सगळ्या सणांमध्ये
दिवाळीचा वेगाळाच थाट
सर्वांना अंधारामध्ये
दाखवी प्रकाशाची वाट ...
...
प्रकाश पसरवते
पणतीची पेटलेली वात
या दिवा़ळसणामध्ये
करा दु:खावर मात ...
...
निराशेच्या "भुईचक्राला"
लावून टाका आग
गोल गोल फिरत स्वतःमध्ये
निराशा होईल खाक ...
...
"फुलबाजीच्या" झगमगत्या
आनंदी तुषारांद्वारे
फुलवा मनामनांत
आनंदाचे "झाड"...
...
सद्वीचारांची ठीणगी लावा
रॉकेटच्या मुखात
महत्त्वाकांक्षेचे "रॉकेट" उडू द्या
उंचच उंच आकाशात ...
...
सुतळी "बॉम्बसारखे"
छिन्नविछिन्न होवू द्या
मनातले नकारात्मक
कीडलेले भाग ...
...
मस्ती
सभोवताल ऊन्हानं सारवलेलं
एक झाड आपल्याच सावलीत मस्तपणे विसावलेलं
माणसांच्या बेभान गर्दीत ........ आपलं नितळपण सांभाळलेलं
पाना-काट्यांच्या मधेच .........नाजूक फूल फुललेलं
नादाच्या कोलाहलात ............. आपला सूर गवसलेलं
व्यवहारी रुक्ष जगात .............. कोवळं माणूसपण जपलेलं
लाटांच्या तांडवात ............... एक लाकूड तरलेलं
जंगल वणवा आसपास .......... एक घरटं बचावलेलं
दाद देणारं असो नसो ........... एक गाणं रंगलेलं
एक झाड आपल्याच सावलीत मस्तपणे विसावलेलं
अनाकलनीय मित्र
पावसाचे एक कधीच कळत नाही
मैत्र जुळूनही अनोळखपण संपत नाही
सौम्य -रौद्र स्वरूपातून अरूपाची ओळख देत नाही
सरसर दरदर कोसळूनही मौन काही सोडत नाही
सप्तरंगी खेळ कधी नजर उचलून पहात नाही
हिरवे लेणे लेववून धरा कवेत घेत नाही
अंगाखांद्यावर हात ठेवतो सखा कधी होत नाही
स्पर्शून जातो मनामनाला आठव कधी ठेवत नाही
विसंवादी सूर याचे ताल मेळ जमत नाही
मल्हाराशी याचे नाते तोडूनही तुटत नाही
भरभरून आला तरी शोष काही संपत नाही
दंवावाटे कधी उतरून नातं कधी तोडत नाही
मनातून पुसायचा म्हटला तरी जात नाही
वाटोळा दगड बनून
तुझ्या प्रेमात भिजावं
तुझ्या प्रवाही वाहताना
ज्या दगडानं झिजावं
तुझ्या प्रेमापोटी झिजताना
दृढ व्हावी नाती
न कळावे झिजता झिजता
कधी बनलो रेती
पुढे पुढे जाताना
विसरून भेद अन जाती
हे देशा तुजसाठी
वाटे अखेर व्हावे माती
पुन्हा त्या मातीची
घेऊन कुणी आन
झिजावं झिजावं आमरण
तुझी राखण्या शान
वळिव
कोंदाटल्या दाही दिशा वारा श्वास कोंडलेला
आसमंत जणू सारा मंत्रभूल घातलेला
उठे वार्याची लहर फोफावते वेडीपिशी
घुसळुन काढी सारे वृक्ष रान कासाविशी
मेघ गर्जना करोनी विजेलाही कापविती
युद्धभूमिवरी जसे कोणी थैमान घालिती
थेंब टपोरे टपोरे भुईवरी धावले हे
मृग नक्षत्र नभींचे धरेवरी ओघळले
गंध मातीचा हा खरा उराउरात साठला
आवेग हा मिठीतला नि:श्वासात प्रगटला
भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोलवर... वीज लखलखायची
स्पर्श केवडा तुझा ... श्वास चंदनी तुझे
देह सळसळायचा अन मिठी डसायची
सांत्वनास तू मला... मी तुला असायचो
रात्रभर दवांमधे आसवे भिजायची
ह्या तिच्या जुन्या स्मृती... मौनराग छेडती
श्वास रोख! अन्यथा... शांतता ढळायची
दाखवू नकोस तू दु:ख सारखे तुझे
प्रेरणा मिळायची... वेदना सुचायची
दिवस पाहिले असे... रोज अवस व्हायची
आणि भास्करासही सावली गिळायची
एक नीळकंठ तर सर्व माणसांमधे
अंतरातली व्यथा अंतरी जपायची
आता कुठे उजाडले आभाळ लागले मिळू
सविता प्रकाश लागला या चांदण्यात विरघळू
वेडेपणा सुखावला मी पाहिले जधी तुला
तव चोरटा कटाक्ष गे मग लागला जिवा छळू
येशील भेटण्यास तू जेव्हा पुन्हा मला प्रिये
प्राणात माळ केवडा दोघे मिठीत दरवळू
ना सांगता कधी तुला ना बोलता कधी मला
माझे तुला तुझे मला मनमीत लागले कळू
नाही कुठे उणेपणा संसारवेल मोहरे
एकेक स्वप्न साजिरे साकारते हळूहळू
-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/
आ वासून समोरच नव्हतं ठाकून उभं
कसलंच कपाळाचं कामही साधं आज
आयतंच त्यांचं फावणार आता आहे
धरून फेर, मिरवायला नित्याचा नाच
आठवणीना या नव्हतं गोंजारलं मी कधी
झिडकारलं नाही पण दटावलं अधी मधी
सोबत त्यांची बरी, तरी भिती दाटते उरीं
नेतील त्याच वळणावर, मिटवून सारी दूरी
मित्र जिथले सोडले, पुसल्याही खाणाखुणा
नका म्हटलं नेऊं तिथं, करूनही मला पाहुणा
विसरलो तिला, तर म्हणे पोकळ हा बहाणा
आयुष्याच्या शून्यातून होणारच कसा तू उणा !
क्षणांचं खरंच या लक्षणच खोटं
ओढ किनार्याची कसली नाही
किनार अस्तित्वाच्या असली तरी
त्याचीही याना क्षिती नाही
पुढच्याच्या हातात सोपवून सारं
व्हायचं माहित पटकन पसार
तरी पण
त्यातला एखादा असतोही उत्कट
उजळून टाकतो आयुष्यच सारं
अन बेसावधही असतो क्षण एखादा
उधळून टाकायला नीटनेटकं सारं
सारवलेल्या कोर्या जिंदगीवर
पेरतच जातात हे रांगोळीचे कण
साकारतंय त्यातून चित्र कसं
पहायला याना फुरसद नाही
बघेल पुढचा काय ते म्हणत
शेवटच्या क्षणावर सोपवतात सारं
आणि मरणाच्या उंबरठ्यावरच्या
जिंदगीच्या कुठल्यातरी
अडखळतो शेवटचा तो क्षण
घेऊन मग क्षणभंगुरतेचा झाडू
होतो पुसूनच सारं टाकायला आतूर