*निसटून सरी गेल्या अन्*

Submitted by किमयागार on 30 September, 2020 - 16:15

निसटून सरी गेल्या अन्
ओंजळीत रितेपण उरले
हुरहूर जीवाला छळली
काळीज एक पिळवटले.

घन एक रिता होताना
घनव्याकूळ झाले डोळे
रिमझिम सरींच्या संगे
ह्रदयस्थ वेदना बोले.

नकळत कसे भासांचे
संमेलन येथे भरले
दशदिशांत सुटला वारा
श्वासांचे तोरण हलले.

ही प्राणज्योत थरथरली
देहात तरंगही उठले
आत्म्यातल्या परमात्म्याचे
दर्शन जळात घडले.

-----©मयुरेश परांजपे(किमयागार)-----
०१/१०/२०२०

Group content visibility: 
Use group defaults