गंध कुणाचा
माझं जुनं लिखाण परत एकदा माबोवर चढवतेय.
-------------------------------------------------------------------
वोल्वो बसेस चा प्रवास आणि सुगंधाचे भयानक नाते असते. यालाच 'भीषॉन शुंदॉर' म्हणत असावेत.
नीता, मेट्रोलिंक, खुराणा, फलाणा, धमकाना... अशी या बसेस ची नावे असतात. गाडी पुण्याहून मुंबईस वा मुंबईहून पुण्यास नेतात. शेवटच्या स्टॉपवर शेवटचा माणूस उतरत असतानाच परतीचा पहिला माणूस आत चढून बसतो आणि मग पुढच्या ६ ते ७ तासांसाठी तो त्या 'भीषॉन शुंदॉर' ला सामोरा जातो. गाडीतली हवा तशीच आतल्याआत फिरत रहाते, कधीच बाहेर पडत नाही. मग त्यावर उपाय म्हणून किन्नर (आ एड्या!! किन्नर काय बोलतो.. आपन काय टरकवाले हे का? वोल्वो हे वोल्वो.. अशिश्टन म्हनायचं काय...) जो असतो तो एक शस्त्र काढतो आणि त्यातून एक फवारा मारून उंदीर मारण्याचं अति गोडमिट्ट औषश कसं असेल तसा वास गाडीभर पसरवतो. इथे आपल्या पोटातील उंदीर ते औषध पिण्यासाठी आतुर झाल्यासारखे उड्या मारू लागतात आणि पोटात सगळं काही आतल्याआत ढवळायला सुरूवात होते.
तुम्ही कुठल्याही सीटवर असलात तरी या सुगंधी कट्ट्यापासून तुमची सुटका नाही. पुढची सीट मिळाली. ऐसपैस जागा (ही व्होल्वो च्या बाहेरच असते. आत कोणे एके काळी असायची!!) मिळाली असं समजून तुम्ही सुखावताय तोच तुमच्या पुढच्या सीटवर म्हणजे ड्रायव्हरच्या जागी चालक(मराठीचा विजय असो!!) स्थानापन्न होतो. आणि त्याच्या डोक्यातल्या चमेलीच्या तेलाबरोबर त्याच्या डोक्यातला घाम मिसळून तयार झालेल्या रसायनाच्या भयाण लहरी तुमच्या नाकात शिरतात आणि नाकालाच काय तुमच्या पोटालाही परत एकदा झिणझिण्या येतात त्या थांबतच नाहीत. पोटातली उलाढाल अजून वाढते.
हे घडलं नाही तर स्वत:ला एवढ्यात भाग्यवान समजू नका. तुमच्या शेजारी कोण येणारे ते अजून तुम्हाला कळलेलं नसतं. कोणीच येऊ नये अशी तुम्ही देवाची करूणा भाकत असता (एकदम 'हे आकाशातल्या बापा' इश्टायल...) आणि देव म्हणत असतो आत्ता आठवलो काय मी, घे अजून एक सुगंधी ठोकळा.. ('मला बुडवताना तुम्ही नाचता ना?' अस म्हणणार्या बाप्पा श्टायल...). तर एक सर्व बाजूनी सुटलेला बोजा किंवा बोजी तुमच्या शेजारी आदळतो/ते. बोजा असेल तर तो हमखास 'पनवा, पान मसालवा असं काहीतरी खायके' आलेला असतो. त्या जिन्तान किंवा तत्सम सुगंधी मसाल्याचा वासाचं वलय त्या बोजाभोवती असतं. त्यात त्याने हिरा पन्ना मधून घेतलेलं लेटेष्ट सेंट मारलेलं असतं. शेजारी बोजी आली तर तिने अंगावर टाल्कम पावडर ओतलेली असते शक्यतो गोडुस वासाची. आणि अंगावर कुठलं तरी 'गुलाबी' सेंट ही ओतलेलं असतं. ह्या सगळ्या सेंटसमधे एक काहीतरी द्रव्य असतं बहुतेक ज्याची माझ्या नाकाशी आणि मग पोटाशी कुंडली जुळत नाही. मग परत पोटात 'घुसळण प्रेमाची काढली'.
