात झाली असते. पण जोपर्यंत हा ऍपल अँड सिन्नमनचा गंध दरवळत नाही, तोपर्यंत क्रिसमस आलाय हे जाणवत नाही. हा गोडसर, मंद सुवास कुठेतरी उबदार आणि आनंदी घराची आठवण करून देतो.
तुझ्या दूर असण्यालाही
गंध असतो
आठवणींचा !
जीवनात एक फक्त
तू ...
तुझे असणे, नसणे
या सार्यासह तू !
आणि
माझे जगणे
अवघेच
गंधित !