काव्यलेखन

पुन्हा नव्याने

Submitted by क्षितिज रंगी on 3 July, 2022 - 23:21

वाटे पुन्हा नव्याने ,जगणे तरुण व्हावे
श्वासात कोंडलेले, दुखणे विरून जावे

भेगाळल्या मनाच्या, गाभ्यात लोपलेल्या
ओसंडत्या ऋतुंनी, बेभान रूप घ्यावे

ही जिंदगी नसावी, लाचार दीनवाणी
सोडून भीड सारी, स्वप्नील पंख ल्यावे

आतुर भावनांच्या, वाटा खुणावतील
पाऊल सावरूनी, चुकवून पार व्हावे

स्पर्शात ऊब सारी, डोळ्यात प्रेम पान्हा
द्यावे कधी मनाला, मौनास अर्थ यावे

वृत -आनंद कंद
(गा गा ल गा ल गा गा × 2)

शब्दखुणा: 

संतूर

Submitted by अनन्त्_यात्री on 2 July, 2022 - 07:26

स्वरतत्वाचे तुषार अगणित
भवतालाला व्यापुनी उरले

रोमरोम पुलकित करणार्‍या
स्वरपुंजांनी गारूड केले

स्वरचित्रातील अवकाशाच्या
नव्या मितीने मला खुणविले

स्वरलहरींचे जललहरींशी
निगूढ नाते पुनश्च कळले

स्वरशिल्पातील अमूर्ततेचा
चिरंतनाशी घालुनी मेळ
शब्दावाचून कानी गुंजला
विलक्षणाचा अद्भुत खेळ

आठवणींची किनार आहे

Submitted by निशिकांत on 30 June, 2022 - 08:25

सुवर्णयुग जे निघून गेले परतणार का दुबार आहे?
बरे जाहले आयुष्याला आठवणींची किनार आहे

बघता बघता चढाव सरला पुढे जीवनी उतार आहे
वार्धक्याला नकारणे हा जुना मानवी विकार आहे

होकाराची जिथे अपेक्षा तिथेच मिळतो नकार आहे
सांग जीवना कसे जगावे? विचित्र सारा प्रकार आहे

वसूल करता नगदीमध्ये मते जनांची सतांधानो !
श्वासनपूर्तीचे खाते अजून का मग उधार आहे?

खुनी चोरटे संसदेत का? न्यायपालिका विचारते पण,
"भुंकाभुंकी जरा करू या" विपक्षासवे करार आहे

उमेदवारी मुलांस अपुल्या राजकारणी देउन म्हणती
नवरक्ताला वाव द्यायचा रुजू लागला विचार आहे

एक कवी

Submitted by अक्षय समेळ on 29 June, 2022 - 09:46

नखशिकांत भिजतात पावसात वेदनांच्या
गुंफतात भाव-भावना मैफिलीत शब्दांच्या
एकांतात कुठे कुरवाळतात कवी दुःखाना
जाहीर प्रदर्शन मांडतात सभेत प्रेक्षकांच्या

वेळ त्यांचा संपूर्णपणे समर्पित एकांताच्या
चित्त त्यांचे सदा अधीन इंद्रधनू कल्पनेच्या
लेखणी वेगवान पळते पवनापरी जेधवा
मन घाली प्रदक्षिणा भ्रमरापरी वसुंधरेच्या

यत्न करुनी थकल्या मेनका नानापरीच्या
तरी न भंगते विश्वमित्रापरी कवींची तपस्या
निश्चल असते ध्येयाप्रती त्यांची मानसिकता
काय करणार तिथे अप्सरा स्वर्गलोकाच्या

© अक्षय समेळ

आत आसवे गाळत गेलो

Submitted by निशिकांत on 28 June, 2022 - 10:04

ध्यानी आले, आयुष्याची
पाने जेंव्हा चाळत गेलो
हास्य लिंपुनी तोंडावरती
आत आसवे गाळत गेलो

सातत्त्याने करीत अभिनय
माझ्यापासून मीच हरवलो
टाळ्या, शिट्ट्या मिळवायाला
पात्र मस्त मी वठवत बसलो
नाटक सरता भयाण वास्तव,
आरशास मी टाळ्त गेलो
हास्य लिंपुनी तोंडावरती
आत आसवे गाळत गेलो

गर्दीमध्ये, तरी एकटे
सूत्र जाहले जगावयाचे
जिथे निघाला जमाव सारा
त्याच दिशेने निघावयाचे
पुरून आशा-आकांक्षांना
प्रवाहात मी मिसळत होतो
हास्य लिंपुनी तोंडावरती
आत आसवे गाळत गेलो

तुमच्या येण्याची नोंद करा

Submitted by -शर्वरी- on 27 June, 2022 - 03:06

तुमच्या येण्याची नोंद करा
तुमच्या जाण्याची नोंद करा
दरम्यान मधली पोकळी भरण्याची सोय करा.
भरल्या आभाळाखाली न भिजण्याचा सायास करा
भिजलातच जर चुकुन तर न भिजल्याचे ढोंग करा.

