पंढरीच्या गवळणी
मेघ सावळा अंतरी
आली वारी आषाढाची
ओढ जीवाला लागता
वीणा वाजे हृदयीची
हरी नामाच्या घागरी
गवळणी डोईवरी
नटखट हरी साठी
वाहताती पंढरपुरी
लोणी शुभ्र मऊ मऊ
घुसळोनी अंतकरण
स्वाद चाखताच हरी
गेले की विरघळून
रंगी रंगला केशव
सेवीतो गोपाळकाला
नामा तुका भजनात
चढे रंग किर्तनाला
© दत्तात्रय साळुंके
११-७-२०१९
मन घुंघुर घुंघुर
लडिवाळ त्याचा नाद|
सवे दारी-अंगणात
पारिजात पारिजात|
मन खळखळ लाट
मन शंखले-शिंपले|
ओंजळीत साठवले
नभ सूर्य चंद्र तारे|
मन मोगर्याचे फूल
मन कस्तुरी दरवळ|
पहाटेच्या नीरवात
मन काकड्याचा स्वर|
मन माथी मोरपीस
मन सुरेल बासरी|
उभ्या 'सावळ्या'च्या संगे
मन चैतन्याच्या सरी|
मन समईची वात
त्यात 'मी'पण जळावे|
मन सोने उजळता
मन 'सावळे'ची व्हावे|
लय जुळता सख्याची
मन होई निराकार|
मागे उरे माझे मन
त्यात 'सावळा' साकार||
.
दुःख सारे शांत व्हावे शल्य सारे मावळावे, हीच साधी भावना या सावळ्या रंगात आहे
तो विधाता गात होता गोड गाणे त्या क्षणाची, भाववेडी कल्पना या सावळ्या रंगात आहे
मोगऱ्याला का गुलाबाचा कधीही राग येतो, सावळा गोरा कशाला भेद जगती नित्य होतो
जे कुणी म्हणतात गोरे चांगले कसले अडाणी, राजहंसी वेदना या सावळ्या रंगात आहे
केस काळे लांब वेणी स्मीत गाली पांघरोनी वागणे साधे प्रभावी तू गुणांची खाण अवघी
पण तुझ्या या सावळ्या रंगात आहे खास जादू, काय जादू सांगना या सावळ्या रंगात आहे