काव्यलेखन

प्राक्तन

Submitted by कविन on 27 February, 2024 - 03:36

उष्टेमाष्टे खरकटलेले
असे काही मी खातच नाही
स्वप्नं पहावे असे काही तर
पोट रिकामे; झोपच नाही

उजाड माळावरी वस्तीला
क्षण सुखाचा फिरकत नाही
भुयारातल्या अंधाराची
ओढ अताशा थांबत नाही

इतके सारे वार सोसूनी
उमेद कशी रे संपत नाही?
वेताळाचा प्रश्न 'उगाचच'
तरी उत्तरे विक्रम 'काही'

गतकाळाचे व्रण पुसटसे
वस्तीवर ना दुसरे काही
सूर्य उगवतो नेमाने, तो
वसा घेतला मोडत नाही

गोठवणार्‍या थंडीसारखे
दु:ख जाहले, हरकत नाही
पाणी बन तू, पाण्यामधले
जीवन गोठून थांबत नाही

कंकणे

Submitted by द्वैत on 25 February, 2024 - 01:40

अकल्पित काही घडावे असे की
निळीशार व्हावी नभाची कडा
कुठे हालता रानवारा जरासा
पडो पावलांशी फुलांचा सडा

फुले वेचिता वेचिता गीत यावे
कुण्याकाळच्या प्रेयसीचे मुखी
कळे भान येता मला सूर देते
अरे! लेक माझी गुणी लाडकी

तिच्या या सुरांचे नभी चंद्र होती
आणि सांडती अंगणी चांदणे
पहाटे जरा लागता नीज डोळां
पुन्हा किणकिणाती मुकी कंकणे

द्वैत

पांघराया लागलो

Submitted by किरण कुमार on 16 February, 2024 - 11:38

चांदण्या डोळ्यात साऱ्या साचवाया लागलो
ती बघाया लागली अन् मी जगाया लागलो

स्वैर झाली कुंतले अन् घट्ट झाली ती मिठी
गंध, गजरा, मोगरा मी पांघराया लागलो

ते गुलाबी ओठ हलके टेकले ओठावरी
हाय श्वासातुन तिच्या मी दरवळाया लागलो

पैंजणांनी बंड केले शांत रात्री त्या किती
नाद झाला एक ज्यातुन मी उराया लागलो

स्वप्न मोठे पाहण्याला दाट अंधारात त्या
या प्रकाशी काजव्यांना मी धराया लागलो

कोणता हा खेळ आहे, खेळतो का मी असा ?
जिंकण्या ती , ऐनवेळी मी हराया लागलो

गुंतले ते पाश काही खोल हृदयी एवढे
पिंजऱ्याच्या पाखरासम फडफडाया लागलो

नभी दाटता खिन्नता अंतरीची

Submitted by द्वैत on 12 February, 2024 - 10:29

नभी दाटता खिन्नता अंतरीची
मला साद देई तुझी प्रार्थना
विझू लागल्या की दिशा दूर दाही
कुठे दीप ठेवू मला सांग ना

कुणाला स्मरावे कुणाला पुजावे
कुणा सांग घालू इथे साकडे
उभ्या घेरुनी या तमाच्या लकेरी
कसे पार जावे प्रकाशाकडे

कशी पांगळ्या या मनाची अवस्था
मला मीच ना सापडे नेमका
जसा शोध घेतो स्वतःचा स्वतः मी
मुका शब्द होतो पुन्हा बोलका

द्वैत

रेसिपी

Submitted by मुग्धमानसी on 9 February, 2024 - 10:55

कधीकधी उगाचच
स्मृतींशी निगडीत मेंदूतल्या काही पेशी
चाळवतात काही जुन्या चवींना.
आणि जीभेला संदेश जातात...

शिजवावे, खावे, चाखावे,
भोगावे त्या चवीला. पुन्हा एकदा.
पण कसे?

