सर्दी झालेला माणूस (विनोदी कथा)

Submitted by माबो वाचक on 24 January, 2025 - 04:16

“सीबा, दिबोद दे.” आपले चोंदलेले नाक हलवीत राजेश म्हणाला.

राजेश सोफ्यावर मांडी घालून बसला होता. त्याने अंगावरून ब्लॅंकेट घट्ट ओढून घेतले होते. त्याच्या आजूबाजूला वापरलेल्या टिशूचा खच पडला होता. सर्दी झाल्यामुळे त्याने ऑफिसला आज दांडी मारली होती. सतत वाहणारे नाक व एकामागोमाग एक येणाऱ्या शिंका यांनी तो बेजार झाला होता. आणि त्याच्या एकामागोमाग एक येणाऱ्या मागण्यांनी त्याची बायको, सीमा बेजार झाली होती.

सीमाने टीव्हीचा रिमोट त्याच्या हातात दिला. “आता शांतपणे टीव्ही पाहत बसा व मला माझी कामे करू द्या.” ती म्हणाली. राजेशने एक हात ब्लॅंकेटच्या बाहेर काढून तो रिमोट ओढून आत घेतला. बराच वेळ रिमोटशी झटापट केल्यानंतर त्याची चूक त्याच्या लक्षात आली. मग त्याने रिमोट ब्लॅंकेटच्या बाहेर काढला आणि बटन दाबले. टीव्ही चालू झाला.

“आताची ठळक बातमी - सरकार सर्दीच्या औषधांवरील जीएसटी वाढविणार.” हे ऐकून रागाने त्याने चॅनेल बदलला. दुसऱ्या चॅनेलवर क्रिकेटची मॅच चालू होती.

“सीबा, उशी आदूद दे” बराच वेळ एकाच जागी बसून राजेश च्या पाठीला रग लागली होती.
सीमाने त्याला उशी आणून दिली. उशिला टेकून, पाय ताणून तो मॅच बघत बसला. पण मॅच पाहण्याचा त्याचा आनंद फार वेळ टिकला नाही.

“अदेदे, विदाद कोदी आऊद झादा.” त्याचा एकमेव आवडता खेळाडू बाद झाल्यामुळे त्याचा मॅच मधला रस संपला. त्याने टीव्ही बंद केला.

तेवढ्यात त्याचा फोन वाजला. ऑफिस मधून बॉस चा फोन होता. “अरे राजेश, ऑफिसला का आला नाहीस आज?”
“सद, बदा सददी झादी आहे.” राजेश म्हणाला.
“काय म्हणालास? बनात गर्दीची झाडी आहे?” राजेशने सकाळीच एखादा पेग घेतला कि काय अशी शंका बॉसला आली.
“सद, बी आदादी आहे.” राजेशने पुन्हा एकदा प्रयत्न केला.
“तू अडाणी आहेस ते मला माहित आहे. तरीही मी तुला कामावर ठेवलेच ना? तू ऑफिसला का आला नाहीस ते सांग.”
राजेशच्या बॉसला त्याची ह आणि द ची भाषा कळणे शक्य नव्हते. थोडा वेळ बॉस बरोबर शाब्दिक झटापट करून राजेशने नाईलाजाने त्याच्या बायकोकडे फोन दिला.

सीमा ने फोन घेतला, “सर, ते आजारी आहेत. त्यांना सर्दी झाली आहे. म्हणून आज ते ऑफिसला आले नाहीत. पण तुम्ही म्हणत असाल तर मी पाठवून देते.” ही ब्याद ऑफिसला गेली तर बरेच होईल असा विचार करून ती म्हणाली.

“नको नको,” बॉस पटकन म्हणाला. सर्दी झालेला राजेश ऑफिसला आला तर उरलेला स्टाफ पळून जाईल याची त्याला खात्री होती. “त्यांना विश्रांती घेऊ द्या. आणि पूर्ण बरे झाल्यावरच ऑफिसला पाठवा. आणि …”

सीमाने निराशेने फोन ठेवला.

“बग, बला किदी बहद्व आहे ऑफिद बदे. बॉद दे फोद केदा.” राजेश छाती फुगवून म्हणाला.
“कसलं डोंबलाच आलंय महत्व तुम्हाला.” सीमा फणकाऱ्याने म्हणाली. “गेल्या वेळी तुम्ही आठवडाभर दांडी मारली होती, तेंव्हा ऑफिस मध्ये कोणाच्या लक्षात सुद्धा आले नव्हते. यावेळी तुमच्या कडे ऑफिसच्या वॉशरूम ची चावी आहे म्हणून त्यांनी फोन केला. ते माणूस पाठविणार आहेत, त्याला चावी तेवढी द्या.”
ते ऐकून राजेशचा चेहरा गरीब मालकाच्या गरीब गाईप्रमाणे दिसू लागला. तो सीमाला काही प्रतिउत्तर देणार तेवढ्यात घराची बेल वाजली.

