सुवर्णयुग जे निघून गेले परतणार का दुबार आहे?
बरे जाहले आयुष्याला आठवणींची किनार आहे
बघता बघता चढाव सरला पुढे जीवनी उतार आहे
वार्धक्याला नकारणे हा जुना मानवी विकार आहे
होकाराची जिथे अपेक्षा तिथेच मिळतो नकार आहे
सांग जीवना कसे जगावे? विचित्र सारा प्रकार आहे
वसूल करता नगदीमध्ये मते जनांची सतांधानो !
श्वासनपूर्तीचे खाते अजून का मग उधार आहे?
खुनी चोरटे संसदेत का? न्यायपालिका विचारते पण,
"भुंकाभुंकी जरा करू या" विपक्षासवे करार आहे
उमेदवारी मुलांस अपुल्या राजकारणी देउन म्हणती
नवरक्ताला वाव द्यायचा रुजू लागला विचार आहे
कुठे लपावे आमजनांनी? जिवंत असता चोंच मारुनी
मास खावया वखवखलेले गिधाड करते शिकार आहे
दहशतवादी म्हणे जिहादी ! कान फुंकले शेजार्याने
स्वदेश वाटे नर्क तयांना, स्वर्ग दुबाई कतार आहे
आम आदमी तयार देवा ! लिलावात विकण्यास स्वतःला
पोट भराया दोन भाकरी, किती मागणी सुमार आहे
नकोस तू "निशिकांत" रंगवू स्वप्न गुलाबी भविष्यातले
मध्यमवर्गी जन्मलास तू, जगावयाचे टुकार आहे
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र.९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२
सुंदर..
सुंदर..