दुर्दशा
माणुसकीला अर्थ देण्या मानवाचा जन्म घे.
दुष्टता संहारण्याला रक्ताचेही अर्घ्य घे.
विटंबल्या या असंख्य सीता, दशानानाच्या पिल्लांनी.
रोखण्या साऱ्यास पुन्हा ते धनुष्य हातात घे.
साथ देती राघोबांना रामशास्त्री आजचे.
सत्याला या न्याय देण्या तू पुन्हा अवतार घे.
द्रौपदीसम लिलाव करती खुलेआम हे सहिष्णुतेचा.
ठेवून मुरली हातामधली चक्र सुदर्शन आता घे.
मृत्यूचा बाजार मांडती दलाल असले धर्माचे.
दहशतीचे विष प्राशण्या पुन्हा शिवाचे रूप घे.
किती दुर्दशा बघसी देवा तूच तुझ्या या जगताची.
पापाचा कर विनाश किंवा तुझेच डोळे मिटून घे.