कविता

मूठ

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

तुला काय?
तू पाठ फिरवून जाशीलही..
मग मी मला कसं आणि कुठंवर गोळा करू?
तुटल्या जीवाचे तार तार झाले..
भिनलेत सूर, कसे वजा करू?
सख्य नुरले वेड्या आसवांशी..
कसे आरश्याशी दगा करू?
खोल मूठ एकदाच ह्या जीवाची
कुठंवर श्वासांची निगा करू?
अस्तित्वाचा झगडा जिण्याशी
बोल मना तुला काय सजा करू?

प्रकार: 

नाचते नार तोऱ्यात -

Submitted by विदेश on 2 May, 2013 - 11:12

नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा
चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा

ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते
होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते

हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी
ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी

चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या
मेखला खास झुलवून हात अदबीन हाती ये त्यांच्या

भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी
रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी

पापी ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची
थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची

.

शब्दखुणा: 

चहा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सकाळच्या पहिल्या चहासारखं तुझं हसू
मनाला ताजवा देणारं

तू अवतीभोवती असण्याचा दरवळ
चहातल्या वेलदोड्यासारखाच निव्वळ

तुझी हवीहवीशी ऊब
घोटाघोटाने वाढणारी

पण या चहात मात्र... तुझ्या इतका गोडवा नाही!

अजूनही आहे एक फरक...

तुझ्यातला कैफ, तुझ्यातली नशा
या चहात नाही!!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

यमन-रंग

Submitted by श्रीयू on 30 April, 2013 - 23:00

तिन्ही सांजा सूरमयी
अंगणी चांदणं प्रसन्न
वृन्दावनी तुळशीच्या
मंद तेवतो 'यमन' ||1||

भाळी रिषभाची तीट
गाली निषादाची खळी
धुंद गंधाराचा गंध
शोभे षड्ज सोनसळी || 2||

किती स्वरांग लोभस
भासे सुहास वदन
रूप सोवळे सोज्वळ
सखा स्नेहल 'यमन' ||3||

येता आठव प्रियेची
होता सैर भैर मन
ऋणझुणतो प्रियेचा
गोड पैंजणी 'यमन' ||4||

धुंद श्वासांची मैफल
रंगे स्पर्शाचा सोहळा
देह्भरून प्रियेच्या
उरे 'यमन' आगळा ||5||

संगे टाळ चिपळ्यांच्या
रंगे कैवल्य सोहळा
उभा 'यमन' कीर्तनी
मनी विठ्ठल दाटला ||6||

कधी कीर्तनी रंगतो
'ख्याली' आनंदे दंगतो
'यमन' गझल सखा

शब्दखुणा: 

" एक कविता माझी "

Submitted by अनुराधा म्हापणकर on 25 April, 2013 - 06:20

एक कविता माझी
माझ्या आकाशी उडणारी

एक कविता माझी
तुला मला जोडणारी

एक कविता माझी
तुझ्याशी मला तोडणारी

एक कविता माझी
माझी मलाच भिडणारी

एक कविता माझी
माझ्यावर उगाच चिडणारी

एक कविता माझी
किरकिरी, उगाच रडणारी

एक कविता माझी
वहीच्या पानावर फडफडणारी

एक कविता माझी
इवल्याशा चिटो-यावर तडफडणारी

कविता कविता कविता.. !
प्रत्येक कपट्यात मला सापडणारी

मीच होते, माझ्या कवितांना
वाहत्या पाण्यात नेऊन सोडणारी

शब्दखुणा: 

वेडे नाते

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

टेबलावर निरर्थक लिहीताना नकळत
बोटं तुझं नाव गिरवायला लागतात
कामात गुंतलेले सारेच क्षण
तुझ्या विचारांत हरवायला लागतात

स्वप्नात भेटणं जुनं झालं कधीच
आता प्रत्यक्षात पण तुझा भास होतो
केसांशी खेळणारा वार्‍याचा झोका
मानेशी रूळणारा तुझा श्वास होतो

