पुन्हा नव्याने

Submitted by क्षितिज रंगी on 3 July, 2022 - 23:21

वाटे पुन्हा नव्याने ,जगणे तरुण व्हावे
श्वासात कोंडलेले, दुखणे विरून जावे

भेगाळल्या मनाच्या, गाभ्यात लोपलेल्या
ओसंडत्या ऋतुंनी, बेभान रूप घ्यावे

ही जिंदगी नसावी, लाचार दीनवाणी
सोडून भीड सारी, स्वप्नील पंख ल्यावे

आतुर भावनांच्या, वाटा खुणावतील
पाऊल सावरूनी, चुकवून पार व्हावे

स्पर्शात ऊब सारी, डोळ्यात प्रेम पान्हा
द्यावे कधी मनाला, मौनास अर्थ यावे

वृत -आनंद कंद
(गा गा ल गा ल गा गा × 2)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४ था शेर

वाटा खुणावतील
ऐवजी
वाटा खुणावताना
असे केल्यास वाचताना पण जास्त लयीत वाटेल. ( व्ययक्तिक मत , मी गझल या प्रकाराचा जाणकार नाही )

छान आहे गझल. वरची किरण कुमार ह्यांनी सुचवलेली दुरुस्तीही चपखल आहे.

ह्या वृत्तातल्या सगळ्या कविता आणि गझला (आई म्हणोनी कोणी, हे राष्ट्र देवतांचे, काटा रुते कुणाला, केव्हा तरी पहाटे, सारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे सर्व) सवयीने 'ऐ दिल मुझे बता दे' च्याच चालीत वाचल्या जातात माझ्याकडून.