कविता

राधेचा कन्हैया -

Submitted by विदेश on 28 August, 2013 - 05:15

इकडे तिकडे शोधुन राधा बसली हिरमुसुनी
झाडाला टेकताच अवचित सूर आले वरुनी ..

फांदीवरती डोलत होता कन्हैया मुरली धरुनी
इथेच होता दिसला नव्हता हिरव्या पानामधुनी ..

पाहुनिया वर खुषीत आली राधा मनोमनी
हरखुन गेली कितीक धडधड वाढे हृदयातुनी ..

लटका रुसवाफुगवा वाटे तिला दावुया मनी
पट्कन फांदीवरून उतरे कन्हैया ते जाणुनी ..

मुरली लावी अधरास तिच्या एक हात धरुनी
जवळीकीने गेला रुसवा झणि राधेचा विरुनी ..

पुष्प हातचे मुकुटी ठेवुन भाळासी चुंबुनी
उभी होतसे अधोवदन ती हात हाति गुंफुनी ..

शब्दखुणा: 

काही मित्र चंद्रासारखे असतात ...

Submitted by मी मी on 17 August, 2013 - 12:15

काही मित्र चंद्रासारखे असतात ..

भेटतात तेव्हा लख्ख प्रकाशात चमकतात
पण मग पुढे कले कलेने कमी होत आवस होतात !!

काही येतात, दिसतात, लुकलुकतात …
तेव्हाच …. जेव्हा
तुमच्या अवती भोवती वातातावरण स्वछ असेल.

भोवती काळे ढग दाटून आलेत कि ते दिसेनासे होतात,
दडून बसतात ..

कधी परतहि येतात सगळं सावट निघून गेलं कि !!

काही दुरस्त ताऱ्यासारखे असतात,
दूरवर अगदी कोपऱ्यात उभे असतात हाथ बांधून

मंद प्रकाशात तेवणारे ….पण साथ सोडून न जाणारे

असतात …तिथेच उभे असतात
रोज दिसतात …. दूररररर असले तरीहि दूर नसतात….

शुक्रताऱ्या सारखे आयुष्यात जमून बसतात …. !!

विषय: 
शब्दखुणा: 

अशी वाहने येती - (विडंबन)

Submitted by विदेश on 13 August, 2013 - 04:47

(चाल - अशी पाखरे येती - )

अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती
दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ...

खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला
जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ...

पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले
नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ...

हात एक तो पुढेच सरला- काठीवर खात्रीने फिरला-
देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ...

पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती
त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती ...

.

शब्दखुणा: 

नवनिर्मिती

Submitted by अनघा कुलकर्णी on 12 August, 2013 - 23:35

नवनिर्मिती
नवनिर्मिती चा आनंद आगळा ,
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून आकाशी झेप घेणारा I
जिद्द,प्रयत्न ,नशिबाची साथ असे,अंतरीचे मन घेत असे नवनिर्मितीचा ध्यास
मनाची इच्छाशक्ती प्रबळ करा ,सातत्याची कास धरा ,उदास मनातील अंतरीची ज्योत ,
पुन्हा नव्याने प्रज्वलित करा ,
अन नवीन निर्मितीचा आनंद घ्या I

शब्दखुणा: 

मी, ते झाड आणि चिमण्या ......

Submitted by मी मी on 7 August, 2013 - 12:30

घराच्या अगदी पुढ्यात एक वाळलेलं झाड आहे …
पानं गळून गेलेलीत सगळी … हिरवा ठीपकाही नाही ….
दाटीने असलेल्या बारीक फांद्या… वाळलेल्या ..पण
एकमेकांच्या आधाराने नेट धरून उभ्या

रोज संध्याकाळी
दुरून उडत आलेल्या …
प्रत्येक फांदीवर बसलेल्या चिमण्या दिसतात
गजबजलेल्या… जणू चीमण्यांचेच झाड

ठरलंय आमचं,
'झाडावर जागा त्यांची …त्यांच्यावर नजर माझी'

माझ्या खोलीच्या खिडकीतून रम्य दिसतो हा नजारा

पाऊस आला कि मात्र मी आवर्जून खिडकी बंद करते
मग बंद खिडकीत फडफडत येउन बसतात त्या
कप्प्यां कप्प्यात ……. निवाऱ्याला …. अगदी हक्काने
पावसापासून जपून ……. तरीही जरा जरा भिजतच

ठरलंय आमचं,

विषय: 
शब्दखुणा: 

ये, सखये ये ....

Submitted by अवल on 31 July, 2013 - 02:46

तसे केव्हाच तुला बुडवले
तळ्यात , खोल खोल आत
तुझे गुदमरणे, तुझे हुंदके
अगदी गिळून टाकले कधीचे

तुझ्या जिवंतपणाचे लक्षणी बुडबुडे
वर येऊन फुटू नयेत म्हणून
तळ्यावरच सा-या,
बांधली मोठी कबर;

सणसणीत व्यवहाराची, दिखाऊ, सुबक
त्यावरल माळले कित्येक साज, फुले
तेही शोभेचे,
फुलण्याचा शाप नको म्हणून

हुश्श्य...
मोठा श्वास घेतला,
चला आता काळजी मिटली
एक मोठा उसासा टाकला,

अन झाले,
तू तशीच
पुन्हा वर,
जिवंत

शब्दखुणा: 

वाटते मजला भिती -

Submitted by विदेश on 27 July, 2013 - 05:49

जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती
ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती

सागरावर का उसळती जीवघेणी वादळे
हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती

ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा
देवळातिल शांततेची वाटते मजला भिती

वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी
वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती

माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती
ओळखेना आरसाही वाटते मजला भिती

जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला
जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती
.

शब्दखुणा: 

गोळाबेरीज

Submitted by इब्लिस on 22 July, 2013 - 13:39

अध्यक्ष महोदय, सन्माननिय व्यासपीठ व माझ्या बंधू भगिनिंनो.
माझ्या पहिल्या कवितेच नांव आहे, 'गोळाबेरीज'

मास्लो च्या पिरॅमिडचे
पास्त्यासारखे बारीक लांब धागे
ओकॅमच्या वस्तर्‍याने चिरून..
माझ्या मेंदूच्या चरबीत फ्राय करून
मलाच सर्व्ह करताना
तो मठ्ठ काळा बैल
अंधारातून माझ्यावर म्यांऽव करून गुरकावतोय
असं उगीचच मला वाटत रहातं..
बैलाच्या गाडीला स्वत:ला जुंपून भीमप्रयत्नांनी ओढून नेलेला तो पास्ता
स्वतःच हादडत असताना बकासूर बनून
डँबीस असा भारतिय माणुस
अधुन मधून ठोऽ करीत
माझ्यावर लहान सहान अतिरेकी हल्ले करीत रहातो,
केविलवाण्या भगव्या पट्ट्या कपाळावर बांधून,

Pages

Subscribe to RSS - कविता