दुर्दशा चाळिशी

Submitted by दाद on 8 May, 2015 - 03:20

"... राया चला घोड्यावरती बसू.. अहो राया चला..."

सावकाश जेऊन पाठचं आवरणार्‍या आमच्या रायांच्या हातातून ठाणकन पडलेली माझी आवडती कढई अजून आठवते मला...
"अभंगवाणी लावत होतीस ना?" अस विचारत हे बाहेर आले होते. आणि आमचं भांडण बघायला तिकिट काढल्यासारखा लेकही.
"... अभंगवाणीच काढली... कव्हरमधे भलतिच सिडी ठेवलीत तुमच्यापैकी कुणीतरी. याला एक मराठी धड वाचता येत नाही... म्हणून तो किंवा तुम्ही. तुम्ही चष्मा लावला नसणार..." मी तणतणत असताना लेकानं सिडी काढून रफ़टफ़ करीत वाचल.
"आई, अखंडलावणी लिहिलय... नॉन स्टॉप लावणी".
"काहीही बरळू नकोस... आण इकडे"...

मग लक्षात आलं की कितीही दूर धरलं तरी नीट दिसत नाहीये.
त्याला म्हटलं... "अरे, सीडी जरा लांब धर बघू... माझा हात पुरेसा लांब नाहीये म्हणून तुला सांगतेय... अजून लांब... अय्याss. खरच की. अखंडलावणीच... काय बाई छापतात ही कव्हरं."

हे होईतो खरकटे करकटे घेऊन उभा नवरा करवादला "तुला चष्मा लागलाय..."
"काहीतरीच सांगू नका... पुरेसं दूर धरलं तर वाचता येतय..." एव्हाना लेकाने सीडी जमिनीवर ठेवली... माझ्या पायांपाशी. अगदी चटकन वाचता आलं मला. म्हटलं, ’बघ... येतय की वाचता... डोळ्यांना काहीही झालं नाहीये...’
"राईट... पाय... इनफ लांब आहेत... तेव्हा आता सगळं असंच वाचावं लागणार...’, इति मुलगा... हे म्हणतात ते खरय. तिरकं बोललाच तर हुबेहुब माझ्यासारखं.

आमच्या एका साऊदिंडियन आयसर्जन मित्राने "... तुला चष्मा नकोय इतक्यात. व्यायाम कर व्यायाम... डोळ्यांचा" अस स्वत:च्या दंडाच्या बेटकुळ्या फ़ुगवत सांगितलं होतं..
"...दूर बघ, जवळ बघ, निळं बघ, हिरवं बघ... डोळे बारिक करून... मोठे करून.. मान इकडे करून तिकडे करून... छ्त बघ, जमीन बघ... " असा बराच उपदेश केला होता. ह्याने सांगितलेले व्यायाम चारचौघात करता येत नाहीत हे लवकरच लक्षात आलं. ऑफ़िसात बाजूला बसलेले ’.. आला आला... झटका आला, हिला..’ असे चेहरे करायला लागले.
बाहेर दोनदा केला तर नवरा, मुलगा एकदम दूरून चालू लागले... ह्या बाईबरोबर आम्ही नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्नात शॉपिंग सेंटरमधे सगळेच हरवलो होतो. पण खरच चष्मा लागला नाही काही काळ. पण आता म्हणजे केस हाताच्याच काय पायाच्याही बाहेर गेल्याचं दिसत होतच. पायाकडे ठेवलेल्या सिडीजही वाचता येईनात.

