सांगावा

सांगावा

Submitted by पुरंदरे शशांक on 31 May, 2016 - 06:02

सांगावा

आले सांगावा घेऊन
ढग गहिरे जरासे
येई पाऊस मागून
सोड मनाचे निराशे

येतो हवेत गारवा
वारा वाभरा दुवाड
किलकिले करुनिया
ठेव मनाचे कवाड

नवलाची येई खास
मत्त वळवाची माया
घेई ऊरात भरून
भुई-अत्तराचा फाया

पखरण थेंबुट्यांची
होत राही अविरत
सल कोरडे विरु दे
ओल राख अंतरात ....

कुणीतरी सांगा त्याला …

Submitted by भुईकमळ on 24 December, 2015 - 04:52

कुणीतरी सांगा त्याला ,रान नि:शब्द हे झाले
धुंद कवितांचे थवे, दूर नभापार गेले ॥ धृ ॥

घेत पाषाण उशाला
नदीपात्र पहुडले ,
शेवाळाच्या पदरात
मासे घुसमटलेले...
कुणीतरी सांगा त्याला ,'झरे वाळुत जिरले..'.॥ १॥

भूईकडे बघतात
घोस मिटल्या कळ्यांचे
अश्रु सुकले ऋतूचे ,
पानांनी या झेललेले
कुणीतरी सांगा त्याला ,'फुलपंख ते झडले' .॥ २॥

पाणकणीस पाहते
तळ्यावर झुकलेले ,
मेघ गुलालात चिंब
जळी बिंब रेंगाळले
कुणीतरी सांगा त्याला , ' तळे भासांनी पेटले '॥३॥

कुठे गुंफेत शिल्पाचे
मंद स्मित भेगाळले ,
कळकीच्या बनातुन
रानवारे विव्हळले

Subscribe to RSS - सांगावा