सीमाने दार उघडले. दारात शेजारची मोहिनी उभी होती. “सीमा, अगं थोडी साखर देतेस का?”
सीमा साखर आणायला आत गेली.

“अय्या, राजेश भावोजी तुम्ही आज घरी कसे? ऑफिस ला गेला नाहीत?” मोहिनी ही तिच्या नावाप्रमाणेच मोहक होती. त्यामुळे तिच्याशी बोलण्याची संधी सोसायटीतील पुरुष सोडत नसत. राजेश सुद्धा याला अपवाद नव्हता.

“बी आदादी आहे. बदूद गेदो दाही.” राजेश म्हणाला.

पण त्याचे बोलणे मोहिनीच्या डोक्यावरून गेले. तिने चेहरा कसनुसा केला व स्पष्टीकरणासाठी सीमाकडे बघितले. पण सीमा साखरेची वाटी हातात घेऊन मख्ख चेहेर्याने उभी होती. आपण त्या गावचेच नाही असा अविर्भाव तिने आणला होता, पण मनातून मात्र तिला खूप हसू येत होते. राजेशने अजून काही बोलण्यापूर्वी मोहिनीने वाटी घेतली व लगबगीने निघून गेली. सीमाने हसू दाबत दार बंद केले. राजेशचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.

थोड्यावेळाने राजेशची पुन्हा चुळबुळ सुरु झाली.
“सीबा, चहा कद एक कप” त्याने फर्मान सोडले, “आदे घादूद”
सीमा नुकतीच धान्य पाखडायला बसली होती. तिने चरफडत हातातले सूप बाजूला ठेवले व चहा करायला आत गेली.

तिने वाफाळत्या चहाचा कप राजेशच्या हातात दिला.
“अगं, चहा बदोबद बीदकिदे पद दे”
सीमाने दोन बिस्किटे आणून दिली.
राजेशने बिस्कीट चहात बुडवले. पण ते खाण्यापुर्वीच तुटून चहात पडले. त्याने दुसरे बिस्कीट चहात बुडवले. त्यानेसुद्धा पहिल्या बिस्किटासारखीच हाराकिरी केली. बहुदा त्यांना जिवंतपणे राजेशच्या तोंडात जाणे पसंद नसावे.
“सीबा, अगं चबचा देतेस का? बीदकिदे चहात पददी.” सीमाच्या चेहेर्यावरील भाव पाहून त्याने “पीद” अशी पुस्ती जोडली.
सीमाने त्याला चमचा आणून दिला. राजेशने चमच्याने बिस्किटे खाण्याऐवजी चहा ढवळला. त्यामुळे त्या चहाचे आता बिस्किटांच्या सूप मध्ये रूपांतर झाले.

राजेशने डुगडुगत्या हाताने फुर्रर्र फुर्रर करत चहा संपविला. चहा पिऊन झाल्यावर त्याला थोडी हुशारी वाटली. तरीही बिस्कीट खाण्याच्या नादात चहा गार झाल्याची चुटपुट त्याला लागून राहिली.

थोड्यावेळाने त्याला भूक लागली.
“सीबा, सूप आद.” तो म्हणाला.
सीमाने तिच्या हातातला सूप राजेशच्या हातात दिला. “बरे झाले, बसल्याबसल्या तेवढे काम तरी करा. तो डबा पाखडून संपवा.”
राजेशला हसावे कि रडावे ते कळेना. आपण धडधाकट असताना घरातले एकही काम करत नाही. तरीही आजारी असल्यावर आपण काम करू; असे आपल्या बायकोला कसे काय वाटले; याचेच त्याला आश्चर्य वाटले. “अगं, तोब्यातोते सूप तयाद कदूद दे, प्यायदा.”
सीमाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तिने राजेशच्या हातातून सूप खसकन ओढून घेतला व जमिनीवर आदळला, आणि टोमॅटोचे सूप तयार करायला आत निघून गेली.
काही घडलेच नाही अशा अविर्भावात राजेशने शेजारी पडलेला पेपर उचलला व वाचू लागला. थोडा वेळ त्याने वाचण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पाणीभरल्या डोळ्यांना अक्षरे दिसेनात. पेपरमधला आलिया भट चा फोटो त्याला रणवीर कपूर सारखा दिसू लागला, तेंव्हा त्याने पेपर बाजूला ठेवून दिला.
मग त्याने कंटाळा घालविण्यासाठी प्राणायाम करायचा प्रयत्न केला. पण गच्च झालेल्या नाकातून टिचभरसुद्धा हवा आत शिरत नव्हती. शेवटी त्याने तो नाद सुध्दा सोडून दिला.

