दहा वर्षांनी कॉलेजमेट्सच्या रियुनियनचा योग आला. पावसाळ्यात करायचे ठरले.
वर्षाविहार रियुनियन!
सारे आले होते. "ते दोघे" वगळून! पाऊसही तसाच धुंद होता. दहा वर्षांपूर्वी असायचा तसाच. आणि आम्ही सारेच रेनडान्स करत होतो. दहा वर्षांपूर्वी करायचो तसेच. पण माझ्या मनात प्रश्न येत होते. ते दोघे का आले नसावेत? कॉलेजमध्ये त्यांचे प्रेमप्रकरण किती गाजलेले. आता कुठे असतील? काय झाले असेल?
आणि अचानक माझे लक्ष गेले. ते दोघे सुद्धा आम्हाला जॉईन झाले होते. "अरे तुम्ही दोघे कधी आलात?", असे विचारत मी त्यांच्याकडे निरखून पाहीले. एकमेकांसोबत डान्स करत होते खरे.
लहानपणापासून तिची भूक काही अजबच ! किती, कसा , कुठे फडशा पाडेल याचा नेमच नाही.
त्यामुळे ती सतत चर्चेत असे. घरी-दारी, शाळेत, पंचक्रोशीतही... ते ही वय वर्षे फक्त नऊ असतांना !!
तिच्या असामान्य भुकेचं शमन करण्याचं काम तिच्या बाबांचं होतं. वाढत्या वयानुरुप उचित असं खाद्य ते तिला सतत पुरवीत असत.
त्या दिवशीसुद्धा बाबा दोन्ही हातात अवजड पिशव्या घेऊन दमून-भागून घरी आले. त्यांना वाटत होतं लेकीसाठी आठवड्याभराची बेगमी केली आहे आपण. पुढच्या आठवड्यापर्यंत बघायला नको.
पण कसंच काय, दोन तासांत बाईसाहेबांनी फडशा पाडला होता.
उत्साहात तो रांगेत उभा होता. 'गुलमर्गची केबल कार राईड'.... या खोल दरीवरुन पलिकडे बर्फाच्छादित डोंगरावर पोचायचं.... भारीच ! एका गोंडोलात ७ जण या हिशोबाने पुढच्या ४ जणांच्या कुटुंबासोबत आपला नंबर येणार, येय !!
गोंडोला येऊन पोचली आणि अचानकच मागच्या तिघांनी याला विनंती केली की दादा आम्ही तिघे एकत्र आहोत तर आम्हाला या चौघांसोबत जाऊ दे प्लीज तुम्ही मागच्या गोंडोलातून येता का? याने हो, नाही म्हणेपर्यंत ते तिघे गोंडोलात घुसले आणि राईड सुरुही झाली.
हा मागे चरफडत राहिला शिव्या घालत आणि वाट बघत.........
इतक्यात.....
खळ्ळ्ळखाट.....
पुन्हा एक सकाळ. पुन्हा एक दिवस. तो यंत्रवत ऑफिसच्या दिशेने जाऊ लागला.
"किती दिवस असे रटाळवाणे जगायचे? काहीतरी वेगळे करायला हवे. रिस्क घ्यायला हवी" त्याच्या मनात पुन्हा तेच सारे विचार.
आणि एके ठिकाणी कोणताही पुढचा मागचा विचार न करता त्याने गाडी सरळ ऑफिसकडे न नेता डावीकडे एका डोंगरवाटेला दामटली. तसेही आजवर त्याला नेहमीच त्या वाटेने डोंगरमाथ्यावर जायची तीव्र इच्छा व्हायची. आज त्या इच्छेने उचल खाल्ली.
सटवाईने कुणाच्या कपाळी काय लिहीलं असेल काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना! मला पाऊस आवडतो पण बाल्कनी सोडून पावसात मला जाता येत नाही. आणि या दोघांचं पावसाशी अजिबातच सख्य नाही तरी त्यांची मात्र पावसात भिजण्यातून सुटका नाही. रोजंदारीवर जगणाऱ्याला चॉईस असतोच कुठे?
वाईट वाटलं तरी माझ्या पंखात कुठे बळ होते मदत करण्याइतके.
