तू
तू
तू......एक नि:स्वार्थ प्रेयसी
जीव ओवाळून टाकणारी
मिळेल त्यापेक्षा अंमळ
अधिकच देणारी
तुझा सुगंध
आसमंतात दरवळणारा
कवटाळायला जाताच हातून
हलकेच निसटणारा
तुझी चाहूल
नेहमीच सुखावणारी
दाराबाहेरचा कानोसा मात्र
रिकामाच ठेवणारी
तुझी वृत्ती
हात न सोडणारी
दुराव्यातही माझ्यावर
सावली धरणारी....
तुझे नक्षत्रांचे देणे
तुझे नक्षत्रांचे देणे..
माझ्या मनात दाटलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!!!
एकांती आर्त स्वरांनी..
विरहात रंग भरले,
स्मरणात तुझ्या गुंतुनी..
माझे 'मी' पण विरले,
मुग्ध ह्या भासांनी..
माझे जीवन भारलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!!
तुझे नक्षत्रांचे देणे..
माझ्या मनात दाटलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!
! अवेळीचा पाऊस आणि तू !
! अवेळीचा पाऊस आणि तू !
अवेळी येणार्या पावसाला पाहून
मला आठवतेस ती , तू
धांदल, गडबड उडवणारी ,
चकीत करणारी तू
मी येतेय रे , आपण भेटूया
असल्या क्षूल्लक शिष्टाचारात न पडणारी तू
रोजच पडतोय असा येणारा पाऊस
आणि कालच भेटल्यासारखी बोलणारी तू
अवेळीच्या पावसाला मी हरखून पाहत राहतो
जसं वर्षभराचं एकदम बोलणारी तू
झाडं,रस्ते,बिल्डींग,बंगले सगळ्यांना चैतन्य देणारा पाऊस
माझ्या मनाचं मळभ हटवणारी तू
अवेळी आला तरी सुखावणारा पाऊस
प्रसन्नतेचा शिडकावा करणारी तू
तू मान तिरपी करून
मी खूप काही बोल्लो
भडाभडा बोल्लो
भडास काढली, सगळी
तू ओठ मुडपून
एक टक बघत बसलीस
माझ्याकडे
मग हलकेच मान तिरपी केलीस
म्हणालीस,
"कवी आहेस नुस्ता..."
ग्रामिण मुम्बईकर
१.२३ रात्र
३१ मार्च ११
पाहिले तुला हळूच
.
.
.
पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून
रूपमोगरा मनात दरवळे तुझा अजून
.
ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात
चंद्र पाहता वरून लाजतो तुला बघून
.
आजकाल आसपास होतसे तुझाच भास
प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून
.
बघ वळून तू जरा तुझा पतंग लाजरा गं
लाव हास्यज्योत तू गं प्राण चालला विझून
.
हाय काय हासलीस हाय काय लाजलीस
हाय का गं चाललीस जीवनास मंतरून
.
तुषार जोशी, नागपूर
.
तू, मी, चंद्र - त्रिवेणी..
स्वतःच्या मनात दाटलेल्या अमावस्येला
लाखोली वाहत असताना एकदातरी पहायचा होतास
माझ्या नजरेत उतरलेला चंद्र...
**********************************
जग नसतं दीपलं पण
वाट दाखवण्यापुरतं चांदणं नक्की होतं
माझ्या चंद्रमौळी आकाशात...
**********************************
भैरवी बरीच रेंगाळली होती,
तरी तू आला नाहिस..
गालावर सुकून गेलं चंद्रपाणी..
**********************************
डोळे गच्च मिटुन
सगळी कवाडं बंद करुन बसले
तरी श्वासात दरवळत होताच चंद्र...
**********************************
चंद्राळलेलं आभाळ नाही मिळालं तुला
पण तोवर माझ्यात रुजला होता
तुझा चंद्राचा हट्ट...
...तू (विड्म्बन)
कौतुक शिरोडकर यांची क्षमा मागून...
मूळ गझल इथे वाचा...
http://www.maayboli.com/node/15178
बोलशी खोटे जरी तू
मागचीपेक्षा बरी तू...
तू न मुन्नी, तू न शीला..
साक्षात मल्लेश्वरी तू...
स्वप्न बघतो नित्य सुंदर..
ती खोटी, का खरी तू?
चिंतीशी वाईट माझे..
भार्या न, वैरी तू...
समजलो मी डाळखिचडी,
मिसळीवरची तर्री तू....
बघ नको, बागेत भेटू
सरळ ये ना घरी तू...
तूच ना?
चंग आहे बांधला मी, आज सत्य शोधण्याचा
जीवनाशी आजवर माझ्या, खेळणारी तूच ना?
काळजात बसविलेली मूर्ती ती, तुझीच ना?
काळजाला घरे माझ्या, पाडणारी तूच ना?
भांडलो दुनियेशी मी, एका इशार्यावर तुझ्या
एकटा गाठून मज आतून, भांडणारी तूच ना?
मोरपिसे सजवून लावली, मुकुटावर मी तुझ्या
टोचण्या मज त्या पिसांना, धार लावली तूच ना?
विश्वास नव्हता मजवर जितका, तितका तुजवर टाकला
विश्वासाचा श्वास माझ्या, तोडणारी तूच ना?
तू नसताना
तू नसताना, का असा हा पाऊस बरसून पडतो
थंड ओला वारा असा का अंगांगाला भिडतो
उजेड थोडा, कुंद सावळा, उदासवाणा मिटतो
गडगडणारा घन गंभीर का मत्तपणे हा घुमतो
तू नसताना आठवणींचा महापूर हा येतो
भिजल्या ओल्या क्षणाक्षणांचा दंश काळजा होतो
वहात जातो आयुष्याचा अर्थ जळाच्या संगती
गढूळलेल्या लाटा फुटती विद्ध किनार्यावरती
आता कळले, पाऊस असा का तू नसताना येतो
आवेग तुझा, तुझाच स्पर्श, सोबत घेऊन येतो
मेघदूत, अस्वस्थ, तुझे, गंध संदेश देतो
विरही मला, तुझ्या सारखा चिंब मिठीत घेतो