तीच चव गाठण्याची प्रक्रीया नक्की आठवत नाही आता नीट.
जे सापडलं इंटरनेटवर ते जुळलं नाही स्मृतीसोबत
आणि तुला करावा कॉल आणि विचारावं पूर्वीसारखं...
अरे हो... ती सोय आता राहीली नाही.
लक्षात आलं.

आठवणींच्या आधारे शिजवलेल्या त्या पदार्थाला जेंव्हा आला तो जुना ओळखीचा वास
रडू आलं गं मला!

भूक नाही आता.
जेवू वाटत नाही.

शब्दखुणा: 

हिमवर्षा

Submitted by ---पुलकित--- on 9 February, 2024 - 07:17
हिमवर्षा

हिमवस्त्राची तलम पैठणी
लेवुनि अवनी मृदुल हसे
शीतल निर्मल शुभ्र धरा ही
शिशिराज्ञी जणु मज भासे

हिमगौरीच्या आगमनास्तव
वनचर उल्हासित झाले
चिंब नाहले तनामनासव
आशीर्वादच रिमझिमले

रोपटी अल्लड, क्षण-क्षण गाती
वायूसंगे रुणूझूणू
वृक्ष थोर ते, कण-कण जपती
सुखदुःखाचे अणुरेणू

अगा मानवा पाहि जरासे
वास्तवात उघडुनि चक्षू
तापमान जर वाढत गेले
भविष्यात होशिल भिक्षू

शब्दखुणा: 

प्रेम

Submitted by Dattaj on 8 February, 2024 - 04:30

तुझं अंधुक अस्तित्व
मला खेटून गेलं
तुझं स्पष्ट देखणेपण
मला भेटून गेलं

तुझं अल्लड उणेपण
मला भासवून गेलं
तुझं पोक्तेपण मनातलं
मला आसवुन गेलं

तुझं अभंग हासणं
मला जगवुन गेलं
तुझं भंग होणं माझ्यातलं
मला उसवुन गेलं ....

शब्दखुणा: 

ज्योत

Submitted by अनन्त्_यात्री on 7 February, 2024 - 00:07

रिकामटेकडी मोठी तिच्या माथ्यावर
माझा वायफळमळा-त्याच्या बांधावर
मृगजळ साठवीन रोज थोडे थोडे
पिऊन जे दौडतील कल्पनांचे घोडे
एकशृंगी घोडे त्यांचे पसरूनी पंख
उडतील - टाळण्यास समीक्षकी डंख

कल्पिताचे वास्तवाशी जुळवी जो नाते
ज्योत त्याची विझण्याच्या आधी मोठी होते

प्रजासत्ताकाचा जोश

Submitted by दत्तात्रय साळुंके on 4 February, 2024 - 12:59

घरापासून दूर कुठेतरी कोकणातल्या उघड्या रानात
भात कापलेल्या कोरड्या खाचरात भाताच्या बुडख्यात
आजू बाजूला ठोकलेल्या चौरस वाघरात
कोंबड्यां, कुत्री, घोड्यांच्या गराड्यात
आयत आकाराच्या मांडणीवर लोकरी अंथरुणं, पांघरुणं
आडोश्याला तीन दगडांचं चूलाणं,
हंडा, कळशी,पितळ्या, तांब्या, ताटल्या चारदोन
चुलीभोवती भांड्यांचं मेंढरागत रिंगण
असंच मल्लू धनगराचं उघड्या छताखाली देखणं राहणं

शब्दखुणा: 

क्षितिजापल्याड

Submitted by रेव्यु on 27 January, 2024 - 06:43

क्षितिजापल्याड

निःस्तब्ध शांत कातरवेळी
स्मृतींचा उडतो पाचोळा

मनात हुरहूर दाटे.
सैरभैर मी बावरा, खुळा

दूर क्षितिजावरती.
खुणवे गत आठवणींचा पसारा.

सावरता सावरता हरवतो मी.
घरपरतीची वाट
देते हाळी
करते मौन इशारा

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन