भावभक्ती लोणी
भावभक्ती लोणी
घर शोधूनी पहाती
कृष्ण गोप सखे सारे
नाही कुणीच घरात
शिरताती चोर सारे
शिंकाळ्यात ठेवलेले
लोणी नेमके शोधले
हात पुरेना कोणाचे
उंच होते टांगलेले
कान्हा सांगतसे युक्ती
करा कोंडाळे छोटेसे
चढूनिया त्यावरी मी
लोणी काढेन जरासे
सवंगडी लगोलग
धरताती एकमेका
कान्हा खांद्यावरी त्यांच्या
चढे अलगद देखा
हात घालिता मटकी
कडी वाजली दाराची
सवंगडी कान्हयाचे
पळ काढती त्वरेची
कान्हा उभा थारोळ्यात
तक्र लोणी भुईवरी
तुकडे ते खपरेली
विखुरले दूरवरी