नदीला पूर आला तर काठावरून पहात रहा
झाडं-रस्ते पाण्यात गेले, तर गच्चीत जाऊन ऊभे रहा
होडी लोटा पाण्यामध्ये आलाच पूर गळ्याशी तर
होडी नसली हाताशी तर प्रवाहात हात मारा.

त्राण जराही उरले नाही

Submitted by निशिकांत on 26 June, 2022 - 22:27

पेलत आलो तुझे जीवना ओझे, जगणे जमले नाही
मजा घ्यावया घाम गाळुनी, त्राण जराही उरले नाही

भळभळणार्‍या घावांचेही दु:ख कमी झाले असते पण
गर्दीमधल्या एकानेही जखमांना फुंकरले नाही

पारध होणे हेच प्राक्तनी लिहिले आहे, त्या महिलांनी
सभ्य श्वापदांच्या बुरख्यांना फाडुन का नागवले नाही?

"लोक काय म्हणतील" रोग हा असा ज्यावरी औषध नाही
मुक्त जगावे मनासारखे, जरी वाटले, पटले नाही

शिक्षण घेता कैक दालने नोकर्‍यातली दिसू लागली
सभ्य माणसे बनवायाचे तंत्र पुस्तकी दिसले नाही

माफ कर

Submitted by सामो on 26 June, 2022 - 09:12

पहाटे जाग येते
तू पाठमोरा निद्राधीन;
तुझ्या पाठीवरील तीळांची
नक्षत्रे रेखाटताताना वेळ जात रहातो;
.
घटिकापात्र रिते होत रहाते,
आपल्या हाती फक्त
प्रेम देणे असते;
ते सुद्धा नीट जमलेच नाही मला
.
शक्य झाल्यास माफ कर!!

काट्यांचे गजरे केले

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 24 June, 2022 - 12:29

14/14
काट्यांचे गजरे केले

हे वार फुलांनी अमुच्या पाठीत नेमके केले
टाळून फुले मग आम्ही काट्यांचे गजरे केले

तू पुन्हा भेटली अन् ह्या जखमेची खपली निघली
तू मीठ चोळले त्यावर... हे किती चांगले केले

दोघांस भेटले त्याची दोघांत वाटणी केली
ती सुखे घेउनी गेली, मी दुःख आपले केले

बाहुल्या नाचवत होता सत्तेच्या कळसुत्रीने
नियतीने क्षणात एका त्याचेच बाहुले केले

नशिबात दुःख आल्याने घुसमट झालेली त्याची
सांगून कुडीला मग मी आत्म्यास मोकळे केले

#स्वच्छंदी

शब्दखुणा: 

माझी गझल

Submitted by निशिकांत on 23 June, 2022 - 09:57

जीवनाच्या आर्ततेला शोभली माझी ग़ज़ल
वेदनांच्या सप्तरंगी रंगली माझी ग़ज़ल

सारुनी पडदा धुक्याचा शोधली माझी ग़ज़ल
चोरली होती जिने ती जाहली माझी ग़ज़ल

फाटका संसार माझा मी असा नि:संग पण
शांत माझ्या सोबतीने नांदली माझी ग़ज़ल

मी कधी बोलू न शकलो, गप्प तूही लाजरी
भाव माझे व्यक्त करण्या बोलली माझी ग़ज़ल

वाचते ग़ज़ला कुणी का पुस्तकातिल सांग ना !
गाइली तू त्या क्षणाला गाजली माझी ग़ज़ल

टांगता मी कैक लफडी.चावडीवर गावच्या
राज्यकर्त्यांच्या मनाला झोंबली माझी ग़ज़ल

पाहता वृध्दाश्रमी मातापित्यांना पोरके
ओघळाया लागली आक्रंदली माझी ग़ज़ल

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन