काळी सावली
माझी एक जुनीच कविता, थोडी घासून-पुसून
काळी सावली
घासून-पुसून लख्ख केलेत तुमचे सगळे दिवे,
जळकी चिरगुटे झटकलीत माझ्या अंगणात.
काजळ-राशी उन्मत्त, जेंव्हा आढ्याकडे धावल्या,
तीच तर झाली पुढे, आणि आकांताने झगडली?
कधी काळी निथळले, माझ्याही अंगातून विखार,
रंध्रा-रंध्रातून व्यायली पिवळ्या सापांची पिल्ले.
तेंव्हाही तीनेच नाही का, आपला पदर कसला,
कवटाळले, टिपले, पचवले ते कुट्ट अंगार?
माहीत असूनही बाबांनो, चांगले तुम्हाला सारे,
खुशाल विचारता, माझी सावली काळी का बरे?
बापू