सर्दी
नाक गळते डोळे गळती
गळतो देह उभा सारा
होता सर्दीचा सतत मारा
उत्साहा ना उरतो थारा
अंग आंबते नाक चोंदते
तापमापकाचा चढतो पारा
डोक्यामधल्या ऐरणीवर
सतत होई घणांचा मारा
गरम पाणी गुळण्या करा
दररोज घ्यावा वाफारा
हजार उपाय केले जरी
तरी पडेना काही उतारा
सर्दी पाठी खोकला येतो
खोकतखोकत काठी टेकत
सर्दी रंगते मन भंगते
जगणे होते रडत खडत
ऑक्टोबरचा शेवट जवळ येतोय. रखडलेला पाऊस संपून उन्हाचा प्रताप जाणवायला लागलाय. त्यातच अचानक गारठा वाढल्याची जाणीव झाली. काल झोपताना घसा खव-खवल्या सारखं वाटलं. लगेच मनाचा 'कारणे शोधा' खेळ सुरु झाला. "रात्री जेवताना दही खायला नको होतं असं वाटून गेलं. आयुर्वेद-वाले ओरडतात त्यांची चेष्टा केल्याचं पाप भोवलं बहुतेक." पासून ते, "घरी येऊन गेलेलं कोण कोण खोकत, सुरसुरत होतं ते आठवून पाहणं" आणि सरते शेवटी, "या गोष्टी या सिझन मध्ये व्हायच्याच, आपलाच resistance कमी पडला" हा समजूतदार निष्कर्ष काढला, साहजिकच आहे.
सर्दी.... ईश्वरा्ने माणसाला बहाल केलेली एक...... नाही..व्याधी, रो्ग वगैरे म्हणवून घ्यायचीही सर्दीची लायकी नाही. देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तुला काही ना काही काम दिलंय असं म्हणतात. पण काही काही बाबतीत ते पटत नाही.. उदा. डास ! हे प्रकरण का तयार केलं असेल, हे मला आजपर्यंत न सुटलेलं कोडं आहे !! लोकाना नको त्या वेळी, नको तिथे चावणे, लोड शेडिंग चालु असता्ना रात्रीच्या वेळी आपल्या सुमधुर गुणगुणण्याने लो्कांच्या झोपेचा कचरा करणे,मलेरियाच्या microbes ना आपल्या पाठी घालुन गावची सैर करुन मग ईष्टस्थळी (म्हणजे एखाद्याच्या रक्तात) पोहचवणे, असली कामं डासांना फ़ार चांगली जमतात !