पोळीवरचे चित्त्याचे डाग हळू हळू वाघाच्या पट्ट्यांत बदलायला लागले. साध्या भाजीच्या दुकानात कोबी-फ़्लॉवरची सखोल आणि सुदूर निरिक्षण व्हायला लागली. हळू हळू किंचित मोठे अपघात व्हायला लागले. रोजच्या जेवणाचं जमतं नीटच... घास तोंडात जायला प्रॉब्लेम नाही.... पण माझ्या नव्हे, घरातल्यांच्या पोटा-पाण्याची मलाच कीव येऊ लागली.
रेसिपी वाचून काहीही करणं ’खतरेसे खाली नही’ झालं. फसफसून उतू गेलेला केक, फेकून मारता येईल असा ढोकळा, बशीत लाडवाबरोबर छिन्नी-हातोडा द्यावा लागेल असा रव्याचा लाडू, अन संदीप खरेच्या कवितेतल्यासारखी... इतकी इतकी नाजुक की... हात लावला की फ़स्सकन फ़ुटणारी चिक्की.
काय नव्हेच ते. वाचून करायच्या अनेक गोष्टींची विल्हेवाट लागायला लागली. हॉटेलात पैसे कमी वाचले... एरंडेलचा डोस जास्तं वाचला... कार्यक्रमाची तारिख-वेळ .. खरतर नीट वाचली होती.. पण विसरले होते... चुकीच्या वाचण्यावर खपवता आली.
मधे काहीतरी थोडकंच शिवायला घेतलं. सुईत दोरा ह्यांच्याकडून ओवून घेतला, ते सोडा. पण दूर धरून शिवायच्या फ़ंदात अंगात घातला होता त्या ड्रेससहं टिपा घातल्या. स्व्त:ची नखं कापायचं जमेना. पायाची कापायची तर उभं राहिलं की नखं दिसतात. कापायला पाऊल जवळ घेतलं की गायब. पायाची कापायची सोडा... हाताची खायचंही जमेना. ते एक जरा निरखून करावं लागतं.

शेवट एक दिवस कहर झाला. ह्यांच्या डोळ्यांवर आयता होताच चष्मा म्हणून म्हटलं काय ते, ’... अहो, तुम्हाला नीट दिसतय तर हे एव्हढं माझं नख खाऊन टाका बरं...’
जे काय भडकले म्हणता. आपणहून चष्म्याच्या नंबरासाठी अपॉइंटमेंट घेतली आणि दारात नेऊन उभं केलं. आता आत जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.

आत माझा ताबा घ्यायला आलेल्या चायनीज फ़टाकडीच्या डोळ्यांच्या फ़टींकडे बघून मला आमच्या साऊदिंडियन आय सर्जन मित्राचे काळविटाक्ष आठवले. तिनं एका मशीनपुढ्यात बसवलं मला. तिच्या सो कॉल्ड डोळ्यांकडे बघून माझेही डोळे थोडे मिचमिचे झाले असणार. होतं असं आपल्यापैकी अनेकांचं. लहान मुलाला भरवताना तोंडं नाही होत वेडीवाकडी? तसंच डोळ्यांचं सुद्धा होतं.
".. कीप युवं आई(ज) ओपं(ग).." असं मधे मधे सायलेंट सायलेंट बोलत तिनं जरा जोरातच ऑर्डर सोडली... पुढे मला त्याचा अर्थं कळला नसल्यासारखं... ’डू sss नॉ(ट) क्लो(ज) युवं आई(ज)...’ पुन्हा सायलेंट सायलेंट आहेच.

मला नं वैताग यायला लागला की एकदम खूपच येतो. मग त्याची रिॲक्शन म्हणून खूप हसूही.. विनोदही सुचायला लागतात... वायरिंगच तसं आहे. मला हसू फ़ुटायला लागलं होतच.

’डोंग((ट))).. मू(व्ह)... दिस मशींग((न)) इस गोइं(ग) टू ब्लो एअं(र) इंग(न) युवं आई(ज)... डूss नॉ(ट) क्लो(ज) युवं आई(ज)"... त्या सायलेंट सायलेंट मधूनही जरब जाणवत होती.