बर सेंटचा प्रादुर्भाव झाला असला तरी त्यातून एक छुपा वास येतच असतो. कसला काय विचारता!! अहो एवढं सेंट/ टाल्कम पावडर कशासाठी असते? सोप्पय, अहो त्या बोज्या/जीचे कपडे धुतलेले नसतात किंवा ८-१० दिवस केस धुतलेले नसतात. वाळलेल्या घामाचा कुसका कडू वास आणि बोजीच्या न धुतलेल्या केसांचा आंबुस वास हे या सगळ्या वरच्या वासांमधून आपलं अस्तित्व दाखवतातच.
एखाद्या दिवशी देव प्रसन्न झाला तर सुदैवाने तुमची शेजारची सीट रिकामी असते किंवा फार वास न येणारा/री शेजारी येतो/ते. पण तुम्ही देवाचे आभार मानत असताना देव खदाखदा हसत असतोच (मला बुडवताना तुम्ही नाचता ना!!)
गाडी सुरू होते. ४ तासात तुम्ही म्हातारे किंवा शिळे होऊ नये ही जबाबदारी बस कंपनीची असते त्यामुळे ते तुमच्यावर सतत गार हवेचे झोत सोडत असतात. गाडी जशी हलते तसे वासांचे संक्रमण होत असते. गाडीत कुणालातरी काल फक्त रात्रीच तासभर घातलेला गजरा आजही प्रवासात घालायची बुद्धी झालेली असते. गजरा आता सुकलेला असतो. तेवढ्यात कुणीतरी हात उंचावून आळस देते आणि नेमका त्यांनाच ह्या फ्रिजमधे बसून देखील घाम आलेला असतो.
हे सगळं परवडलं अस म्हणायची वेळ एकदा आली होती. भर एसी बसमधे मागच्या सीटवरच्या सदगृहस्थांना बिडी ओढायची सुरसुरी आली होती. "मला विडीच्या वासाने ढवळतंय. उलटी व्हायला लागली तर तुमच्या अंगावर ओकेन" अशी धमकी दिल्यावर तो थांबला.
तेवढ्यात "गाडी टॉयलेटके लिए २० मिनिट रूकेगी!" असं स्पष्ट शब्दात ओरडून सांगितलं जातं. गाडी थांबते. गाडीमधे काही घोळ होऊ नयेत, लोकांना वासांचे त्रास होऊ नयेत म्हणून केवढी काळजी घेतात हे लोक. कश्यासाठी उतरायचं हे नीट सांगतात. पण लोक ऐकतील तर ना. ते आपले मोकळं होतातच पण हादडूनही घेतात. परत गाडीत खायलाही घेऊन येतात. शेजारचा वास न येणारा कचकून सिगरेट ओढून आलेला असतो. आणि जळक्या बोळ्यासारखा घमघमत असतो.
२० मिनिटात सगळं उरकायचं म्हणून गपागपा खाल्लेलं असतं. वर ढेकर द्यायची राहून गेलेली असते. गाडी सुटते आणि ज्या बाजूने ढेकर येईल तिकडे वडापाव कि मिसळ कि चाट हे ओळखायचा खेळ खेळता येऊ शकतो. त्यात हातात बांधून आणलेल्या वस्तूंचे वासही गाडीभर भ्रमण करत असतातच. इतकं खाल्यानंतर ढेकर नाही तर अजून कशापद्धतीने तरी पवनमुक्ती होतेच.
सुदैवाने व्होल्वो घाट मात्र अजूनही सुसाट वेगाने पार करते त्यामुळे पोटात प्रेमाची घुसळण चालू असली तरी ती घाटाच्या वळणांमुळे वाढत नाही.
घाट संपल्यावर टोलच्या आसपास पुण्याकडे येताना कंपनीतली चिकन्स आणि मुंबईकडे जाताना कुठल्यातरी कारखान्याची मळी यांचा वास बाहेरूनही वसकन बसमधे घुसतो आणि आधीच गंधलेल्या हवेवर चार चांद चढवतो.
टोल संपला की थोड्या वेळाने गाडीचा वेग अतिच मंदावतो. गार हवेचे झोत सुरूच असतात. आता तुम्हाला फ्रिजमधल्या शिळ्या अन्नाला काय वाटत असेल तसं वाटायला लागतं. आंबल्यासारखं...
तुमच्या सहनशक्तीचा कडेलोट होत असतो तेव्हा गाडी सायनमधून धारावी मधे शिरत असते आणि आत येणारा कॅनॉलचा वास तुम्हाला आता तुम्ही मुंबई नामक उकीरड्यात आलात बरंका असं सांगू लागतो(मी आता मुंबईकर असल्याने मुंबईला नावं ठेवणे हा माझा अधिकार आहे).
ह्या सगळ्यातून न ओकता ( कधी खरंच झालं ओकायला तर काय होईल?) आणि सर्दीने भरलेली मी (thanks to फ्रिजमधली गार हवा!)पार्ल्यात उतरते. घरी पोचल्यावर मात्र मला मी टाकलेल्या खिचडीच्या फोडणीचा वास येणंही शक्य नसतं.
- नी
<<<अहो त्या बोज्या/जीचे कपडे
<<<अहो त्या बोज्या/जीचे कपडे धुतलेले नसतात किंवा ८-१० दिवस केस धुतलेले नसतात. वाळलेल्या घामाचा कुसका कडू वास आणि बोजीच्या न धुतलेल्या केसांचा आंबुस वास हे या सगळ्या वरच्या वासांमधून आपलं अस्तित्व दाखवतातच.>>>>
काय मुर्खपणा आहे हा , मिळालय खुल व्यासपीठ तर काहीपण फेकता काय ?
आता तुम्ही मुंबई नामक उकीरड्यात आलात बरंका असं सांगू लागतो(मी आता मुंबईकर असल्याने मुंबईला नावं ठेवणे हा माझा अधिकार आहे). >>> तरीच असा फालतु लेख लिहिलाय.
मस्त लिहिलं आहे..वाचतानाच
मस्त लिहिलं आहे..वाचतानाच वोल्वो चा फील येऊन ढवळल्यासारखं झालं..
हाच तुझा प्रॉब्लेम आहे नी,
हाच तुझा प्रॉब्लेम आहे नी, अस्ले आणि तस्ले वास घेत बसतेस, मग प्रवास करताना येणारे तरल, विव्हल, नाजूक आणि काय काय अनुभव तुला येणार तरी कसे
हो रे आगावा.. आम्ही करंटेच!
हो रे आगावा.. आम्ही करंटेच!
नेमकं वर्णन गं, नी. अशामुळेच
नेमकं वर्णन गं, नी. अशामुळेच नाकाला 'घ्राणेंद्रिय' म्हणत असणार. (बदल तर केलाय पण त्यामुळे जोक डायल्युट झालाय. जाउ द्या. भावनाओंको समझो.)
लोकलनं दारात लटकून चिक्कार प्रवास केलाय. सेंट्रल रेल्वेलाईनवरचे सगळे वास ओळखीचे आहेत. व्हिटीच्या जरा आधी एक हिंगाचा वास यायचा ... आता माहित नाही.
आगावा ....
आगावा ....
मामी.... घाणेंद्रिय नाही
मामी.... घाणेंद्रिय नाही हो... घ्राणेंद्रिय.:)
घाणेंद्रिय नाही हो...
घाणेंद्रिय नाही हो... घ्राणेंद्रिय>>>
कैलासराव, घाणेंद्रिय त्यांनी मुद्दाम लिहीलेले असावे.
हे हे हे ... हो की. धन्स हं
हे हे हे ... हो की. धन्स हं डॉक. तुम्ही डॉक्टरकी करत असताना हा विषय ऑप्शनला नव्हता टाकला तर! (बदल करते.)
नाही बेफिकीर, हा शब्द जास्त
नाही बेफिकीर, हा शब्द जास्त कधी वापरला नसल्याने ते झाले. बोजड मराठी शब्दात टाकते आता.
बोजड मराठी शब्दात टाकते
बोजड मराठी शब्दात टाकते आता.>>
थॅन्क्स मामी!
(अवांतर - या निमित्ताने लिहितो की इतरत्र झालेल्या चर्चेत माझ्याकडून काही आगळीक झाली असल्यास क्षमस्व! लोभ असू द्यावात! नीधप, आपल्या या धाग्यावर हा विषय काढल्याबद्दल दिलगीर!)
-'बेफिकीर'!
मळमळतंय.. गलबलतंय... तरी
मळमळतंय.. गलबलतंय...
