गंध कुणाचा
माझं जुनं लिखाण परत एकदा माबोवर चढवतेय.
-------------------------------------------------------------------
वोल्वो बसेस चा प्रवास आणि सुगंधाचे भयानक नाते असते. यालाच 'भीषॉन शुंदॉर' म्हणत असावेत.
नीता, मेट्रोलिंक, खुराणा, फलाणा, धमकाना... अशी या बसेस ची नावे असतात. गाडी पुण्याहून मुंबईस वा मुंबईहून पुण्यास नेतात. शेवटच्या स्टॉपवर शेवटचा माणूस उतरत असतानाच परतीचा पहिला माणूस आत चढून बसतो आणि मग पुढच्या ६ ते ७ तासांसाठी तो त्या 'भीषॉन शुंदॉर' ला सामोरा जातो. गाडीतली हवा तशीच आतल्याआत फिरत रहाते, कधीच बाहेर पडत नाही. मग त्यावर उपाय म्हणून किन्नर (आ एड्या!! किन्नर काय बोलतो.. आपन काय टरकवाले हे का? वोल्वो हे वोल्वो.. अशिश्टन म्हनायचं काय...) जो असतो तो एक शस्त्र काढतो आणि त्यातून एक फवारा मारून उंदीर मारण्याचं अति गोडमिट्ट औषश कसं असेल तसा वास गाडीभर पसरवतो. इथे आपल्या पोटातील उंदीर ते औषध पिण्यासाठी आतुर झाल्यासारखे उड्या मारू लागतात आणि पोटात सगळं काही आतल्याआत ढवळायला सुरूवात होते.
तुम्ही कुठल्याही सीटवर असलात तरी या सुगंधी कट्ट्यापासून तुमची सुटका नाही. पुढची सीट मिळाली. ऐसपैस जागा (ही व्होल्वो च्या बाहेरच असते. आत कोणे एके काळी असायची!!) मिळाली असं समजून तुम्ही सुखावताय तोच तुमच्या पुढच्या सीटवर म्हणजे ड्रायव्हरच्या जागी चालक(मराठीचा विजय असो!!) स्थानापन्न होतो. आणि त्याच्या डोक्यातल्या चमेलीच्या तेलाबरोबर त्याच्या डोक्यातला घाम मिसळून तयार झालेल्या रसायनाच्या भयाण लहरी तुमच्या नाकात शिरतात आणि नाकालाच काय तुमच्या पोटालाही परत एकदा झिणझिण्या येतात त्या थांबतच नाहीत. पोटातली उलाढाल अजून वाढते.
हे घडलं नाही तर स्वत:ला एवढ्यात भाग्यवान समजू नका. तुमच्या शेजारी कोण येणारे ते अजून तुम्हाला कळलेलं नसतं. कोणीच येऊ नये अशी तुम्ही देवाची करूणा भाकत असता (एकदम 'हे आकाशातल्या बापा' इश्टायल...) आणि देव म्हणत असतो आत्ता आठवलो काय मी, घे अजून एक सुगंधी ठोकळा.. ('मला बुडवताना तुम्ही नाचता ना?' अस म्हणणार्या बाप्पा श्टायल...). तर एक सर्व बाजूनी सुटलेला बोजा किंवा बोजी तुमच्या शेजारी आदळतो/ते. बोजा असेल तर तो हमखास 'पनवा, पान मसालवा असं काहीतरी खायके' आलेला असतो. त्या जिन्तान किंवा तत्सम सुगंधी मसाल्याचा वासाचं वलय त्या बोजाभोवती असतं. त्यात त्याने हिरा पन्ना मधून घेतलेलं लेटेष्ट सेंट मारलेलं असतं. शेजारी बोजी आली तर तिने अंगावर टाल्कम पावडर ओतलेली असते शक्यतो गोडुस वासाची. आणि अंगावर कुठलं तरी 'गुलाबी' सेंट ही ओतलेलं असतं. ह्या सगळ्या सेंटसमधे एक काहीतरी द्रव्य असतं बहुतेक ज्याची माझ्या नाकाशी आणि मग पोटाशी कुंडली जुळत नाही. मग परत पोटात 'घुसळण प्रेमाची काढली'.
