निसर्ग कविता

आभाळ पक्षी

Submitted by पाषाणभेद on 25 May, 2019 - 02:37

आभाळानं द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

धरतीनं जागा द्यावी
झाडांची आई व्हावी

झाडांनी सावली द्यावी
पक्षांची घरटी ल्यावी

पक्षांनी पंख पसरावे
आभाळात विहरावे

आभाळाने द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम)
२५/०५/२०१९

सांगावा

Submitted by पुरंदरे शशांक on 31 May, 2016 - 06:02

सांगावा

आले सांगावा घेऊन
ढग गहिरे जरासे
येई पाऊस मागून
सोड मनाचे निराशे

येतो हवेत गारवा
वारा वाभरा दुवाड
किलकिले करुनिया
ठेव मनाचे कवाड

नवलाची येई खास
मत्त वळवाची माया
घेई ऊरात भरून
भुई-अत्तराचा फाया

पखरण थेंबुट्यांची
होत राही अविरत
सल कोरडे विरु दे
ओल राख अंतरात ....

लय जोरात पिकल्यात आंबं

Submitted by जव्हेरगंज on 19 May, 2016 - 02:26

लय जोरात पिकल्यात आंबं
मी चाखुन बघतोय थांबं
या पावसाच्या रानात
सखे तु होशील चिंब

या केळीचा उनाड बांबू
पपईला देतोय टेकू
या पपईचा मधाळ रस
सखे तु दे मला चाखू

हा डाळींबाचा दाणा
लालभडक आणि छान
पाहुन या डोळ्यांनी
झालोय मी बेभान

या राना शिवारात
लय जोपासल्याती झाडं
या कसलेल्या बाहुंनी
त्यांचा केलाय लाडं

ही झाडं फुलं पानं
ही हवाही झालीय धुंद
या हिरव्या झाडखाली
सखे तु होशील चिंब

शब्दखुणा: 

निसर्ग सारा गातो गाणे...

Submitted by पुरंदरे शशांक on 8 September, 2015 - 12:17

निसर्ग सारा गातो गाणे...

रंग चोरुनी आभाळाचे
सजली वेडी रानफुले
मृद्गंधाच्या अत्तरातुनी
गंधित झाले रान खुळे

सरसर येता थेंब टपोरे
पाते हिरवे घेत झुले
लाटा उठती आनंदाच्या
सळसळीतुनी ऊन खुले

कंठी येती गाणी कुठली
पाखरांसही भूल पडे
निसर्ग सारा गातो गाणे
रोमांचित हे मन झाले....

जीवन

Submitted by पुरंदरे शशांक on 28 July, 2014 - 23:14

जीवन

ओसाड रान हे खुपते रुपते आत
भणभणतो वारा उगाच वेडा त्यात

नि:सार वाटते शुष्क शुष्क गवतात
तुटलेले जीवन व्यर्थ खुणावित जात

येताच सरी त्या माळ होत सुस्नात
सळसळते जीवन एकजीवसे संथ

ही रानफुले इवलीशी गिरक्या घेत
वार्‍यावरी गाणे गाती मस्त मजेत

हा निसर्ग वेडा खुळावितो जीवास
जगण्याचे देतो कारण खासेखास

दुष्काळ कविता

Submitted by रोहितगद्रे१ on 12 March, 2013 - 08:17

महाराष्ट्रातील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील दुष्काळी परिस्थितीवर मी लिहिले आहे.....
-----------------------------------------------------------------------------------------------------
तप्त झळा...बोचऱ्या कळा....कोरडा गळा
हलत लांब पळताहे थांबवा त्या मृगजळा
शेतात पिक ते झाले की सापळा
गर्द हिरव्या निवडुंगाचे काटे करती वाकुल्या
अवचित कधी झाकोळून जाई लागे वेडी आशा
परी वाहून नेई घन ते सारे पवन दुसऱ्या देशा
कडाड कड घनघोर घन
शीतल सुंदर आता वन
थेंब भिजविती कणा मृदेच्या
वाफा उठती निश्वासाच्या
झिरपते भेगा - भेगातून पाणी
क्षणात होई पुन्हा एकसंध धरणी

लपंडाव

Submitted by pradyumnasantu on 10 June, 2012 - 22:15

तो चांद पहा आकाशी अहा सुकुमार कुणी घरी घुसला
रातीस आली मदहोशी ज्वर जणू प्रितीचा मुसमुसला
चांदणी खडी अंगणी चमक नथ्थनी दागिना हसला
रातीच्या बसत छातीशी बात प्रितीची करुन तो फसला
वाटले, मनी दाटले प्रेम रातीला बरा सापडला
घेतले बाहुपाशात अडकला त्यात चंद्र अवघडला
जो लपंडाव खेळत निशा लोळत पलंगावर पडली
थोडासा झाला वेळ संपला खेळ उषा अवतरली
पाहून प्रणय जोडीचा उषा-सूर्याचा, निशा बावरली
चंद्रास मिठीत घेण्यास पुन्हा धरण्यास निघुन ती गेली
करुनिया 'शुभ्र' चेहरा हलवी मोहरा रात्र जी तिथुनी
रात्रीची धाकटी भगिनी ती ’संध्या’ तरुणी म्हणाली हसुनी
"सूर्याची फजिती करते जगा हासवते पहा तू ताई"

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गारगर्भार

Submitted by pradyumnasantu on 26 February, 2012 - 16:47

वैशाखाचा निष्ठुर वणवा
वसुंधरेला जाळत होता
जिवा-जिवाला छळताछळता
आकाशाला पोळत होता
*
गर्भप्रफुल्लित मेघसुंदरी
वरुणभेटिला उत्सुक झाली
गदगदुनी मग प्रियकराला
प्रीत-हळी ती देऊ लागली
*
’मेघा’ची ती हाक ऐकुनी
वरूणराजा प्रसन्न झाले
वा-यावरुनी भेटिस जाऊन
सावळ्या प्रिये कवे घेतले
*
मेघप्रिया ती नववा महिना
आवेगाचा भार सहेना
लाजत लाजत वरुणा म्हणते
किति आवळता जरा हळू ना
*
समयी त्याच त्या प्रभाकराने
धाडली पृथ्वीवरती किरणे
मेघाला ती धडकुनी गेली
अविचारी बेदरकारीने
*
प्रसुती वेणा सुरू जाहल्या
किरणांच्या धडकाधडकीने
पाठलाग मग वरूण करतो
वेगाने आणि संतापाने
*
किरणे ती मग भिऊन गेली

गुलमोहर: 

सखा

Submitted by गिरिश देशमुख on 18 December, 2010 - 13:51

Water_spring_350.jpg

वसंतातल्या भल्या पहाटे
साखरझोपेतून मजला
फुलपाखरांनी जागवावे
सुखद थंडसे पहाटवारे
सर्वांगाला स्पर्शुन जावे...

फुलांच्या धुंद मंद गंधाने
गायचे मी विसरलो असे
कोकिळाने गार्‍हाणे गावे
लटक्या रागात मग त्याने
डहाळीवर झुलत रहावे..

शेवाळल्या क्षीण प्रवाहाने
चाहुल माझी लागता मग
थबकून मजकडे पहावे
वरुन पान एक टपकता
चटकन पुढे निघुन जावे...

गार हिरव्या वृक्षांनी अन
ऊंच काळ्या कड्यांनी काही
हितगुज मेघांशी करावे
अवचित कंठातून माझ्या
गीत एक लकेरून जावे...

अश्या सुंदर नवथर वेळी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - निसर्ग कविता