तरी वोल्वो मुळे सुटलीस! प्येम्टीचा तो ढराकखर्डटढुस्स करताना येणारा खरखरीत काळा वास! त्या इंजिनाच्या शेजारी बसलेला चालक कान (अखंड घरघर),नाक(उपरिनिर्दिष्ट फवारा), डोळे(त्या अजस्त्र रथाबाजूला असणारी बाहेरची यःकश्चित वाहने, माणसे), जीभ(मौनव्रताचे कारण त्यांनाच माहीत) ,त्वचा(उकाडा+घाम)अशा पंचज्ञानेद्रिंयाना जिंकून घेतलेला - जितेंद्र महान योगी वाटतो मला.
अगदी अगदी आशू...
अगदी अगदी आशू...
वा वा आशूडी, क्या फिलॉसॉफी
वा वा आशूडी, क्या फिलॉसॉफी है! मस्तच.
अरारा, काय काय ऑब्झर्व करतेस
अरारा, काय काय ऑब्झर्व करतेस गं तु..
पण खरंच, मुंबईत दिनेशदानी म्हटल्यानुसार काही काही स्टेशन्स येतात वासावरुन ओळखता. सीएसटीला उतरल्यावर माशांचा वास, सीएसटीच्या आधी हिंगाचा वास, विक्रोळी-कांजुरदरम्यान मसाल्याचा वास, ठाणा-ऐरोलीदरम्यान एक विचीत्र वास.
चिट्टी, ठाणा ऐरोलीदरम्यान
चिट्टी, ठाणा ऐरोलीदरम्यान लंडन पिल्सनर पण लागते ना ? त्याचाही वास पुर्वी यायचा !
ह्म्म्म नाही दिनेशदा,ठाणा
ह्म्म्म नाही दिनेशदा,ठाणा सीबीडी दरम्यान नेरुळ फाट्यावर एल.पी.कंपनी ला लंडन पिल्स्नरचा वास येतो.पूर्वी येथेच क्रॉम्फ रबर फॅक्टरी होती,तीचा रबर युक्त उग्र वास यायचा.
लंडन पिल्सनर पण लागते
लंडन पिल्सनर पण लागते ना
>>
माहीत नाही दिनेशदा, पण ट्रेनने जाताना एक उग्र वास येतो तिथे जसा कुर्ला-सायन दरम्यान येतो तसा.
आधी नव्हत वाचला हा लेख नीधप
आधी नव्हत वाचला हा लेख
नीधप निरिक्षण योग्य, आणि ते शब्दातही चांगले उतरवले आहेस,
प्रवासात पिंपरी ला मळी चा असाच भयानक वास यायचा
जबरी लेख मी तर मुंबई-अहमदनगर
जबरी लेख
मी तर मुंबई-अहमदनगर एव्हडा मोठा प्रवास करायचे कॉलेजात असताना
हे गंधीत वारे .......!
हे गंधीत वारे .......! आवड्या
एय, मी हा पहिले सुद्धा वाचला
एय, मी हा पहिले सुद्धा वाचला होता. तेव्हा जी प्रतिक्रिया झाली तीच आत्ताही-मळमळण्याची.
रच्याकने, व्हॉल्व्हो परवडली म्हणावं इतकं त्या पी एम टीच्या खिडक्यांच्या काळे पडलेल्या शिळ्या, गंजक्या वासाच्या धातूच्या बार्सने मला सर्वात जास्त मळमळतं.
ई ई ई मलाही मळमळ्तय
ई ई ई मलाही मळमळ्तय
हऽऽम! आता प्रतिक्रिया देणे
हऽऽम!
आता प्रतिक्रिया देणे म्हणजे लेलँड ट्रकने व्होल्वो शी शर्यत लावण्यासारखे आहे.तुम्ही व्हा पुढे,घाट लागलाय गियर बदलतो.
शब्दन शब्द दिसला, जाणवला,
शब्दन शब्द दिसला, जाणवला, पटला. ई, खरंच त्यापेक्षा लाल डबा बरा. निदान गाडी सुरु झाली की हवा तरी येते.
आँ.. तब्बल दीड वर्षांनी खणून
आँ.. तब्बल दीड वर्षांनी खणून काढलंत लिखाण...
Pages