साहित्य
कविता मनातली
कधी गोमटी, कधी साजिरी.
कधी नखऱ्याची नार नवेली.
कधी अल्लड
ही अवखळ कुठली.
कविता मनातली.
बंडखोर ही रान पेटवी.
वीज नभातुन कडाडलेली.
कधी तप्त ऊन, कधी चांदणओली.
कविता मनातली.
अभंगवाणी, कधी विराणी.
भावगीत अन् गझल नशीली.
कधी ओवी झाली, झरझर झरली.
कविता मनातली.
कधी प्रेमाची अन् विरहाची,
डोळ्यामधुनी कधी ओघळली.
कधी फुलातुन खुदकन हसली.
कविता मनातली.
कधी बासरी घननीळाची.
तांडव होऊन कधी नाचली.
कधी टाळ मृदुंगातून उमटली.
कविता मनातली.
- समीर
*कवी ग्रेस यांना काव्यांजली*
मी बराच भटकत गेलो
कवितेच्या ऐकून हाका
अर्थांचे विणले जाळे
शब्दांचा घेऊन धागा
दररोज तुझ्या सृजनाचे
रहस्य नवे उलगडते
प्रतिमांची उंची तुझिया
विश्वाला व्यापून उरते
तो आला , रमला, जगला
संध्येच्या कातर वेळा
तो महाकवी दुःखाचा
दुःखाला सजवून गेला
मज सूर्यास्ताची आता
हुरहूर सतावत नाही
तिन्हीत्रिकाळ संध्यासुक्ते
हृदयात ग्रेस गुणगुणतो.
-----©मयुरेश परांजपे(किमयागार)-----
१६/१०/२०२०
लखलखणारी वीज मुक्याने कुठे हरवली ?
आधी होती बुजरी मग थाटात मिरवली
लग्न लागले आयुष्याशी, व्यथा करवली !
गडगडले ढग त्वेषाने, फुटले कोसळले
लखलखणारी वीज मुक्याने कुठे हरवली ?
कानशिलावर बंदुक ठेवत काळ सरकला
ऐकुन माझे मी नियतीची खोड जिरवली
बाईच्या जातीला हे हे शोभत नाही
युगानूयुगे यादी होती तीच गिरवली
दुर्बळ होते तोवर मी आवडती होते
सक्षम झाल्यावर दुनियेने पाठ फिरवली
सुप्रिया मिलिंद जाधव
मोह
मोह
``साहेब, माझं स्वयंपाक-पाणी आटपलंय. बाईसाहेब त्यांच्या मैत्रिणींकडे गेल्यात न? आता दोन-तीन तास तरी परत यायच्या नाहीत. तुमचं आणखीन काही काम असलं तर सांगा. अगदी कोणतंही!``
पुष्पाचं बोलणं थोडंसं उशीराच माझ्या मेंदूत शिरलं. मी माझी कादंबरी अगदी संपवतच आणली होती. शेवटची आणि अतिशय महत्वाची दोन प्रकरणं तेव्हढी राहिली होती. मग लगेच ती एका दिवाळी अंकाच्या संपादकाकडे पाठवायची होती.
याच विचारात असलेल्या मला, पुष्पा काय बोलतेय ते थोडंसं उशीराच लक्षात आलं. मी पुष्पाला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं.
आधी मी कोण ते थोडक्यात तुम्हाला सांगतो.
दुर्दशा
माणुसकीला अर्थ देण्या मानवाचा जन्म घे.
दुष्टता संहारण्याला रक्ताचेही अर्घ्य घे.
विटंबल्या या असंख्य सीता, दशानानाच्या पिल्लांनी.
रोखण्या साऱ्यास पुन्हा ते धनुष्य हातात घे.
साथ देती राघोबांना रामशास्त्री आजचे.
सत्याला या न्याय देण्या तू पुन्हा अवतार घे.
द्रौपदीसम लिलाव करती खुलेआम हे सहिष्णुतेचा.
ठेवून मुरली हातामधली चक्र सुदर्शन आता घे.
मृत्यूचा बाजार मांडती दलाल असले धर्माचे.
दहशतीचे विष प्राशण्या पुन्हा शिवाचे रूप घे.
किती दुर्दशा बघसी देवा तूच तुझ्या या जगताची.
पापाचा कर विनाश किंवा तुझेच डोळे मिटून घे.
जोगिया
जोगिया
परवा काहीतरी कारणाने गदिमांच्या “जोगिया” ची आठवण झाली आणि पुन्हा शोधून ती कविता वाचली. खरतर या कवितेचं मराठी भाषेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. “महाकवी”, “आधुनिक वाल्मिकी” असा लौकिक असणाऱ्या ग. दि. माडगूळकरांच्या पहिल्या कविता संग्रहातील कविता, ज्या कवितेमुळे या कविता संग्रहाला “जोगिया” हे नाव मिळाले.
नावडता
"मी कोणालाच आवडत नाही." आज पुन्हा बाबा ओरडल्याने तिसरीतला गणु घराबाहेरच्या ओट्यावर एका कोपऱ्यात बसुन मुसमुसत होता. "आई सारखी छोट्या बबलीला घेऊन बसलेली असते. काही विचारावं तर नीट बोलतही नाही माझ्याशी, तिच्याकडे काही मागितलं तर तिचं आपलं एकच 'तु आता मोठा झालाहेस, हट्ट नको करु. तुझी कामे तुच करायला हवी.' बाबांना काही विचारलं की मोठ्याने खेकसतात माझ्यावर. तायडी तर चोंबडीच आहे. सारखी माझ्या तक्रारी करते. मला मार पडला की मज्जा बघत बसते. त्या तिघांच्या गप्पांमध्ये भाग घेतला की, लगेच 'तुला रे काय कळतं? तु काय इतका मोठा झाला का?' असं म्हणुन मला गप करतात. शाळेतपण हेच चालतं.
*निसटून सरी गेल्या अन्*
निसटून सरी गेल्या अन्
ओंजळीत रितेपण उरले
हुरहूर जीवाला छळली
काळीज एक पिळवटले.
घन एक रिता होताना
घनव्याकूळ झाले डोळे
रिमझिम सरींच्या संगे
ह्रदयस्थ वेदना बोले.
नकळत कसे भासांचे
संमेलन येथे भरले
दशदिशांत सुटला वारा
श्वासांचे तोरण हलले.
ही प्राणज्योत थरथरली
देहात तरंगही उठले
आत्म्यातल्या परमात्म्याचे
दर्शन जळात घडले.
-----©मयुरेश परांजपे(किमयागार)-----
०१/१०/२०२०
आठवणींच्या रेषा
अगदी सहज मनात आलं म्हणून.....
आठवणींच्या रेषा
जाणीवेच्या पटलावर आठवणींच्या रेषा उमटतात. पण रेषा-रेषामध्येही फरक असतो. काही रेषा समुद्रकिनाऱ्यावरच्या रेशमी रेतीत मारलेल्या रेघोट्यांसरख्या असतात. एखादी लाट येते आणि त्या रेषा पुसट होतात. येणारी प्रत्येक लाट त्या रत्नाकराच्या खजिन्यातले शंखशिंपले घेऊन किनाऱ्यावर येते. पण त्या मारलेल्या रेघोट्या मात्र पार पुसून जातात.
काही रेषा मात्र घाटातून दिसणाऱ्या डोंगरावरच्या रेषांसारख्या असतात. डोंगरावरून वाहत येणारे पाणीच या रेषा तयार करतं. आणि त्यावरून जेवढं पाणी वाहून जाईल तेवढ्या या रेषा अजून ठळक होत जातात.