बर सेंटचा प्रादुर्भाव झाला असला तरी त्यातून एक छुपा वास येतच असतो. कसला काय विचारता!! अहो एवढं सेंट/ टाल्कम पावडर कशासाठी असते? सोप्पय, अहो त्या बोज्या/जीचे कपडे धुतलेले नसतात किंवा ८-१० दिवस केस धुतलेले नसतात. वाळलेल्या घामाचा कुसका कडू वास आणि बोजीच्या न धुतलेल्या केसांचा आंबुस वास हे या सगळ्या वरच्या वासांमधून आपलं अस्तित्व दाखवतातच.
एखाद्या दिवशी देव प्रसन्न झाला तर सुदैवाने तुमची शेजारची सीट रिकामी असते किंवा फार वास न येणारा/री शेजारी येतो/ते. पण तुम्ही देवाचे आभार मानत असताना देव खदाखदा हसत असतोच (मला बुडवताना तुम्ही नाचता ना!!)
गाडी सुरू होते. ४ तासात तुम्ही म्हातारे किंवा शिळे होऊ नये ही जबाबदारी बस कंपनीची असते त्यामुळे ते तुमच्यावर सतत गार हवेचे झोत सोडत असतात. गाडी जशी हलते तसे वासांचे संक्रमण होत असते. गाडीत कुणालातरी काल फक्त रात्रीच तासभर घातलेला गजरा आजही प्रवासात घालायची बुद्धी झालेली असते. गजरा आता सुकलेला असतो. तेवढ्यात कुणीतरी हात उंचावून आळस देते आणि नेमका त्यांनाच ह्या फ्रिजमधे बसून देखील घाम आलेला असतो.
हे सगळं परवडलं अस म्हणायची वेळ एकदा आली होती. भर एसी बसमधे मागच्या सीटवरच्या सदगृहस्थांना बिडी ओढायची सुरसुरी आली होती. "मला विडीच्या वासाने ढवळतंय. उलटी व्हायला लागली तर तुमच्या अंगावर ओकेन" अशी धमकी दिल्यावर तो थांबला.
तेवढ्यात "गाडी टॉयलेटके लिए २० मिनिट रूकेगी!" असं स्पष्ट शब्दात ओरडून सांगितलं जातं. गाडी थांबते. गाडीमधे काही घोळ होऊ नयेत, लोकांना वासांचे त्रास होऊ नयेत म्हणून केवढी काळजी घेतात हे लोक. कश्यासाठी उतरायचं हे नीट सांगतात. पण लोक ऐकतील तर ना. ते आपले मोकळं होतातच पण हादडूनही घेतात. परत गाडीत खायलाही घेऊन येतात. शेजारचा वास न येणारा कचकून सिगरेट ओढून आलेला असतो. आणि जळक्या बोळ्यासारखा घमघमत असतो.
२० मिनिटात सगळं उरकायचं म्हणून गपागपा खाल्लेलं असतं. वर ढेकर द्यायची राहून गेलेली असते. गाडी सुटते आणि ज्या बाजूने ढेकर येईल तिकडे वडापाव कि मिसळ कि चाट हे ओळखायचा खेळ खेळता येऊ शकतो. त्यात हातात बांधून आणलेल्या वस्तूंचे वासही गाडीभर भ्रमण करत असतातच. इतकं खाल्यानंतर ढेकर नाही तर अजून कशापद्धतीने तरी पवनमुक्ती होतेच.
सुदैवाने व्होल्वो घाट मात्र अजूनही सुसाट वेगाने पार करते त्यामुळे पोटात प्रेमाची घुसळण चालू असली तरी ती घाटाच्या वळणांमुळे वाढत नाही.
घाट संपल्यावर टोलच्या आसपास पुण्याकडे येताना कंपनीतली चिकन्स आणि मुंबईकडे जाताना कुठल्यातरी कारखान्याची मळी यांचा वास बाहेरूनही वसकन बसमधे घुसतो आणि आधीच गंधलेल्या हवेवर चार चांद चढवतो.
टोल संपला की थोड्या वेळाने गाडीचा वेग अतिच मंदावतो. गार हवेचे झोत सुरूच असतात. आता तुम्हाला फ्रिजमधल्या शिळ्या अन्नाला काय वाटत असेल तसं वाटायला लागतं. आंबल्यासारखं...
तुमच्या सहनशक्तीचा कडेलोट होत असतो तेव्हा गाडी सायनमधून धारावी मधे शिरत असते आणि आत येणारा कॅनॉलचा वास तुम्हाला आता तुम्ही मुंबई नामक उकीरड्यात आलात बरंका असं सांगू लागतो(मी आता मुंबईकर असल्याने मुंबईला नावं ठेवणे हा माझा अधिकार आहे).
ह्या सगळ्यातून न ओकता ( कधी खरंच झालं ओकायला तर काय होईल?) आणि सर्दीने भरलेली मी (thanks to फ्रिजमधली गार हवा!)पार्ल्यात उतरते. घरी पोचल्यावर मात्र मला मी टाकलेल्या खिचडीच्या फोडणीचा वास येणंही शक्य नसतं.
- नी
मस्त.. माझ्या आईला एका
मस्त..
माझ्या आईला एका अपघातानंतर वासच येत नाही.
व्होल्वोच्या बाबतीत सुदैवी
व्होल्वोच्या बाबतीत सुदैवी म्हणता येईल पण वासच न येणं हे एकुणात दुर्दैवीच!
तुमच्या आईंना लवकरात लवकर सगळे वास यायला लागोत!
वोल्वो बसेस चा प्रवास आणि
वोल्वो बसेस चा प्रवास आणि सुगंधाचे भयानक नाते असते. यालाच 'भीषॉन शुंदॉर' म्हणत असावेत.>>>>>
इथे आपल्या पोटातील उंदीर ते औषध पिण्यासाठी आतुर झाल्यासारखे उड्या मारू लागतात आणि पोटात सगळं काही आतल्याआत ढवळायला सुरूवात होते.>>>>>>
तर एक सर्व बाजूनी सुटलेला बोजा किंवा बोजी तुमच्या शेजारी आदळतो/ते. बोजा असेल तर तो हमखास 'पनवा, पान मसालवा असं काहीतरी खायके' आलेला असतो. त्या जिन्तान किंवा तत्सम सुगंधी मसाल्याचा वासाचं वलय त्या बोजाभोवती असतं.>>>>>>
शेजारचा वास न येणारा कचकून सिगरेट ओढून आलेला असतो. आणि जळक्या बोळ्यासारखा घमघमत असतो.>>>>
"मला विडीच्या वासाने ढवळतंय. उलटी व्हायला लागली तर तुमच्या अंगावर ओकेन" अशी धमकी दिल्यावर तो थांबला.>>>>
इतकं खाल्यानंतर ढेकर नाही तर अजून कशापद्धतीने तरी पवनमुक्ती होतेच.>>>>>>>
वरील वाक्यातून पंचेस चांगले खुलवले आहेत.
एकूण काय असं पोटातून आलेलं लेखन सुसाट असतं. व्होल्वोसारखं...
आवडलं लेखन.
आता तुम्हाला फ्रिजमधल्या
आता तुम्हाला फ्रिजमधल्या शिळ्या अन्नाला काय वाटत असेल तसं वाटायला लागतं. आंबल्यासारखं... >>>>> अगदी अगदी.
हे वर्णन झाले पुणे-मुंबई ४ तासाचे. विचार करा हैदराबाद, बंगलोर वगैरे १०-१२ तासात त्या शिळ्या अन्नाची काय अवस्था होत असेल.
पुणे-ते-संगमनेर वोल्व्हो
पुणे-ते-संगमनेर वोल्व्हो नाहीये पण एस.टी. मधे हे सगळे गंधपुराण प्रकर्षाने जाणवते. चंदनपुरी घाटातून एसटी जात असते तेव्हा तर या गंधमिसळीचा खवचट खमंग येतोच पण ढवळून ढवळून उतूही जातो.