मग वेळ घालवण्यासाठी त्याने त्याचा फोन हातात घेतला व मायबोलीची वेबसाईट चाळू लागला. तेथे त्याला माबो वाचक या लेखकाची अंधारी रात्र ही भयकथा दिसली. त्याने ती वाचायला सुरुवात केली. त्याने ती कथा वाचून झाल्यावर वैतागाने फोन बाजूला ठेवला.
अरे, ही काय कथा आहे? यात ना भूत, ना प्रेत ना मांत्रिक. अन् भयकथा म्हणे! अन् या लेखकाचे नाव तरी काय, तर म्हणे माबो वाचक. अरे, तू वाचक आहेस की लेखक हे एकदा ठरव. कोणत्याही विषयावर कथा लिहितो. उद्या सर्दी झालेल्या माणसावर सुद्धा एखादी विनोदी कथा लिहिशील. स्वतःच्याच विचारांवर राजेश खुश झाला. आपण प्रगल्भ वाचक झालो आहोत असे त्याला वाटले.

सीमा टोमॅटोचे सूप तयार करून घेऊन आली. गरमागरम सूप च्या वाफेने राजेशचे नाक हुळहुळू लागले. त्याने मोठ्ठा आ वासला आणि सटकून एक शिंक हाणली. त्या शिंकेच्या फटकाऱ्याने शेजारचा वापरून टाकलेला टिशू उडून त्याच्या बायकोच्या तोंडावर जाऊन आदळला. तिने त्याच्याकडे तुडवू कि चेचू अशा नजरेने पहिले. त्याने घाबरून त्याची नजर फिरविली. व आपण त्या गावचेच नाही असे दाखविण्यासाठी गाणे गुणगुणू लागला, “बेदे दोददा … दूद, बेदे प्याद की … दूद”.

सीमा दात ओठ खात हातांच्या मुठी वळवीत तोंड धुवायला आत निघून गेली.

सीमाची आई म्हणायची, सर्दी झालेला माणूस आणि वर्दी घातलेला माणूस यांच्यापासून चार हात लांब रहावं. प्रकरण कधी अंगावर शेकेल हे सांगता यायचं नाही.
सीमाला नुकतीच त्याची प्रचिती आली होती.
जर वर्दी घातलेल्या माणसाला सर्दी झाली तर काय होत असेल या विचाराने तिला हसू आले.

“सीबा, पादी आद” सूप पिऊन झाल्यावर राजेश म्हणाला.
सीमाने पाणी आणले. आणि दुरूनच तिचा हात लांब केला. त्यानेही त्याचा हात लांब केला. तरीही त्यांच्या हातांमध्ये फूटभर अंतर होतं. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती आणखी थोडे पुढे आली, पण गरजेपेक्षा एक इंचभर सुद्धा जास्त नाही. शेवटी त्याने कसाबसा पेला हातात घेतला व पाणी पिले.

“सीमा, टीशू दे.” गरमागरम सूप पिल्यामुळे राजेश चे नाक थोडे मोकळे झाले होते. आणि आता ते गळायला लागले होते. त्याचे उच्चारही आता स्पष्ट झाले होते.

“मघाशीच तर दिला होता. आतापर्यंत चार बॉक्स संपविलेत तुम्ही.”
“असू दे. आता पाचवा बॉक्स दे. तुला माझ्या टिशू चा काय इशू आहे कळत नाही.” स्वतःच्याच शाब्दिक कोटीवर खुश होऊन राजेश हसला.

“मी म्हणून तुमचे सगळे नखरे सहन करते. माझ्या जागी दुसरी कोणी असती तर कधीच तुम्हाला सोडून निघून गेली असती,” सीमा टिशूचा बॉक्स त्याच्या समोर आदळत म्हणाली. आजवरच्या संसारात सीमाने कितीतरी वेळा त्याला हे वाक्य ऐकवले होते. पण ते वाक्य तितकेच खरे होते याची जाणीव राजेश ला होती. आपल्याला सहन करणे हे आपल्याला सुद्धा शक्य नाही हे त्यांने आपल्या मनाशी कधीच मान्य केले होते. पण हे काही तो सीमाला बोलून दाखवणार नव्हता. त्याला सीमा सारखी सहनशील बायको दिल्याबद्दल त्याने देवाचे मनोमन आभार मानले.