आजही पाऊस कोसळत होता. “आजही भिजणार बिचारे!”, मन उद्गारले
पण आजचा दिवस मात्र वेगळा होता. आता पावसात भिजायची गरजच उरली नव्हती. कॅट सॅकमधे एकमेकांना बिलगून बसलेले ते दोघे आज त्यांच्या हक्काच्या घरी चालले होते.
तीघे मजेमजेने गाणे गात सहलीला निघाले होत-चोलीके पीछे क्या है…. चुनरीके नीचे क्या है. खिदळत, एक्मेकांबरोबर हास्यविनोद करत त्या सुंदर, नितळ डोंगरमाथ्यावर जरा विसावले. एकाने उत्साहाने जागेवरच जॉगिंग सुरु केली तर दुसरा आकंठ रसपान करु लागला. तो जरा विसावला.
इतक्यात कर्णभेदी किंकाळी ऐकू आली व पूर्वजांनी सातत्याने वॉर्निंग दिलेली ती भयानक ‘चिमूट’’ दिसली.
उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून तिघे सैरावैरा पळू लागले. त्याने रस्त्याकडे (खरे तर खोल दरीकडे )धाव घेतली.
समुद्राने वेढलेलं, एक चिंचोळ्या साकवाने किनार्याला जोडलेलं डोगराळ बेट. स्तब्ध घनदाट जंगलाने आच्छादलेलं. तिरिप जमिनीवर पोहोचणार नाही असं निबिड. मधोमध अंगाफांद्यांनी बहरलेला डेरेदार वृक्ष, त्याच्या काही फांद्या खोडाला चिकटलेल्या. सापासारखे वाटोळे फेर धरत धरणीत सामावलेल्या. समुद्राची गाज आहे, पण.. वारा तर सोडाच तिकडची हवा इतकी कुंद की श्वास जड व्हावा.
त्या रात्री रुपेरी प्रकाशात वाळूवर तीन जणांच्या पावलाचे ठसे. दोन जंगलात जाणारे आणि एकच परत येणारा, तिचा.
-
-
-
जंगलातले उंच वयोपरत्त्वे वठलेले झाड. मुळावर उठलेल्या वडवानला थोपवत अजुनतरी ताठ. इथल्या प्रजातींचे जैववैविध्य जपले, मूळच्या आणि नंतर रुजलेल्या; आता इथल्याच झालेल्या जाती जपल्या म्हणून सुबत्ता होती, पूर्वसुरींचा वसाच! पण टोलेजंग इमारती बांधणार्यांना त्याचं काय? एकाच साच्यातले पांढरे ठोकळे जोपासायचे, अफरातफर, सग्यासोयर्यांना कंत्राटं आणि नटलेलं जंगल उध्वस्त! सीमेवर भिंत उभारुन वारा थोपवायच्या, पूर्वीचं वैभव दाखवायच्या वल्गना!
वठलेल्या झाडावर हल्ला सोपाच, शकले उडू लागली आणि सार्या जंगलाचेच अवसान गळाले.
छोट्या घराकडे निघाला होता. खिशातून दोन नाईसची बिस्किटं बाहेर काढत असतानाच त्याला रस्त्याच्या बाजूला मातीच्या ढेकळांत एका पिवळ्या तुकड्याभोवती जमलेले मुंगळे दिसले.
'अरेच्चा! काल इथे आपली लिमलेटची गोळी पडली तिचा तुकडा दिसतोय. मस्त मेजवानी सुरुये!'
छोट्यानं बिस्किटं तोंडात कोंबली आणि खाली बसून तो मुंगळ्यांचं निरीक्षण करू लागला.
बिस्किटं तोंडात कोंबताना अर्धी खाली सांडली याचीही त्याला फिकीर नव्हती.
शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच... कर्णकर्कश आवाजात गजर वाजायला सुरुवात झाली.
"अरे दिनू अरे एss बाळा उठायचं नाही का तुला? आज सहल आहे ना!" आईने पांघरूण काढत विचारलं.
"पाच मिनिटं झोपूदे गं"
"पाच पाच करत पंधरा मिनिटं झाली. आता उठतोयस की पंखा बंद करु?"
यावरही त्याने फक्त "हुम्म्म!" म्हणत कुस तेव्हढी बदलली.