काही गोष्टी खटकल्या त्या आवर्जून सांगाव्याश्या वाटतात. वोल्व्हो मधेच काय पण राज्यशासनाच्या प्रत्येक वाहनसेवेमधे धुम्रपानास बंदी आहे ना. वोल्व्हो मधे तर काटेकोरपणे हे पाळलं जात असावं. वातानुकुलित बसेस असतात ना त्या?
बोजा/बोजी, पवनमुक्ती आणि ढेकरसंदर्भ आवडले.
लेख छान लिहिलाय.
वेगवान लेखन झाले आहे. या
वेगवान लेखन झाले आहे. या व्होल्व्होंच्या खिडक्या उघडण्याची परवानगी असायला हवी होती असे वाटण्याइतपत कडवटपणा तक्रारीमध्ये जाणवणे हाच या लेखनाचा प्रभाव! सर्व मुद्दे पटले.
-'बेफिकीर'!
लिखाणाबद्दल .. एकाच बैठकीत
लिखाणाबद्दल ..
एकाच बैठकीत लिहून काढलेलं बेफाट लिखाण वाटतंय.. छान खुललंय आणि खिळवलंय देखील
वोल्व्हो मधे तर काटेकोरपणे हे
वोल्व्हो मधे तर काटेकोरपणे हे पाळलं जात असावं. वातानुकुलित बसेस असतात ना त्या?<<<
हो असते पण हे ज्याला माहित नसतं त्याने एकदा विडी शिलगावली होती.
शक्यतो नाही घडत असले प्रकार पण नेमका मी असताना घडला. त्याचं आणि माझं दुर्दैव दुसरं काय!
भारीच शब्दांत मांडलयस नी!! लई
भारीच शब्दांत मांडलयस नी!! लई भारी पंचेस वाक्यागणिक!
तरीच... एस्टीतले मेंढरं कोंबल्यागत वाटतात तर वॉल्वोतले निर्विकार, गिनिपिगसारखे दिसतात.
मस्त
मस्त लिहिलेय........
वोल्व्होचे आणि माझे अतूट नातेच आहे हे वर लिहिलेले बरेचसे "गंधयुक्त अनुभव" बर्याचदा मुंबई पुणे, मुंबई नाशिक या रस्त्यावर जास्त येतात. मुंबई बँगलोर, मुंबई हैदराबाद, हैदराबाद बँगलोर, बँगलोर त्रिवेंद्रम, मुंबई गोवा या प्रवासात मात्र हे प्रकार कमी अनुभवायला मिळतात. एकंदर सुखद अनुभव असतो तो. खर्डेघाशीच्या उमेदीच्या वर्षात कंपनी विमानाने पाठवत नव्हती तोपर्यंत मी हे सगळे प्रवास फक्त व्होल्वोने करायचो (रेल्वेचा पहिल्यापासून कंटाळा, कोकणी माणूस... आयुष्यभर लाल डब्याने बाय रोड प्रवास केलेला). मजा यायची. ठराविक चित्रपटांची पारायणं झाली होती त्या काळात. शिवाय क्लिनरही ओळखीचे झालेले. कुठला पिक्चर हवा ते दादागिरी करून लावता यायचा. कधी कधी स्वतःच नवी सीडी बरोबर नेऊन आज हा पिक्चर लाव अशी धमकीवजा विनंती करायचो. साऊथचे पण काही चित्रपट पाहिले, भाषा कळत नव्हती पण काही कथा खूप छान होत्या.
नी, तुमचे जुने लिखाण असेच उकरून काढत रहा..... वाचायला आवडेल.
व्होल्वो आणि चित्रपट हे एक
व्होल्वो आणि चित्रपट हे एक वेगळेच प्रकरण आहे. मी रेग्युलर पु-मु करायचे व्होल्वोने त्या काळात एक और एक ग्यारह, आमदनी अठन्नी खर्चा रूपैया असे उत्कृष्ट चित्रपट सारखेच लागायचे व्होल्वोमधे. पाठ होते हे चित्रपट.
नीधप, आणखी दोन सुगंधाची ओळख
नीधप, आणखी दोन सुगंधाची ओळख करून देतो.
गोव्याहुन मुंबईला येताना, म्हापश्याला काय ती पाच दहा मिनिटे गाडी थांबते तेवढ्यात लोक, तिथे मस्तपैकी फिश फ्राय खाऊन / घेऊन येतात. सोबत मल्ल्या पेय असतेच.
महाराष्ट्रात दारू गाळायची परवानगी नाही, पण पेडण्याला ती आहे. मग आंबोली बेळगाव मधली काजीचे बोंडे घेऊन एखादा ट्रक आपल्यापुढे चाललेला असतो आणि पेडण्याला प्रातःकाळी भट्ट्या लागलेल्या असतात. (डायवर साहेबांच्या बाजूची खिडकी उघडी असते, त्यामूळे असे गंध आत येणेस अटकाव नसतो.)
कोकण, उन्हाळा, प्रवास आणि वास
कोकण, उन्हाळा, प्रवास आणि वास हे स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण प्रकरण आहे दिनेश...
बाकी फिश फ्राय + कंचीबी दारू + सिगरेट याचा एकत्रित परिणाम सेवन करणार्यावर कितीही ग्रेट होत असला तरी इतरांच्या नाकासाठी भीषण असतो.
हो ना, फणस, सुके बांगडे, ताजी
हो ना, फणस, सुके बांगडे, ताजी कोकमे, शेव चिवडा, आंबे, केरसुण्या, डिझेल, अननस.... आणि वकार युनुस..
मला वकार युनूस व्हायला सुकट
मला वकार युनूस व्हायला सुकट हा शब्दही पुरेसा आहे.
अर्र भारी आहेत निरिक्षणं
अर्र भारी आहेत निरिक्षणं
अजून एक बसमधला भयानक वास म्हणजे कुठलीतरी अतिगोड आणि पंजंट वासाची उदबत्ती. एकदा मी बसवाल्याला म्हटले की प्लीज उदबत्ती लाऊ नका, मला त्याने मळमळते. तो असला भडकला. म्हणे तुम्हाला जमत नसेल तर उतरा पण अगरबत्ती लावल्याशिवाय आमी गाडी काढत नाय
याच कारणानी मी पण वोल्वोला भयंकर घाबरते. त्यापेक्षा उघड्या खिडकीची कुठलीही बस परवडते.
आता दरवेळी हैदराबादला
आता दरवेळी हैदराबादला वोल्वोने जाताना हा लेख आठवणार हे नक्की.
वॉल्वो नाही माहीत पण
वॉल्वो नाही माहीत पण दिवा-पनवेल गाडीने प्रवास करतांना त्या मधेच चढणा-या आगरी
मत्स्यसुंदर्यांच्या अंगाचा माशांचा वास +घामाचा वास+ रेल्वेचा वास= अरारारा..!
वाचला होता हा आधीच. आताही
वाचला होता हा आधीच. आताही वाचताना ढवळून आलं. (वाचून मजा आली, असं तरी कसं म्हणावं? )
आणि तो एस्टीस्टँडाचा सिग्नेचर वास- मग ते मुंबई सेंट्रल असो नाहीतर येवलेवाडी- अख्ख्या महाराष्ट्रात अगदी त्या वासाचं पेटंट घेतलेलं असल्यागत सारखाच आणि एकच येतो. त्या वासाचे सत्रा लक्ष घटकवास, आणि कारणे-परिणाम हा एक सेप्रेटच विषय.
त्या वासाचे सत्रा लक्ष
त्या वासाचे सत्रा लक्ष घटकवास, आणि कारणे-परिणाम हा एक सेप्रेटच विषय.<<<
प्रकाश संत + श्याम मनोहर असं डेडली कॉम्बो करत बोलताय हल्ली!!
हार्बर लाईनची स्टेशने
हार्बर लाईनची स्टेशने वासावरुन ओळखता येतात
ताजे मासे - डॉकयार्ड रोड
सुके मासे - शिवडी
कुजलेले शेंगदाणे - रे रोड
कापसाच्या गाठड्या - कॉटन ग्रीन
हिंग वगैरे - मस्जिद
एक खास केमिकल - कुर्ला
(पूर्वी) हातभट्ट्या - चुनाभट्टी
कूजलेले दूध - टिळक नगर
खाडीचा वास - माहीम
खारा वास - मानखुर्द
जी टी बी नगर, गोवंडी यांचे पण खास गंध आहेत, पण ते शब्दात वर्णन करता येण्यासारखे नाहीत.
हे अनुभव बर्याच वर्षांपुर्वीचे आहेत, आता वास बदलले असतील !!
खुप दिवसात व्हॉल्वोने प्रवास
खुप दिवसात व्हॉल्वोने प्रवास केला नाही, पण वाचुनही आताच प्रवासातुन परत आल्यासारखं वाटलं. सगळं अनुभवल्यासारखं ढवळणारं फिलिंग आलं. लेख मस्तच लिहिला आहे, पण......
(वाचून मजा आली, असं तरी कसं म्हणावं? )>>>> अगदी अगदी.
मी वेस्टर्न ला राहते याचं
मी वेस्टर्न ला राहते याचं केवढं बरं वाटलंय काय सांगू दिनेश तुमची पोस्ट वाचून!!
आम्ही फक्त बांद्रा-माहिम एवढ्याच वासाला सामोरे जातो. हा संध्याकाळी ५ च्या सुमारास पार्ले क्रॉस करत असाल तर खरपूस भाजल्या जाणार्या ग्लुकोज बिस्किटांचा खमंग वास नक्की येतो.
मस्त लिहिलाय.
मस्त लिहिलाय.
वाचताना ते गंधही जाणवले....
वाचताना ते गंधही जाणवले.... छान ओघवता मांडला आहेस अनुभव, नी! मुंबई-पुणे व पुणे-मुंबई व्होल्वो प्रवास तर माझ्या पाचवीलाच पुजला आहे.... त्यामुळे लेखातल्या प्रत्येक अनुभवाशी रिलेट होऊ शकले. गोठवणार्या एसी बद्दल तर बोलायलाच नको... त्यावरच एक ललित पाडून होईल.
विक्रोळीला, एव्हरेस्ट
विक्रोळीला, एव्हरेस्ट मसाल्यांचा वास!!!
भीषॉन शुंदॉर' !!!
भीषॉन शुंदॉर' !!!
मस्त ग!!
मस्त ग!!
गेली ४० वर्षे सांगली - पुणे
गेली ४० वर्षे सांगली - पुणे (लाल डबा -हल्ली राजेंद्र,नाकोडा),पुणे-नाशिक, पुणे - मुंबई,पुणे बेंगलोर असे कितीतरी प्रवास वेगवेगळ्या वहानातून केलेत.एकदा तर पुणे - बेंगलोर फ्लाइट ने डायबेटीक गँगरीन झालेल्या इंजिनीयर ला नेण्याची जबाबदारी माझ्यावर कंपनीने माझ्यावर सोपवली होती. फ्लाईट मधील तमाम पब्लिक माझ्याकडे दाउद असल्या सारखे पहात होते. का.........य सुवास पसरला होता फ्लाईट भर. शेवटी ते बोचके टाकले आणि खळाळून उलट्या केल्या आणि फिनाईल पिउन झोपावेसे वाटले त्या रात्री.
मस्त. गंधपुराण आवडले. मी
मस्त. गंधपुराण आवडले.
मी बरेचदा फार गरम होत नसेल तर साधी (म्हणजे नॉन येशी) गाडी घेतो. वार्यामुळे वासाचा फारसा त्रास होत नाही. आणि मुंबई आली हे खार्या हवेमुळे कधी कळते हे बघायला मजा येते.
Pages