***

दुसऱ्या दिवशी राजेशला जाग आली तेंव्हा सकाळचे सात वाजले होते. रात्रभर त्याला छान झोप लागली होती. त्याला एकदम मोकळे-मोकळे वाटत होते. कालच्या सर्दीचे नामोनिशाणसुद्धा उरले नव्हते. तो अंथरुणात उठून बसला व त्याने छातीभरून एक दीर्घ मोकळा श्वास घेतला. त्याच्या हालचालीने त्याची बायकोसुद्धा जागी झाली.

“गुड मॉर्निंग, सीमा” तो आनंदाने म्हणाला.

“गुद बॉदीग” सीमा पुटपुटली.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin Biggrin

फारच भारी
Lol
किती दिवसांनी काहीतरी वाचून एवढी हसलेय.
.
ह्याच विषयावर उका आणि प्रिबा ह्यांच्या आणि काय हवं series मधला सर्दी एपिसोड बघा.
सुरुवात आणि शेवट तुमच्या कथेसारखा आहे.
खरे तर ती series च धमाल आहे

“बेदे दोददा … दूद, बेदे प्याद की … दूद”
>> हे कोणतं गाणं आहे याचा शोध लेख दुसऱ्यांदा वाचताना लागला आणि पुन्हा हसले Lol

छान आहे Proud
आई कॅन रीलेट.. पण माझी सर्दी वेगळ्या प्रकारची असते. लोकांना त्रास देत नाही. झोपल्याशिवाय जात नाही.

पियू , फार्स विथ द डिफरंस, रानभुली, किल्ली, जाई., ऋन्मेऽऽष - सर्वांचे आभार.
किल्ली - आपण सुचविलेल्या आणि काय हवं series चा पहिला शिफ्टिंग चा भाग पहिला. छान आहे. हलकी फुलकी . उरलेले भाग सुद्धा पाहीन असे वाटते. सुचविल्याबद्दल धन्यवाद.
पियू - ते गाणे आणि एकंदरीतच राजेश चे संवाद लिहिताना नेमके काय लिहायचे हे कळण्यासाठी मी नाक बंद करून ते संवाद पुटपुटून पहायचो . मग ते जसे मला ऐकू येतील तसे लिहीत गेलो . Lol (ते संवाद पुटपुटताना घरातले माझ्याकडे संशयाने पाहतील हि भीती सुद्धा होती. :D)
ऋन्मेऽऽष - सर्दी लोकांना त्रास देत नाही, सर्दी झालेला माणूस देतो. (गमतीने म्हणतोय.) Lol

नेमके काय लिहायचे हे कळण्यासाठी मी नाक बंद करून ते संवाद पुटपुटून पहायचो
>>>>
भाई आप तो आमीर खान निकले..

SharmilaR, झकासराव, तोमीन, स्वाती२, मनीमोहोर , ऋतुराज. , भ्रमर -
सदवाद्दे खूप खूप आभाद. Happy

बदा सददी झादी आहे
>> तोब्यातोते सूप तयाद कदूद प्या. आदे घादूद चहा प्या.

तुला नाही कळलं आशू?? Lol

मेरे ढोलना सून.. मेरे प्यारकी धून..

(तुला पटकन सांगून "ओळख पाहू" चा खेळ खेळण्याचा मोह आवरलेला आहे बरं का !! ये संत्रा तुमपे उधार रहा Happy )

अईगं! ऑफिस मध्ये वाचली Rofl वरती डिस्क्लेमर लिहा हो ऑफिसमध्ये आपापल्या जबाबदारीवर वाचा!! Rofl

भारी लिहिलंय... Lol

आज हे वाचून एकदम ट्यूब पेटली की, पूर्वी एक सीबा गायगी नावाची कंपनी होती ती सीमा आणि गार्गी नावाच्या दोन भारतीय बहिणींची असणार. Proud भरपूर सर्दी झालेल्या काळात सुरू केलेली असल्याने नाव आणि ती फार्मा कंपनी का असावी या प्रश्नाचा उलगडा सहज होतोय!

एक सीबा गायगी नावाची कंपनी होती ती सीमा आणि गार्गी नावाच्या दोन भारतीय बहिणींची असणार.>>>> श्रद्धा Rofl

aashu29, पियू, धनुडी, vrushali n, श्रद्धा, Diggi12 , अंजली_१२ , ऋतुराज. -
सद्वाद्दा धद्यवाद . Happy