तुझी ओढ, तुझी आस, तुझा छंद मला
तुझी नसूनही तुझी होऊन जाते मी
तुझ्यामाझ्यातले निनावीच बंध
उरी तरी जपते हे वेडे नाते मी

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

वसंत ऋतू आला -

Submitted by विदेश on 22 April, 2013 - 01:09

सकाळी तू ओले केस
फटकारत असताना
आरसाच दिमाखात असतो

पुडीतून हळूच डोकावणारा
मोगरा प्रसन्न हसत असतो
स्वत:शीच मान डोलावत

खिडकीतून डोकावणारी अबोली
काहीतरी पुटपुटत असते
मनातल्या मनांत छानसे

मिठी मारल्यागत
लाजाळू तुझी पाठ पहात
खुदकन लाजलेले असते

आरशासमोर दोन गुलाब
उमलत चाललेले
मला दुरूनही दिसतात

ओठावरचे निसर्गदत्त
डाळिंबाचे दाणे पिळवटून
ओठावर पसरायला पहातात

दोन भुवयांच्या कमानीत
जास्वन्दीचा लालभडक ठिपका
विराजमान होत असतो

पावडरच्या कणाकणात
जाईजुईचा मंद सुगंध
अहाहा, चेहऱ्यावर पसरतो

हिरव्या साडीचोळीतले
अनोखे रूप
मनाची घालमेल वाढवते

शब्दखुणा: 

सुप्रभात -

Submitted by विदेश on 19 April, 2013 - 22:18

वेळ झाली हो चहाची सूर्य सांगे तो पहा
कोंबडाही साद घाली स्मरण द्याया तो पहा

पाखरे घेण्या भरारी आळसाला झटकती
छान वाटे गार वारा झोंबणारा तो पहा

वर्दळीला जाग आली चालली रस्त्यावरी
श्वान भुंके आणि सांगे मीहि जागा तो पहा

दूध पिशव्या लागल्या की लोंबण्या दारावरी
स्वच्छता मोहीमवाला शीळ घाली तो पहा

छान सजली आज दारी नक्षिची रंगावली
पाहुणाही थबकला का पाहण्याला तो पहा
.

शब्दखुणा: 

आहेत तोवर पाहून घ्या

Submitted by जो_एस on 16 April, 2013 - 06:22

आहेत तोवर पाहून घ्या
झाडं,... रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या
आहेत तोवर पाहून घ्या

झाडं तोडून प्रगती होते
विकासाला गती येते
परत एकदा विकासाची
व्याख्या तेवढी करून घ्या
आहेत तोवर……

झाडं तोडा रोलर फिरवा
स्टेडियम बिल्डींग सेझ उगवा
सगळ्यात आधी श्वासासाठी
मास्क तेवढा करून घ्या
आहेत तोवर …..

एकेकाळी पृथ्वी वरती
लहान मोठी झाडं होती
फोटो सहित इतिहासात
नोंद मात्र करून घ्या
आहेत तोवर…..

“झाडं लावा झाडं जगवा”
कागदावरती लिहून घ्या
त्या कागदांनी येताजाता
कृती विसंगत झाकुन घ्या
आहेत तोवर…..

प्रोजेक्ट लिहून भागणार नाही
कायदे करून वाचणार नाही

शब्दखुणा: 

तृष्णा

Submitted by rmd on 1 April, 2013 - 12:25

तुझ्या हातांच्या आंचेने
अलवार मला वितळू दे
तुझ्या स्पर्शाच्या ओढीने
स्पंदनांना पळू दे

भान सुटू दे सगळ्याचे
उन्मळू दे, तोल ढळू दे
विखुरण्यासाठीच आसरा
तुझ्या मिठीत मिळू दे

नको दुराव्याची शपथ
श्वासात तुझ्या मिसळू दे
सोसू दे धग देहाची
आज तुझ्यासवेच जळू दे!

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता