दुर्दशा चाळिशी
Submitted by दाद on 8 May, 2015 - 03:20
"... राया चला घोड्यावरती बसू.. अहो राया चला..."
सावकाश जेऊन पाठचं आवरणार्या आमच्या रायांच्या हातातून ठाणकन पडलेली माझी आवडती कढई अजून आठवते मला...
"अभंगवाणी लावत होतीस ना?" अस विचारत हे बाहेर आले होते. आणि आमचं भांडण बघायला तिकिट काढल्यासारखा लेकही.
"... अभंगवाणीच काढली... कव्हरमधे भलतिच सिडी ठेवलीत तुमच्यापैकी कुणीतरी. याला एक मराठी धड वाचता येत नाही... म्हणून तो किंवा तुम्ही. तुम्ही चष्मा लावला नसणार..." मी तणतणत असताना लेकानं सिडी काढून रफ़टफ़ करीत वाचल.
"आई, अखंडलावणी लिहिलय... नॉन स्टॉप लावणी".
"काहीही बरळू नकोस... आण इकडे"...