स्तुती

तुझे डोळे

Submitted by तुषार जोशी on 31 January, 2011 - 10:14

तुझे डोळे
वेडावुन जाती तुझे डोळे
तुझे डोळे

मन जड झाले
भांबावुन गेले
विरहात माझे
रंग हरवले
सप्तरंगी तेव्हा
स्मरणांच्या भेटी
रंगवुनी देती तुझे डोळे

सुगंधात न्हाते
मोहरून येते
पाहताना माझे
भान हरपते
पापणीच्या आड
प्रेम साठवती
सखे माझ्या साठी तुझे डोळे

स्वप्न जगण्याचे
उंच उडण्याचे
तुझ्यामुळे सारे
क्षण स्वर्ग माझे
आशेची किनार
समृद्धिची ओटी
चैतन्याच्या ज्योती तुझे डोळे

तुषार जोशी, नागपूर

गुलमोहर: 

सखी गं

Submitted by तुषार जोशी on 28 January, 2011 - 22:26

तुझे काळे काळे रूप
मला आवडते खूप
तुझ्या रंगात साठली गुंगी गूढ
सखी गं सखी गं सखी गं

तुझ्या रूपाचा प्रभाव
जाणवतो चारी ठाव
काळ्या सावळ्या रंगास किती ओढ
सखी गं सखी गं सखी गं

तुझे असणे केवळ
करी जगणे प्रेमळ
तुझे नसताना आयुष्य अगोड
सखी गं सखी गं सखी गं

तुझे बोलणे लाघवी
रोमारोमात पालवी
तुझे लाजणे जिवास लावी वेड
सखी गं सखी गं सखी गं

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)

गुलमोहर: 

पाहिले तुला हळूच

Submitted by तुषार जोशी on 21 January, 2011 - 21:35

.
.
.
पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून
रूपमोगरा मनात दरवळे तुझा अजून
.

ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात
चंद्र पाहता वरून लाजतो तुला बघून
.
आजकाल आसपास होतसे तुझाच भास
प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून
.
बघ वळून तू जरा तुझा पतंग लाजरा गं
लाव हास्यज्योत तू गं प्राण चालला विझून
.
हाय काय हासलीस हाय काय लाजलीस
हाय का गं चाललीस जीवनास मंतरून
.
तुषार जोशी, नागपूर
.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - स्तुती