"थांब आता सुई टोचतोय.... अंग सैल ठेव" म्हटल्यावर जितक्या गडबडीने आपण स्नायू आखडून घेतो त्यापेक्षा वाईट अवस्था. तिथे ते इंजेक्शन नजरेआड पाठी कुठेतरी असण्याची शक्यता जास्तं. ही सताड उघड्या डोळ्यांत फ़ुंकणार.
तिच्या फ़ुंकरा आणि माझी उघड-झाप ह्यांचं बराचवेळ द्वंद्वं झालं... ह्या सगळ्या द्राविडी प्रायाणामानंतर तिनं डोंगर पोखरून उंदीर काढावा तसा नंबर काढला... छोटासाच होता.. मला वाटलं ह्यानंतर काय अन किती येतोय.

मग फ़्रेम सिलेक्शन. ह्यांना नेण्यात अर्थच नव्हता. त्यांनी स्वत:साठी घेतलेल्या कोणत्याही फ़्रेममधून ते कोणत्याही ॲंगलने त्यांच्यासारखे दिसतच नाहीत. शिवाय दुसर्‍या, तिसर्‍या ट्रायलपासून ह्यांचं सुरू होतं... ’ जातीच्या सुंदराला... ’ किंवा मग ते, ’ब्यूटी इज इन द आईज ऑफ़...’
सगळ्यात वैताग म्हणजे ..’तुला शोभेल असं अजून बनायचंय...’ हे ते हताश होऊन म्हणायला लागले नं ... की मला नाही नाही ते अर्थं दिसायला लागतात.

कुण्णाला बरोबर न घेता एकटी गेले. साधारणपणे दिडेकशे फ़्रेम्सची घाल-काढ, घाल-काढ केल्यावर मी दोन पसंत केल्या.
एका मधे, ’.. युवं आई(ज) .. लुक नाssइसली बीss(ग) इंग(न) थिस फ़्लेम’ असं तिनं म्हटल्यावर मला तिला कुठे ठेवू अन कुठे नको असं झालं. तेव्हढ्यात दुसर्‍या फ़्रेमला तिनं ,’ युवं आई(ज) हाssss ई(ड) नाssइसली इंग(न) थिस फ़्लेम’ म्हटलं. ...
मी तिला कुठेही ठेवलं तरी फ़रक पडत नाही हे माझ्याच चटकन लक्षात आलं. बिल हातात ठेवल्यावर कस्टमरचे डोळे उघडे आहेत, बंद झालेत का पांढरे... त्यांना काही फ़रक पडत नाही.

दोन आठड्यांनी चष्मा मिळणार. मधल्या काळात मला सगळच एकदम नीट दिसायला लागलं होतं. हो.. माझं होतं असं. डॉक्टरांनी सांगितलेली टेस्ट नुस्ती केली की रिझल्ट कळेपर्यंत मी ठणठणीत बरी होते. शाळेपासूनची सवय आहे. परिक्षा ते रिझल्ट एकदम छान दिवस असतात.

तो दिवस उजाडला. चष्मा घ्यायच्या रांगेत बसले. आधीच मी चौकस. सगळं नीटच निरखत होते. माझ्या आधीच्या एकाला तिनं कानावरचे केस बाजूला घ्यायला सांगितले. त्याने ते शक्यं नाही असं सांगितलं.... ते कानावरच उगवलेले आहेत म्हणाला. चष्म्याची दांडकी कितीही फ़ाकवली, जवळ आणली, मधला ब्रीज घट्टं केला, वाकडा केला तरी चष्मा नव्या बुटासारखा त्याला चावतच होता. मी डोक्यात सगळ्याच्या नोंदी करत होते. एकदा का तो चष्मा तिनं दिला... की तो आणि मी. घरात चष्मा आणतेय की पिसाळलेलं जनावर... अशा भंजाळलेल्या विचारात होते मी.
शेवटी त्याच्या कानामागचं हाड वाढल्याने असं होतय असं त्याने लाजत लाजत सांगितलं. मी नकळत कपाळावर हात मारून घेतला. तिनं आत जाऊन भिंतीवर डोकं आपटलं असणार ... स्वत:चं.

माझा नंबर लागला. माझे चष्मे तिनं डब्यांमधून बाहेर काढून ठेवले. तर ते आपणहून ’एक पाय नाचिव रे गोविंदा’ करीत होते. मग माझ्याशी हवा-पाण्याच्या गोष्टी करीत तिने ते पूस पूस पुसले.

त्यातला एक माझ्या तोंडावर चढवण्यासाठी एकदम दांडपट्ट्यासारखा उगारला. मी घेतला तिच्या हातातून. उगीच हातघाई नको इथे. शिवाय आपले कपडे, बुटं, चष्मे कसे घालायचे ते आपलं आपल्यालाच कळायला हवं.
लावला तर तो सगळीचकडे चावत होता. पिसाळलेलं जनावर.. आपल्या पापण्यांना केस आहेत आणि त्याने चष्म्याची काच आतून झाडता येते.. असं लक्षात आलं. डोळे हवाबंद म्हणजे एकदम हवाबंद!

’माय आई(ज) कांग(ट)... माय आईज कान्ट ब्रीद...’ बोलायला सुरुवात केल्यावर लगेचच मेंदूचा रक्त पुरवठा पूर्ववत झाल्याने वाचले. तिनं जितकं टोकदार बघता येईल तितकं टोकदार बघितलं माझ्याकडे आणि काढून घ्यायला गेली. मीच परत अपघात नको म्हणून स्वत: हळू हळू करून काढून अर्पण केला तिला.

तो ती सुधारून आणेपर्यंत मी दुसरा लावून बघितला. तर तो नाकावर राहिनाच. वैताग... हसू... विनोद... वायरिंग.

’.. हा लावून फ़क्तं छतावरचं वाचता येईल...’ असं ती परत आल्यावर मी चष्मा घातलेल्या अवस्थेत छताकडे बघत म्हटलं तर म्हणाली ’ओह.. वेssली गु(ड) संग्थिंग न्यू... आय डिंण(डंट) नो’

मराठी विनोद शुद्धं इंग्रजीत केला तरी कळला नाहीये की ही व्हर्च्युअल हिंसा आहे ते कळेना. तिनं तो हिसकावून घेतला आणि पिरगाळ पिरगाळ पिरगाळला... तिचा आवेश बघून मला टेन्शन आलं. म्हटलं आता काय देतेय तो मुकाट घ्यायचा.. पुढल्याखेपी इंडियात गेलं की दुरुस्तं करून घेऊ... कोपर्‍यावरच्या चष्मेवाल्याकडून.

... आणि मी विचारात असताना चढवला आपणच माझ्या तोंडावर. स्किनी जीन्सची माकडटोपी घालताना कसं होईल ते कळलच मला...
चष्म्यातून डोळे उघडून काही बघायच्या आधी.. ’हा माझा मला काढता येणार नाहीये... तिलाच काढावा लागणारय.. हा चष्मा ती कसा सोलवटून काढणारय .. आणि त्याबारोबर माझं कान, नाक-बिक पण निघेल बहुदा...’ असं भयंकर काहीतरी वाटायला लागलं... पुन्हा डोळे हवाबंद!
मी उघडलेच नाहीत. डोळ्यांचा ऑक्सिजन पुरवठा लागोपाठ दोनदा बंद झाला तर काय होतं त्याबद्दल काही वाचलेलं असलं तर आठवेचना..
तिनं माझ्या मुस्कटाला हात घालायच्या आधी मीच काढला. स्किनी जीन्स घालणार्‍या आणि काढणार्‍यांच्या बद्दल माझ्या मनात असीम करूणा दाटून आली.

त्या फ़्रेमा माझ्या मापाच्या व्हायला बराच काढ-घाल, सैल-पीळ, पिरळ-सरळ-कुरळ... काय काय प्रकार करावे लागले.
दोन्हीचा नंबर एकच असला तरी मला वेगवेगळं का दिसत होतं देव जाणे. त्यातला एक घालून उठले आणि तिला म्हटलं हा घालून मी चालून बघणारय.
तिला ’व्हॉss(ट)?’ अशा वासलेल्या जबड्यासकट तिथेच सोडून मी ताड ताड, हळू हळू, चवड्यांवर, धाव्वत वगैरे चालीत त्या दुकानाची खोली... दोनदा आरपार केली. पहिल्या वेळी झाली थोडी आपटा-आपटी... मग आपसूक वाट करून दिली सगळ्यांनी.
मग एका जागी उभं राहून छत आणि जमीन बघून घेतली. मागे एकदा ह्यांचा चष्मा घालून पायाची नखं कापताना जमीन अशीच एकदम दोन फ़ुटांवर जवळ आली होती. ह्यांनु नुक्त्या व्ह्यॅक्यूम केलेल्या जमिनीवर किती कचरा आहे त्याचं विश्वदर्शन झालं होतं. माझ्या चष्म्यात तशा काही खुब्या नसल्याचं माझ्या लक्षात आलं.

पण परत आले तर... आधीच्या चवळीच्या शेंगेच्या जागी ठेंगणी-ठुसकी ठमाकाकू बसली होती. चष्मा काढ-घाल करून मी बाईच बदलल्याची खात्री करून घेतली.

’आता वर्षभराने तुम्हाला पुन्हा नंबर चेक करण्यासाठी इमेलने संपर्कं करू... तोपर्यंत गुड बाय... आमच्या इतरत्रंही शाखा आहेत तिथेही जाऊ शकता. इथेच यायला हवं असं नाही’ असा तोंडभर आशिर्वाद दिला तिनं.

असो... पूर्वी ह्यांचेच हरवायचे... आता माझेही शोधावे लागतात. कोणत्या डबीतून कुणाचा चष्मा सापडेल ह्याची खात्री नाही. दोघांना एकाचवेळी पेपर सारवून आणलेले दिसू शकतात.
फक्तं आता निमूट देवाण घेवाण करतो..... चाळिश्यांची, अभंगवाणी आणि अखंडलावणीची.

समाप्तं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !
ते - काय नव्हेच ते - वाचले की अगदी कोल्हापूरातले एखादे मोठे काका किंवा मावशी जुना किस्सा रंगवून सांगत आहेत असे वाटते.

<<< शेवट एक दिवस कहर झाला. ह्यांच्या डोळ्यांवर आयता होताच चष्मा म्हणून म्हटलं काय ते, ’... अहो, तुम्हाला नीट दिसतय तर हे एव्हढं माझं नख खाऊन टाका बरं...’ >>>

फु ट ले.........................

<< आणि आमचं भांडण बघायला तिकिट काढल्यासारखा लेकही.>>

पुर्ण किस्सा भन्नाट ........

भन्नाट
मस्त निखळ फटाके असतात तुमच्या विनोदी लेखनात. कुणाचेही उणे न काढता केलेले विनोदी लेखन आजकाल रेssअ (ssर) झाले आहे.
त्या चायनीज फटाकडीचे उच्चार वाचून "अपूर्वाई"मधील "वेली बिग फीत....वेली बिग फीत"... आठवले!

Lol
Perfect start of the weekend! Read on my way to home... realized I made a mistake by travelling in quiet carriage Lol

फसफसून उतू गेलेला केक, फेकून मारता येईल असा ढोकळा, बशीत लाडवाबरोबर छिन्नी-हातोडा द्यावा लागेल असा रव्याचा लाडू, अन संदीप खरेच्या कवितेतल्यासारखी... इतकी इतकी नाजुक की... हात लावला की फ़स्सकन फ़ुटणारी चिक्की. Proud खरं की काय दाद? Biggrin

भन्नाट भन्नाट!!

मस्त ! Proud

<< शेवट एक दिवस कहर झाला. ह्यांच्या डोळ्यांवर आयता होताच चष्मा म्हणून म्हटलं काय ते, ’... अहो, तुम्हाला नीट दिसतय तर हे एव्हढं माझं नख खाऊन टाका बरं...’ >>>

फु ट ले.........................>> मी पण Rofl

धम्माल!

Pages