rmd यांचे रंगीबेरंगी पान
हमिंगबर्ड पिल्लू आणि आई/बाबा (प्रकाशचित्र)
ओढ
बाहेर कोसळता पाऊस
बाहेर कोसळता पाऊस
आणि फायरप्लेस मध्ये जळणारी मंद आग
अशी ओली उबदार रात्र...
आणि तुझी साथ!
ढगांच्या आवाजाहूनही मोठी
माझ्या मनाची वाढती धडधड
तापलेले श्वास
पेटलेले स्पर्श
चहाहून जास्त वाफाळलेले तू आणि मी
पावसाच्या थेंबांसारखे
अलवार गाण्याचे सूर
तुझे माझे शब्द व्यक्त करणारे
आपल्या लयीशी होड घेणारे...
बाहेर कोसळता पाऊस
आणि आत चिंब होणारे आपण
अशी ओली उबदार रात्र
देशील?
मागे वळून पाहते तेव्हा
मागे वळून पाहते तेव्हा
दिसतो लांबलचक एकाकी रस्ता
समोर पसरलेल्या रस्त्यासारखाच
मागे वळून पाहते तेव्हा
मोजून घेते मनातले घाव पुन्हा
खपल्या निघता निघत नाहीत
मागे वळून पाहते तेव्हा
हातून सुटलेले हात दिसतात
अन् सलतो न दिसणारा काळ
मागे वळून पाहते तेव्हा
अंधारभरल्या सावल्या छळतात
पुढचंही दिसत नसतं नेमकं
मागे वळून पाहते तेव्हा
माझीच राख मला खिजवत राहते...
मागे वळायला 'तू' राहीली आहेसच कुठे?
रात्र पाऊस पाऊस
अश्या कोंदटल्या राती
टपकत्या मेघांसवे
मन मोकळे करावे
घ्यावी वाटून आसवे
ओला बधीर गारवा
घ्यावा वेढून जरासा
गोठाव्यात संवेदना
थोडा मिळावा दिलासा
झिरपत्या पाण्यासंगे
मातीमध्ये मिसळावे
सल खोल उरातले
कधी कुणा ना कळावे
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://roopavali.blogspot.com)
आवर्तन
चहा
सकाळच्या पहिल्या चहासारखं तुझं हसू
मनाला ताजवा देणारं
तू अवतीभोवती असण्याचा दरवळ
चहातल्या वेलदोड्यासारखाच निव्वळ
तुझी हवीहवीशी ऊब
घोटाघोटाने वाढणारी
पण या चहात मात्र... तुझ्या इतका गोडवा नाही!
अजूनही आहे एक फरक...
तुझ्यातला कैफ, तुझ्यातली नशा
या चहात नाही!!
वेडे नाते
टेबलावर निरर्थक लिहीताना नकळत
बोटं तुझं नाव गिरवायला लागतात
कामात गुंतलेले सारेच क्षण
तुझ्या विचारांत हरवायला लागतात
स्वप्नात भेटणं जुनं झालं कधीच
आता प्रत्यक्षात पण तुझा भास होतो
केसांशी खेळणारा वार्याचा झोका
मानेशी रूळणारा तुझा श्वास होतो
तुझी ओढ, तुझी आस, तुझा छंद मला
तुझी नसूनही तुझी होऊन जाते मी
तुझ्यामाझ्यातले निनावीच बंध
उरी तरी जपते हे वेडे नाते मी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)
घुसमट
आत्ममग्न हुंदक्यांचे
मखमली काळे कोष
कोणाचा पाय मोकळा
कोणाच्या कपाळी दोष
भावनांची सालपटे
अविश्वासाचा आसूड
रान सुकलेही नाही
पेटली उन्मादी चूड
धुमसत्या निखार्यांचा
गर्भ गोठलेला पार
वाटा हजार दिशांच्या
बंद एकुलते दार
जीवघेणी तटस्थता
आत धुमसे वादळ
सुखी भविष्याची आस
रिती काळाची ओंजळ